चिपळूण - खासगी बसचा प्रवास महागला

चिपळूण - खासगी बसचा प्रवास महागला

खासगी बसचा प्रवास महागला
उन्हाळी सुट्टीचा परिणाम ः एसटीने सवलत दिली पण सुविधा नाहीत
चिपळूण, ता. १४ : महिलांना एसटीने सवलत दिली मात्र सुविधा दिल्या नाहीत, त्यामुळे महिला प्रवासीही खासगी वाहतूकीकडे वळत आहेत. आरामदायी प्रवासासाठी जादा पैसे मोजून महिला प्रवासीही खासगी वाहतूकीकडे वळले आहेत. खासगी बस वाहतूकदारांनी त्यांच्या दरात तब्बल २० ते २५ टक्के एवढी भाडेवाढ केली आहे. प्रवासी हंगामासह डिझेल दरवाढ झाल्याने भाडेवाढ केल्याचे सांगितले जात आहे.
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर खासगी बसकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्यांसाठी विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीची झळ सहन करावी लागणार असल्याने त्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
बहादूरशेख नाका, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, मेहता पेट्रोल पंप परिसर, कापसाळ ढाबा ही खासगी प्रवासी वाहतूकीचे अड्डे आहेत. शहरातून येणारे प्रवासी येथे उतरतात. चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वेने, एसटी महामंडळाने जादा गाड्यांची सोय केली आहे. मात्र नियमित आणि जादा रेल्वे गाड्या ३१ मे पर्यंत आरक्षित आहेत. एसटीलाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही प्रवासी एसटीला अजूनही पसंती देत नाहीत. एसटीने प्रवास करायचे म्हटल्यावर एसटीच्या गाड्या व्यवस्थित नसतात. अनेक गाड्यांच्या खुर्च्या तुटलेल्या, सीट फाटलेल्या आणि खिडक्यांची दुरावस्था झालेली असते. काही गाड्यांमध्ये नियमित स्वच्छता केली जात नाही. मुंबईतून येताना कोणत्याही आगारात एसटी थांबली तर तेथील कॅन्टीन आणि शौचालय स्वच्छ नसतात. त्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी घेतला आहे. या मार्गांवरील खासगी बसचालकांनी तिकीटदरात वाढ केल्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. पनवेल येथून चिपळूणला येण्यासाठी बस चालक १२०० ते १५०० रुपये आकारत आहेत. एसटीने प्रवास करताना ४०० ते ५०० रुपयात पनवेल ते चिपळूणचा प्रवास होतो मात्र खासगी वाहतूकदार तीनपट तिकीट आकारत आहेत.

कोट १

खासगी बससेवा पावसाळ्याच्या चार महिन्यांत तोट्यात चालणारा व्यवसाय आहे. कोरोनात मोठ्या प्रमाणावर तोटा सहन केला. मे हा एकच महिना आम्हाला वर्षभरातील तोटा भरून काढण्यासाठी मदत करतो. त्यामुळे दरवाढ करावी लागते. मात्र, परिवहन खात्याने घालून दिलेल्या नियमांना कुठेही फाटा दिला जात नाही. तशी काळजी घेतली जाते.
- नितीन चौधरी, चिपळूण


कोट २

खासगी बसचालकांनी वातानुकूलित आणि दर्जेदार आणि चांगली सुविधा दिल्या, वेळेचे नियमन पाळले तर वाढीव तिकीटदर देण्यास आमची हरकत नाही. एसटीची बससेवा स्वच्छ आणि दर्जेदार नसेल तर राज्य परिवहन खात्यापैक्षा खासगी वाहतूकदार बरे असे म्हणण्याची वेळ आली आहे.
- विजय सोनार, प्रवासी, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com