जिल्ह्यात खत रेल्वेतून येणार

जिल्ह्यात खत रेल्वेतून येणार

03215
सिंधुदुर्गनगरी ः पत्रकार परिषदेत बोलताना मनीष दळवी. सोबत महेश सारंग.


जिल्ह्यात खत रेल्वेतून येणार

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी; वेळीच उपलब्धतेसाठी व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळीच खत उपलब्ध व्हावे, यासाठी आता रेल्वेने थेट झाराप येथे खत उतरविले जाणार आहे. सुमारे २३०० मेट्रिक टन खत लवकरच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये ११ हजार मेट्रिक टनपेक्षा अधिक रासायनिक खतांची गरज असते; मात्र जिल्ह्याला आवश्यक असलेला खतपुरवठा रेल्वेने रत्नागिरी व कोल्हापूर येथे उपलब्ध करून दिला जातो. तेथून ट्रकच्या साहाय्याने जिल्ह्यात पुरवठा केला जातो. ट्रकद्वारे पुरवठा करताना अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खताचा वेळेत पुरवठा होत नाही. याचा फायदा बोगस खत विक्रेते घेत आहेत. खत वेळीच उपलब्ध होत नसल्याने बोगस खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. या खतामुळे उत्पादन घटते. याबाबतची वस्तुस्थिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी १० मे रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत सिंधुदुर्गसाठी होणारा खतपुरवठा रेल्वेने थेट झाराप येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत. याबाबत आवश्यक ते विविध परवाने घेण्यात आले आहेत. झाराप येथे रेल्वेने खत उतरविण्यास रेल्वे प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता सुमारे १८०० मेट्रिक टन सुफला व ५०० मॅट्रिक टन युरिया असे एकूण २३०० मॅट्रिक टन खत लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती यावेळी दळवी यांनी दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग उपस्थित होते.
..................
चौकट
पाच कोटीचे ‘कॅश क्रेडिट’
खत खरेदीसाठी जिल्हा बँकेकडून खरेदी-विक्री संघांना पाच कोटींपेक्षा जादा कॅश क्रेडिट उपलब्ध करून दिले आहे. पाच टक्केंपेक्षा कमी व्याज दारात ही रक्कम उपलब्ध केली आहे. शेतकऱ्यांना शेती पीक कर्ज देण्यास मेपासूनच सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांनी आवश्यक खत खरेदी करावे, असे आवाहन दळवी यांनी केले.
..............
चौकट
लवकरच ९ कोटीचे गोदाम
जिल्ह्यात खत सुरक्षित ठेवण्यासाठी झाराप रेल्वे स्थानकाच्या बाजूला नऊ कोटी खर्चाचे गोदाम उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या गोदामात ३००० मॅट्रिक टनपेक्षा जादा खत ठेवण्याची क्षमता असणार आहे.
---
कोट
जिल्ह्यात रेल्वेने झाराप येथे खत उपलब्ध झाल्यानंतर खरेदी-विक्री संघाकडून त्याची थेट उचल केली जाणार आहे. याबाबतचे नियोजन केले आहे. यावर्षी वेळेत खत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोगस खतापासून सावधानता बाळगावी.
- मनीष दळवी, अध्यक्ष, जिल्हा बँक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com