विनापरवाना चिरे वाहतूक करणाऱ्या 
दोन डंपरवर मळेवाड येथे कारवाई

विनापरवाना चिरे वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर मळेवाड येथे कारवाई

04446
मळेवाड ः विनापरवाना जांभा दगड वाहतूक करणारी जप्त केलेली वाहने. (छायाचित्र ः धनश्री मराठे)

विनापरवाना चिरे वाहतूक करणाऱ्या
दोन डंपरवर मळेवाड येथे कारवाई
मळेवाड ः मळेवाड व धाकोरे येथे अनधिकृत चिरे वाहतूक करणारे दोन डंपर सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी विनायक कोदे यांच्या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली. अनधिकृतरित्या जांभा दगडाची वाहतूक करणारे जीए ०३ के २२२८ व जीए २२ टी ३०२४ हे दोन डंपर जप्त करून सावंतवाडी तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले. पुढील दंडात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती कोदे यांनी दिली. धाकोरे येथील विनापरवाना जांभा दगडाचे उत्खनन होत असलेल्या खाणीवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत तहसीलदार उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू असल्याचेही कोदे यांनी सांगितले. गेल्यात आठवड्यात मळेवाड, आजगाव, धाकोरे या परिसरात अनधिकृत विनापरवाना चिरेखाणी सुरू असून त्याच्यावर कारवाई करा, असे निवेदन मनसेने सावंतवाडी तहसीलदार उंडे यांची भेट घेऊन दिले होते. विनापरवाना जांभा दगड वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरील कारवाईमुळे मनसेने दिलेल्या निवेदनाची महसूल विभागाने दखल घेतल्याचे दिसून येत आहे. या कारवाईमुळे विनापरवाना उत्खनन करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहेत.
---
कणकवलीत ‘आरआरआर’ केंद्र
कणकवली ः ‘मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर’ अभियानांतर्गत शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, कपडे, पादत्राणे, प्लास्टिक आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी ‘रिड्यूस, रियूज आणि रिसायकल’ म्हणजे ‘आरआरआर’ केंद्राची स्थापना केली आहे. यात संकलित केलेल्या जुन्या वस्तूंचे नूतनीकरण, पुनर्वापर, नवीन वस्तू तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्धेश आहे. ‘आरआरआर’ केंद्र ५ जूनपर्यंत रोज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत जुनी नगरपंचायत इमारत येथे सुरू असणार आहे. नागरिकांनी जुनी पुस्तके, कपडे, पादत्राणे, प्लास्टिक आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्याचा पुनर्वापर कण्यासाठी आणून द्यावीत. गरजू व्यक्ती आल्यास त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी. अधिक माहितीसाठी अमोल भोगले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.
........................
मंत्री केसरकरांच्या जर्मनी दौऱ्याची सांगता
सावंतवाडी : शिक्षण, पर्यटन आणि रोजगार याविषय़ी अभ्यासाकरिता १२ मे रोजी जर्मनीच्या दौऱ्यावर गेलेले शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर रविवारी (ता. २१) मुंबईत दाखल झाले. केसरकर यांचा जर्मनी दौरा चार दिवसांचा होता; परंतु तेथील पर्यटन, रोजगार आणि शिक्षण याविषयी सविस्तर माहिती घेण्याच्या दृष्टीने त्यांनी मुक्काम वाढविला. या दौऱ्यात केसरकर जर्मनीतील यांनी शिक्षण, पर्यटन आणि रोजगार याविषयी अभ्यास केला. जर्मनीत कौशल्य विकास आधारित रोजगार व नोकऱ्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना देण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार महाराष्ट्र सरकार आणि जर्मनीमध्ये करता येईल का, या दृष्टीने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.
--
आंबोलीत वीज केंद्राची मागणी
आंबोली ः आंबोली, चौकुळ, गेळे या भागासाठी माडखोल केंद्र दूर अंतरावर आहे. या भागात कोल्हापूर येथून वीज येत असल्याने आंबोली येथे केंद्र असणे गरजेचे आहे. यासंदर्भात ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करण्यात आली; मात्र दुर्लक्ष करण्यात आले. गेल्यावर्षी खासदार विनायक राऊत यांनी वीज वितरण कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून तशा सूचना दिल्या होत्या. आंबोलीत केंद्र तयार करून वीज कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. सध्या आंबोली, चौकुळ येथे फक्त एक वीज कर्मचारी आहे. या ठिकाणी पूर्वी पाच कर्मचारी होते. पावसाळ्यापूर्वी वीज तारांवर आलेली झाडेझुडपे तोडण्याची कामे गेली १५ वर्षे कर्मचाऱ्यांअभावी होत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात वारंवार बत्ती गुल होते. माडखोल केंद्रातील अधिकाऱ्याचे आंबोली भागावर लक्ष नसते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबरोबर सक्षम अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com