सर्कशीचा तंबू हालता ठेवण्याचे आव्हान

सर्कशीचा तंबू हालता ठेवण्याचे आव्हान

02294
02295
02296
कुडाळ ः येथे पार पडलेल्या सर्कसमधील काही दृष्ये.


सर्कशीचा तंबू हालता ठेवण्याचे आव्हान

अखेरच्या घटका; केवळ कसरतींवर मदार ठेवून वाटचाल

अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः हत्ती-घोड्यांचा लवाजमा, सिंह-वाघाचे आकर्षण, कलावंतांच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या कसरती आणि विदुषकाच्या खळखळून हसवणाऱ्या करामती, हे सर्कशीतील हे निव्वळ मनोरंजन करणारे चित्र आता पार बदलून गेले आहे. या साऱ्या आकर्षण ठरणाऱ्या गोष्टींअभावी सर्कस अखेरच्या घटका मोजतेय. या प्रतिकूल स्थितीतही काही संचालकांनी कलावंतांच्या कसरतींवर मदार ठेवून सर्कशीचा तंबू हालता ठेवला, ही मोठी गोष्ट आहे; मात्र शासनस्तरावर या कलावंतांसाठी विधायक पावले उचलणे गरजेचे आहे.
कुडाळ येथील एसटी आगाराच्या मैदानावर महिन्याभरापासून सांगली येथील ‘सुपरस्टार’ सर्कसने जिल्ह्यातील रसिकांचे मनोरंजन केले. या सर्कसचे मालक प्रकाश माने आणि त्यांचा मुलगा विजय माने या सर्कसचा डोलारा हाकत आहेत. सर्कशीचा डोलारा हाकताना त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते; तरीही याचा आपल्या व्यवसायावर कोणताही परिणाम होऊ न देता आणि चेहऱ्यावर कोणतीही चिंता दाखवून न देता त्यांनी हा सर्कशीचा तंबू हालता ठेवला आहे.
सर्कशीच्या या पडद्यामागील हालचालींचा मागोवा घेतला असता असे दिसले की, आता तिशी-चाळीशीत असलेल्या पिढीपर्यंत सर्कसचा अनुभव जवळपास प्रत्येकानेच घेतला आहे; मात्र यानंतरच्या पिढीला अभावाने सर्कस पाहायला मिळाली. अर्थात २०००-२०१० च्या दशकात जन्माला आलेल्या व आताच्या पिढीला वन्यप्राण्यांच्या कसरतींची धमाल असलेल्या सर्कशीचा गंधही मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्कस ही या पिढीसाठी पालकांच्या मुखातील आणि पुस्तकांमधील गोष्टच होऊन राहिली आहे.
सर्कस म्हटली की एकेकाळी लहानांपासून मोठ्यापर्यंत, अगदी आजीपासून नातीपर्यंत आणि आजोबांपासून नातवापर्यंत सर्वांनाच आकर्षण असायचे. त्यावेळी पुस्तकात चित्ररुपात पाहिलेले वाघ, सिंह, हत्ती, उंट, अस्वल हे वन्यप्राणी सर्कशीतच प्रत्यक्षात पाहावयास मिळायचे. सर्कशीतील पुरुष व महिलांच्या कसरती, विदुषकांच्या गंमतीजमती प्रेक्षकांना खिळवून ठेवायच्या. गेल्या काही वर्षांत सरकारने सर्कसमध्ये प्राण्यांच्या समावेशास बंदी आणली आणि सर्कसचे महत्त्व कमी झाले. केवळ कमीच झाले नाही, तर अगदी सर्कसचा तंबूच दिसेनासा झाला आहे. तरीही कलाकारांनी हार मानली नाही. सर्कशीत वन्यप्राणी नसतानाही केवळ आपल्या कसरतींवर प्रेक्षकांना खिळवून ठेवत सर्कस सुरूच ठेवली आहे. कलाकार कसरतींच्या कला तेवढ्याच ताकदीने सादर करून उपस्थित प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवीत आहेत. सर्कशीमध्ये जोकरच्या गंमती-जमती, जादूचे प्रयोग, धाडसी खेळ अशा विविध माध्यमातून मनोरंजन केले जात होते; मात्र डिजिटल युगामुळे सर्कस केवळ पुस्तकातच शिल्लक राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्कशीला घरघर लागली असताना स्वतःला जगण्यासाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या इतर कुटुंबांना जगविण्यासाठी मालक तारेवरची कसरत करत आहेत. कुडाळ शहरात आलेल्या सुपरस्टार सर्कसला प्रेक्षकांनी कमी-अधिक प्रमाणात प्रतिसाद दिला. प्रेक्षकांची संख्या कमीअधिक असली तरी कलाकारांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नाही. सर्कसमधील प्राण्यांना पर्याय म्हणून टेडीबियर, चिपांझी आदी प्राण्यांचे ड्रेस परिधान करून मुलांचे मनोरंजन करण्यावर भर दिला जात आहे.
..............
चौकट
सरकार दरबारी हवा सन्मान
सर्कशीत दाखविल्या जाणाऱ्या विविध चित्तथरारक प्रसंगांमुळे त्या काळी सर्कस हा लोकांच्या मनोरंजनाचा चांगला पर्याय होता. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन माणसाने सर्कस आणली आणि ती जिवंत ठेवण्याचे काम केले. मूळचे सांगली येथील प्रकाश माने यांचे या कार्यात योगदान असून सर्कस आणि सर्कशीतील कलावंतांसाठी त्यांची सुरू असलेली धडपड, मेहनत पाहून या कलेचा शासन दरबारी सन्मान होणे गरजेचे आहे.
...................
कोट
मी १९६७-६८ पासून सर्कस व्यवसायात आहे. आमच्या ‘सुपरस्टार’ सर्कसमध्ये देशभरातील जवळपास ५४ कलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांसह ३०-४० जणांचे जगणे सर्कसवर अवलंबून आहे. पूर्वीच्या काळात सर्कशीमध्ये प्राणी दिसत असल्याने प्रेक्षकांची गर्दी मोठी असायची; मात्र ही गर्दी आता लोप पावत असून पुढच्या पाच वर्षांमध्ये सर्कस म्हणजे काय, हे पाहावयासही मिळणार नाही. सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर असल्यामुळे तिच्यावर अवलंबून असलेल्या कलाकारांसमोर भविष्यात उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न असणार आहे.
- प्रकाश माने, विजय माने, मालक, ‘सुपरस्टार’ सर्कस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com