संक्षिप्त

संक्षिप्त

उपजिल्हा रुग्णालयात योग्य सेवा
उपलब्ध करून द्या ः संजय कदम
खेड : जिल्हा ग्रामीण रुग्णालयांतर्गत येणाऱ्या खेड, कळंबणी, दापोली व कामथे चिपळूण उपजिल्हा रूग्णालयाची आरोग्य सुविधा सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेला मिळतच नसल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. शासन जनतेची फसवणूक करून फक्त जाहिरातबाजी करून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत नाही, असे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले. शासनाने त्वरित उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयात योग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा सेना स्टाईलने उग्र आंदोलन छेडून जनसामान्यासाठी आरोग्य सुविधा निर्माण करून घ्यावी लागेल, असा इशारा कदम यांनी दिला.

मिरजोळीतीली महालक्ष्मी मंदिरात कलशारोहण
चिपळूण : मिरजोळी, खेंड, उक्ताड आदी भागाची ग्रामदेवता व चिपळूण शहरा जवळील मिरजोळी येथील महालक्ष्मी-साळुबाई मंदिराच्या कलशारोहण सोहोळा सोमवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत थाटात झाला. आमदार भास्करशेठ जाधव, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार शेखर निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद, रात्री करमणुकीचा कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम पार पडले व भाविकांनी या कार्यक्रमांना उपस्थिती होती. देवस्थान ट्रस्टच्यावतीने अत्यंत नेटके नियोजन या सोहोळ्याचे करण्यात आले होते. रविवारी मंदिराच्या कलशाची मिरवणूक थाटात काढण्यात आली. चिपळूण-गुहागर मार्गापासून मिरजोळी मंदिरापर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूला रांगोळी काढण्यात आली होती. ठिकठिकाणी भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. मिरवणूक सोहोळ्याला कलशारोहण सोहोळ्याला सुरू झाला. भारती महाराज यांच्या हस्ते कलश चढविण्याचा विधी पार पडला. महाआरतीच्यावेळी आमदार शेखर निकम यांची उपस्थिती होती. दुपारी महाप्रसाद झाला. सायंकाळी हरिपाठ झाला, यानंतर पुन्हा महाप्रसाद व रात्री अर्चन सावंत यांचा लावणीचा कार्यक्रम झाला.

---------

मंडणगडातील पहिला प्रस्ताव मंजूर

मंडणगड: महसूल नियमांची गुंतागुंत लक्षात घेऊन महसुली तंटे परस्पर सहकार्याने सोडविण्यात यावेत, या उद्देशाने राज्य शासनाने डिसेंबर २०२२ मध्ये सुरु केलेल्या सलोखा योजनेत तालुक्यातील परस्पर सहमतीचा पहिला प्रस्ताव मंडणगड तहसिल कार्यालयाच्यावतीने मंगळवारी मंजूर करण्यात आला.
तालुक्यातील मौजे दंडनगरी येथील जागे संदर्भातील वाद पक्षकरांनी परस्पर सहकार्याने मिटवून टाकला. जहिरा पाल, तबस्सूम शेखदरे, रोशनबी पाल हे तीन पक्षकार या योजनेचे पहिले लाभार्थी ठरले. तिघांमधील करारावर तहसिल कार्यालय मंडणगड तलाठी सजा पंदेरी यांच्यावतीने तसा अभिलेख बनवून यावर कायदेशीर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कार्यक्रमास तहसलिदार विजय सूर्यवंशी, मंडळ अधिकारी प्रकाश साळवी व सर्व पक्षकार उपस्थित होते. जागेच्या मालकीच्या वादात न्यायालयाचे तारखांमध्ये वेळ पैसा व श्रम खर्च करण्यापेक्षा आपासातील महसुली वाद या योजनेचा लाभ घेऊन परस्पर सहकार्याने सलोख्यांनी मिटविण्याचे आवाहन तहसिल कार्यालयाच्यावतीने तालुकावासियांना या निमीत्ताने करण्यात आले आहे.

