अपघात प्रकरणी 
निर्दोष मुक्तता

अपघात प्रकरणी निर्दोष मुक्तता

अपघात प्रकरणी
निर्दोष मुक्तता
सावंतवाडी,ता.९ ः अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रदीप संजय आष्टेकर (वय २३, रा. करवीर, कोल्हापूर) याची आज येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याकामी अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांनी काम पाहिले. हा अपघात २५ जानेवारी २०१९ मध्ये इन्सुली येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडला होता. त्यानुसार विजय नारायण सावंत यांनी संशयित आष्टेकर यांच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आष्टेकर हे गोव्याहून मुंबईकडे जात असताना दुचाकीला धडक बसल्याचा दावा केला होता. यात दुचाकीस्वार महेश सावंत (रा. वाफोली) हे जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले होते.
---
सरमळेत रविवारी
खुली भजन स्पर्धा
सावंतवाडी ः सरमळे येथील श्री देवी सातेरी भगवती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने १४ मे रोजी खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही भजन स्पर्धा सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत श्री देवी सातेरी भगवती मंदिरात होणार आहे. स्पर्धेसाठी १० हजार, ७ हजार, ५ हजार रुपये व प्रत्येकी सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रथम तीन क्रमांकांना प्रत्येकी १००० रुपये व सन्मानचिन्ह याशिवाय वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक भजन संघांनी मंडळाचे अध्यक्ष समीर गावडे, उपाध्यक्ष संजय गावडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे सचिव रवींद्र सावंत, सागर गावडे, मंगेश सावंत, मुकुंद गावडे यांनी केले आहे.
---------------
माजगावात आज
विविध कार्यक्रम
सावंतवा़डी ः माजगाव येथील श्री देव महादेवाचा वर्धापन दिन उद्या (ता. १०) होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंदिरात सकाळी अभिषेक, लघुरुद्र, श्रींची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री ८ वाजता अष्टविनायक दशावतार मंडळाचा (निरवडे) नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजगाव देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंद सावंत, सचिव विजय माधव आणि देवस्थान मानकऱ्यांनी केले आहे.
---------------
रेडी येथे आज
‘रक्तचंडिका’
सावंतवाडी ः रेडी-बोंबडोजीचीवाडी येथील श्री देव ब्राह्मण मंदिराचा वर्धापन दिन उद्या (ता. १०) साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी १० वाजता श्रींची महापूजा, दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिकांची भजने, रात्री ८ ते ९ वाजता लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स, १० वाजता श्री मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ कुडाळ यांचा नाट्यप्रयोग ''रक्तचंडिका'' होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
------------------
मळगावात १३ ला
पुस्तक प्रदर्शन
सावंतवाडी ः मळगाव येथील उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्यावतीने लहान मुलांसाठी शनिवारी (ता. १३) सायंकाळी ४.३० वाजता पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यावेळी वाचनालयातर्फे सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण गेले दीड वर्ष विनामूल्य सुरू होते. त्यातील दोन मुलींची महाराष्ट्र पोलिसांत नियुक्ती झाली आहे. या मुलींचा सत्कारही यावेळी होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.
------------------
तळवडेत शुक्रवारी
दशावतार नाटक
सावंतवाडी ः तळवडे येथील श्री मुरारदेवी मंदिर मित्रमंडळातर्फे मुरारवाडी येथे शुक्रवारी (ता. १२) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी श्रींची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, रात्री ८ वाजता कालेली येथील श्री ओंकार नटेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com