जयंत पाटील प्रेस - सांगली

जयंत पाटील प्रेस - सांगली

‘आयएलएफसी’सोबत रुपयाचे देणे-घेणे नाही

जयंत पाटील; ईडीची नोटीस कशासाठी हे सर्व देशाला माहीत

सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. ११ ः ज्या आयएलएफसी कंपनीच्या प्रकरणात मला ईडीने नोटीस बजावली आहे, त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही तिथे नोटीस काढली जातेय. ईडी का नोटीस काढते, हे सगळ्या देशाला माहीत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, ‘‘बुधवारी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी नोटीस मिळाली. त्यात काय उल्लेख आहे, मी नीट वाचला नाही. नोटीस मुंबईच्या घरात एका हवालदाराने आणून दिली आहे. माझ्या नातेवाइकांत दोन दिवसांत लग्न समारंभ आहेत. त्यामुळे त्यांनी तारीख दिली असली तरी मी उद्या हजर होऊ शकत नाही. मी वेळ मागून घेणार आहे. या प्रकरणात माझा काडीचा संबंध नाही. कारण, मी कथित कंपनीशी रुपयाचा व्यवहार केलेला नाही. मला कर्ज काढायला आवडत नाही. कर्ज काढावे, असं माझं धोरण नसतं. त्या कंपनीच्या दारात कधी गेलेलो नाही. मला नोटिशीची चिंता नाही. मी कोणत्याही दबावाशिवाय काम करतोय.’’
ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात ईडीला राष्ट्रवादीशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. त्यामुळेच आमच्या पक्षातील नेत्यांना नोटीस दिल्या जात आहेत. याआधी ज्यांना नोटीस आल्या त्या सर्वांशी मी बोललो आहे. त्यांचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार कुठेही सिद्ध झालेला नाही. ईडी कशासाठी काम करते आणि का नोटीस काढते, हे सगळ्या देशाला माहीत आहे.’’

ठाकरे संवेदनशील,
म्हणून राजीनामा दिला
उद्धव ठाकरे संवेदनशील व्यक्ती आहेत. ते पक्के राजकारणी नाहीत. त्यामुळे सगळे लोक दूर गेल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असावा, अशी पाठराखण जयंत पाटील यांनी केली. ते म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने सगळेच बेकायदा ठरवल्यानंतर आता शिंदे सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. विधानसभा अध्यक्षांना न्यायालयाने जे मुद्दे मांडले आहेत, त्या चौकटीत राहून निर्णय घ्यावा लागेल. त्यात ते वेळकाढूपणा करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. सरकार वाचले हा सत्तेभोवती जमलेल्यांचा औट घटकेचा आनंद आहे. हे सगळं अवैध आहे. भाजपची नीती कशी अवैध आहे आणि घटनेची पायमल्ली कशी झाली, हे सरकार कसे घटनाबाह्य आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com