पान एक-केसरकरांच्या जिल्ह्यातील शिक्षणाची वाताहात थांबवा

पान एक-केसरकरांच्या जिल्ह्यातील शिक्षणाची वाताहात थांबवा

शिक्षणाची वाताहत थांबवा

ठाकरे गटाचा इशारा; रिक्त पदांमुळे शाळा चालवणे मुश्किल

सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यात रिक्त पदांमुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत लागली आहे. १२१ शाळा शिक्षक नसल्याने बंद होणार आहेत, तर अन्य ५०० हून अधिक मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये एक-दोन शिक्षकच कार्यरत राहिले आहेत. याचा त्या शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होणार आहे. जिल्हा परिषद स्व-निधीतून तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्त्या द्या; अन्यथा १५ जूनला सर्व पालकांसह विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिला आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आमदार नाईक व जिल्हाप्रमुख सावंत यांनी आज जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची भेट घेत जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत चर्चा केली. प्रशासनास निवेदन देऊन जिल्ह्यातील एकही शिक्षक नसलेल्या १२१ शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद स्व-निधीतून शिक्षकांच्या नियुक्त्या करा, अशी मागणी केली आहे. यावेळी चर्चा करताना सावंत यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत शिक्षक नसल्याने जिल्ह्यातील एकही शाळा बंद होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीमुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. अद्याप शिक्षक भरतीबाबत कोणताही निर्णय शासनाकडून घेतला गेलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा वाचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ज्या शाळेत एकही शिक्षक नाही तेथे नव्याने प्रवेश घेणाऱ्या मुलांना दाखल करून कोण घेणार? पोषण आहाराची व्यवस्था कोण सांभाळणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. याबाबत प्रशासनाच्यावतीने काय नियोजन केले आहे, याबाबत विचारणा केली. येथील मुलांचे नुकसान होऊ नये, शाळा बंद पडू नयेत, यासाठी जिल्हा परिषद स्व-निधीतून हंगामी शिक्षकांची भरती करा, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी माहिती देताना शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८०२ उपशिक्षक व ३१६ पदवीधर शिक्षक अशी एकूण १११८ पदे रिक्त झाली आहेत. शासन आदेशानुसार जिल्ह्यात १० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असतानाही ४५१ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने मुक्त करावे लागले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १२१ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही, तर अन्य मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्येही एक-दोन शिक्षकच कार्यरत राहिले आहेत. त्यामुळे शाळा आणि शाळांचा पट कायम राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. शिक्षक भरतीसाठी शासनाकडे टेट परीक्षा दिलेल्या उमेदवारांची यादी तयार आहे; मात्र भरतीबाबत अद्याप कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी काही कालावधी लागणार आहे, अशी माहिती यावेळी दिली.
---------------
कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ४५१ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त केले आहे, तर केवळ ११ शिक्षक जिल्ह्यात आले आहेत. अद्यापही १११८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक नाहीत अशा शाळांवर कामगिरीवर शिक्षक पाठवताना अनेक अडचणी येणार आहेत. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
- महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सिंधुदुर्ग.

कोट
सिंधुदुर्गात आधीच मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे असताना ती न भरता आंतरजिल्हा बदलीत शिक्षकांना मुक्त करण्यात आले आहे. ही शासनाची नवी चाल असून, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे षड्‌यंत्र आहे. कोकणासाठी शासनाने वेगळे धोरण राबवणे आवश्यक असताना डीएड उमेदवारांना टेट परीक्षेच्या चक्रव्युहात अडकविण्यात आले आहे. आता नव्याने होणाऱ्या भरतीमध्येही परजिल्ह्यातील उमेदवार जिल्ह्यात दाखल होणार आहेत. याचा शैक्षणिक दर्जावर परिणाम होणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालात आघाडीवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला रोखण्याचे धोरण शासन अवलंबित आहे. ते हाणून पाडण्यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलन केले जाईल.
- सतीश सावंत, जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.
-----------------
कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले आहेत. तरीही जिल्ह्याला अनेक समस्या भेडसावत आहेत. सर्वांना तत्त्वज्ञान सांगणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी आता शाळा वाचवण्यासाठी त्याचा वापर करावा. चुकीच्या निर्णयाने येथील गरीब विद्यार्थी आणि स्थानिक डीएड उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आणू नये. न पेक्षा याची किंमत मोजावी लागेल.
- वैभव नाईक, आमदार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com