----

खडपोलीतील कृष्णा कंपनीच्या
वर्धापन दिनी रक्तदान शिबिर

चिपळूण: तालुक्यातील खडपोली एमआयडीसी येथील कृष्णा अँटिऑक्सिडंटस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा ३२ वा वर्धापन दिन ८ मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून कंपनीच्या तीन युनिट्समधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, तसेच कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर कंपनीचे संचालक टी. आर. रहमान यांनी सदिच्छा भेट दिली व रक्तदानाच्या स्तुत्य उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रक्त दात्यांचाही सन्मान केला. शिबिरामध्ये ६०पेक्षा जास्त रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. शिबिरासाठी ब्लडलाईन ग्रुप चिपळूणचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमोल टाकळे यांनी केले.

-------

बोगद्यातून पावसाळ्यापूर्वी एकेरी वाहतूक

रत्नागिरी ः पावसाळा सुरू होण्यापूर्वी कशेडी घाटातील मुंबई-गोवा महामार्गावरील बोगद्यातून एकेरी वाहतूक येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. राज्यातील ग्रामीण रस्ते, राष्ट्रीय महामार्ग यांच्या कामांचा आढावा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला. मुंबई गोवा हायवेमध्ये येणाऱ्या अडचणीचाही त्यांनी आढावा घेतला. या रस्त्याला दिरंगाई झाली हे रस्ते तीन टप्यात पूर्ण होणार आहेत. पावसाळ्यापूर्वी यातील अनेक रस्ते सिंगल लेन पूर्ण होतील. परशुराम घाटात माती कोसळल्यामुळे ती माती काढून तेही पूर्ण होईल, असे सांगितले.

----

काडवलीत धरण कामाचे भूमिपूजन

चिपळूण: काडवलीत धरण व्हावे, यासाठी धरणग्रस्त व ग्रामस्थ सकारात्मक आहेत. धरणग्रस्तांचे प्रश्न चर्चेने सुटले पाहिजेत, यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी काडवली येथील धरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
काडवली येथे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून धरण मंजूर झाले असून या कामासाठी सुमारे ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत काडवली येथील धरणग्रस्त व ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. यावेळी धरणग्रस्त व ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. गुरुवारी या धरण कामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यासह सरपंच सौ. भक्ती महाडिक व प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

---------

सत्ता संर्घषाच्या निकालानंतर
मंडणगड शहरात जल्लोष

मंडणगड: राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर तालुक्यातील शिवसैनीक कार्यकर्त्यांनी मंडणगड शहरात फटाके वाजवून व घोषणा देत स्वागत केले. निकालामुळे कोणाची सत्ता जाणार कोणाची सत्ता टिकणार कोण परत येणार याशिवाय तर्क विर्तक लावले जात असतानाच शिंदे गटास अपेक्षित असलेला निर्णय आला. यामध्ये मुख्यमंत्र्यांना दिलासा मिळाल्याने शिंदे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. माजी सभापती अनंत लाखण, आदेश केणे, शहरप्रमुख विनोद जाधव, योगेश जाधव, निलेश सापटे, निलेश गोवळे, चेतन सातोपे, यांच्यासह असंख्य शिवसैनीक शहरातील मुख्य चौकात निकालानंतर एकत्र आले व फटाके फोडून घोषणा देवून आनंद व्यक्त करत न्यायालयाचे निर्णायाचे स्वागत करण्यात आले.

-------

देवरूख पोलीस कर्मचारी वसाहतीची दूरवस्था

देवरूख : येथील पोलीस कर्मचारी वसाहतीची दूरवस्था झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पोलीस ठाण्याजवळ ११ कुटुंब राहतील, अशी इमारत उभी आहे. गेली अनेक वर्षे कर्मचारी आनंदाने या इमारतीत राहत होते. या इमारतीची डागडुजी करणे आवश्यक आहे. अपुरा पाणीपुरवठा, स्वतंत्र शौचालय नाही, अशा अनेक समस्या कर्मचाऱ्यांना भेडसावू लागल्या. खोल्या लहान असल्याने कुटुंबाचा गाडा हाकताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कर्मचाऱ्यांनी या बाबत बांधकाम विभागाकडे समस्या मांडल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. येथील ३ खोल्यांची दुरूस्ती बांधकाम विभागाकडून करण्यात आली. पण २ वर्षांचा कालावधी उलटला तरी पाणी नाही, विद्युत पुरवठा नाही अशी अवस्था आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com