बांद्यात पाच मुलांमध्ये
गोवर सदृश्य लक्षणे

बांद्यात पाच मुलांमध्ये गोवर सदृश्य लक्षणे

३८६६
बांदा ः आळवाडी येथे झोपडपट्टीत सर्वेक्षण करताना आरोग्य विभागाचे पथक. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यात पाच मुलांमध्ये
गोवर सदृश लक्षणे
आरोग्य पथकाकडून भागाचे सर्वेक्षण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ ः शहरातील आळवाडी येथे झोपड्या बांधून राहत असलेल्या मजूर कुटुंबातील ३ ते १० वयोगटातील ५ मुलांमध्ये गोवर सदृश लक्षणे आढळली. आरोग्य पथकाने या परिसरात सर्वेक्षण केले असून अजून रुग्ण आढळून आले नाहीत. सिंधुदुर्गच्या माता बाल संगोपन अधिकारी सई धुरी यांनी आज या वस्तीला भेट दिली. गोवर संसर्गजन्य असल्याने काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व सांगोला तालुक्यातून बहुरूपी कलेनिमित्त काही कुटुंबे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली आहेत. खारेपाटण येथे १२ दिवस वास्तव्य केल्यानंतर ते बांद्यात आले. त्यांनी आळवाडी मच्छीमार्केटजवळ झोपड्या उभारल्या. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र बाह्यरुग्ण विभागात १६ मेस डॉ. पटवर्धन यांना पाच मुलांमध्ये गोवर सदृश लक्षणे आढळली. वैद्यकीय यंत्रणेने त्यांचे रक्त नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. संशयित रुग्ण ३, ७, ९ व १० वर्षांचे आहेत. आता या सर्वांची प्रकृती स्थिर आहे, असे डॉ. पटवर्धन म्हणाले.
गोवर झाल्यास रुग्णामध्ये ताप, अंगावर पुरळ व सर्दी अशी लक्षणे आढळतात. हा संसर्गजन्य आजार आहे. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आरती देसाई, आरोग्य सेविका अनुज्ञा नाईक, आरोग्य सेवक दीपेश मेजारी यांनी आळवाडी झोपडपट्टीतील सर्व स्थानिकांची वैद्यकीय माहिती घेतली. मात्र, बालकांशिवाय अन्य कोणीही संशयित रुग्ण नाही.

कोणीही घाबरून जाऊ नये. रुग्णांमध्ये ताप, सर्दी किंवा अंगावर पुरळ आढळल्यास तत्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
- डॉ. मयुरेश पटवर्धन, वैद्यकीय अधिकारी, बांदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com