नव्या जागेला सावंतवाडीकरांची पसंती

नव्या जागेला सावंतवाडीकरांची पसंती

03267
सावंतवाडी ः येथील गोदामाच्या परिसरात भरलेला आठवडा बाजार.


गोदामाच्या जागेत अखेर बाजार

१६० विक्रेत्यांना जागा; सावंतवाडीकरांकडूनही पसंती


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः पालिकेने ठरवून दिल्यानुसार आजचा आठवडा बाजार येथील गोदामाच्या जागेत भरला. या नव्या जागेला सावंतवाडीकरांनीही पसंती दर्शविली. यावेळी उपस्थित राहिलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य केले. त्यामुळे कोणताही वादंग न होता तब्बल १६० व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती पालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
येथील मोती तलावाच्या काठावर भरणारा आठवडा बाजार हलविण्यासाठी गेले अनेक दिवस प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नांना आज यश आले. आजपासून जुन्या न्यायालयाच्या समोर आणि गोदामाच्या परिसरात आठवडा बाजार भरविला गेला. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडून व्यापाऱ्यांमध्ये वादंग होऊ नये, यासाठी पालिकेकडून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता; परंतु आठवडा बाजारासाठी आलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करत पालिकेने ठरवून दिलेल्या जागेनुसार आपली दुकाने लावली. त्यामुळे वादाचा मुद्दा टळला. त्या ठिकाणी १४५ जणांना सामावून घेण्याचा पालिकेचा आराखडा होता; परंतु पंधरा विक्रेते अधिक आल्यामुळे त्यांनाही सामावून घेण्यात आले. येथील बांदेकर हॉटेलपर्यंत हा बाजार भरला होता. याबाबत पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता, सर्व व्यापाऱ्यांना आठवडा बाजारात सामावून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. हॉकर्स संघटनेकडून सुद्धा हिरवा कंदील देण्यात आला. त्यामुळे नागरिकांकडून सुद्धा आता या बाजाराला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेट लावण्यात आली होती. या मार्गावरून दुचाकीची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती; मात्र गर्दी झाल्यास ती सुद्धा बंद करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. नव्या जागेतील बाजाराला पहिल्याच दिवशी नागरिकांनी दिलेली पसंती पाहून पालिका प्रशासनाचे नियोजन यशस्वी ठरल्याचे दिसून आले. शासकीय गोदाम तथा पर्णकुटी विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारापाशी भरलेल्या या बाजारामुळे गुदमरलेल्या मोती तलाव काठाने मात्र सुटकेचा निःश्वास सोडला.
...............
चौकट
सुविधांचा अभाव
आठवडा बाजाराच्या नव्या जागेत आवश्यक सोयी सुविधांचा अभाव दिसून आला. पाण्याच्या सोईबरोबरच स्वच्छतागृह, विजेची व्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी काही व्यापाऱ्यांनी केली. आठवडा बाजारासाठी ही जागाच योग्यच असल्याचा दावाही काहींनी केला.
.................
चौकट
पावसाळ्यात काय?
नव्या आठवडा बाजाराच्या जागेला ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी पसंती दिली असली तरी पावसाळ्याच्या दिवसांत येथे समस्या निर्माण होण्याची शक्यताही काहींनी वर्तविली. या परिसरात अनेक जुनाट वृक्ष असून वादळी वाऱ्यात एखाद्या झाडाची फांदी तुटून दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत काय, असा प्रश्नही काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com