पथारीः दशावतारी बैठक व्यवस्था

पथारीः दशावतारी बैठक व्यवस्था

प्रवास दशावताराचा

swt115.jpg
02067
प्रा. वैभव खानोलकर
swt116.jpg
02068
दशावतार कलावंतांची पथारी अर्थात बैठक व्यवस्था

पथारीः दशावतारी बैठक व्यवस्था

लीड
दशावतार याच मातीतून उगवलेला सर्वांग सुंदर आविष्कार. शतकानुशतके जनमानसांत प्रबोधन करत फिरणाऱ्या या लोककलावंतांचे जीवन म्हणजे एक साधनाच. कोकणचे मातीमातीचे रस्ते, वळणे घेत चढउतार असणाऱ्या या लाल मातीतून लोककलेचा प्रवास करणाऱ्या लोककलावंतांचे जीवन म्हणजे दशावतारी कलेची तपस्या. थंडीची, उन्हाची पर्वा न करता तुळसी विवाहापासून सुरू झालेला हा झंझावाती प्रवास संथ व्हायचा तो शिगमोत्सवाला. वेगवेगळ्या गावांतील- तालुक्यांतील हे सगळे रंगकर्मी जातीपातीची बंधने झुगारत एकदा का एकत्र आले की, मग या दशावताराचे बिऱ्हाड धयकाले करत एका गावातून दुसऱ्या गावात पायी प्रवास करायचे. धयकाल्यात रात्र उजळून जायची ती बावन्नकशी अभिनयाने, पौराणिक भाषा प्राबल्याने, चैतन्यमय संगीताने आणि शिस्तबध्द पदन्यासाने.
...............
ज्या ठिकाणी धयकाले असायचे, अशा ठिकाणी हे सर्व कलाकार आपल्या साहाय्यक कलावंतासह म्हणजे गडी कलावंतासह एका दिवसाचा संसार थाटायचे. स्वयंपाक तिथेच केला जायचा आणि कलावंतांच्या जेवणाच्या पंगतीही तिथेच वाढल्या जायच्या. दशावतारी कलावंत ज्या ठिकाणी रंगाचे वा नाट्यप्रयोग सुरू होण्या अगोदर विश्रांती घ्यायचे, त्या मंडपाखाली दशावतारी कलावंत पूर्वी गोंधडी, कांबळे (फटकुर) आदी अंथरायचे, यालाच ‘पथारी’ असे म्हटले जायचे.
सद्यस्थितीत पातोडी, पताडी आदी शब्दप्रयोगही या ‘पाथरी’साठी प्रचलित आहेत. दशावतारी कलावंतासाठी पथारी म्हणजे एक अंथरुण असते, याचा कलावंत अंथरुण वजा बैठक व्यवस्थेसाठी वापर करताना दिसतात. याच पथारीवर संबंधित नाट्यमंडळातील मालकासहित कलावंतांच्या बॅगा असतात. पथारीची विशेष काळजी प्रत्येक कलावंताकरवी घेतली जाते. या पथारीची व्यवस्थाही प्रत्येक कलावंत स्वतःच करतो, म्हणजे ती त्या कलावंतांच्या मालकीची असते. रसिक जेव्हा कलावंतांना भेटायला जातात, तेव्हा संबंधित कलावंत याच पथारीवर त्याला सन्मानपूर्वक बसवितात व त्यांच्याशी हितगुज करतात. एखाद्या लौकिक प्राप्त कलावंताच्या पथारीवर बसायला मिळणे, हा आजही रसिकांना सन्मान वाटतो. दशावतार लोककलेत आजही ह्या जुन्या परंपरा जोपासल्या जातात.
पथारीवर कलावंतांच्या बॅगा साहाय्यक कलावंत नीट क्रमाने लावतो. शक्यतो हा क्रम बदलत नाही. पूर्वी प्रतिकुल परिस्थिती होती. अशा स्थितीतही धयकाल्याची रंगत दशावतार कलावंत वाढवायचे. मंदिर किंवा मंदिरासमोर एखादा तात्पुरता मंडप उभारून धयकाल्याची नाटक तोबा गर्दीत बघताना चहा-भजीच्या खमंग सुगंधासह आप्त परिवारासोबत कलावंत रंगमंचावर आनंद देऊन जायचे; पण या दशावतारी कलावंताच्या बैठक वा मेकअपसाठी एखादा तात्पुरता मंडप असायचा. पूर्वी हा मंडप वेगवेगळ्या झाडांच्या पानांनी किंवा माडांच्या झावळ्यांनी शाकारून त्याखाली कलावंतांची बैठक व्यवस्था गावातील लोक करायचे.
बैठक व्यवस्थेसाठी दिलेल्या मंडपातील जमीन नीट नसायची. अशा वेळी या दशावतारी कलावंतांना विश्रांती घेताना म्हणजे झोपताना वा मेकअप करताना जमिनीवरील दगड धोंडे लागू नये, म्हणून जमिनीवर गवत पसरले जायचे आणि यावर दशावतार कलावंतांची बैठक व्यवस्था केली जायची.
आज काळ बदलला, गावागावांत सुधारणा झाल्या. कायमस्वरुपी सभामंडप उभे झाले. कुठे धर्मशाळा दिमाखात दिसू लागल्या, कुठे संगमरवरी फरशी, तर कुठे सिमेंटच्या कायमस्वरुपी जमिनी दिसू लागल्या. गावागावांत दशावतार लोककलेसोबतच कलावंतांचे आदरातिथ्य होऊ लागले. या बैठक व्यवस्थेचे स्वरूप सुधारले; पण आजही दशावतार लोककलेत बैठक व्यवस्थेतील पथारीची पारंपरिक पध्दत तीच आहे. बदललेली पथारी आज आधुनिक चटई, जाजम, चादर, सतरंजी आदी स्वरूपात कलावंत वापरतात. सभामंडपात कितीही उच्च प्रतीची बैठक व्यवस्था असली, तरी पथारीवर विश्रांतीसह रंगण्याची मजा काही औरच आणि आजही दशावतार लोककलेत ती पथारी बैठक परंपरा जोपासली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com