स्वर्गीय संगीत आविष्कार

स्वर्गीय संगीत आविष्कार

प्रवास दशावताराचा

swt२५१७.jpg
M०४९३४
प्रा. वैभव खानोलकर
swt२५१८.jpg
०४९३५
दशावतार रंगमंचावरील संगीत साथीदार.

स्वर्गीय संगीत आविष्कार

लीड
नवजात बालकाचा जेव्हा जन्म होतो, तेव्हा जन्मतःच त्याच्या तोंडातून रडण्याचा आवाज बाहेर पडतो. तो काळजाचा ठाव घेणारा आवाज देखील एक सुखद आणि आनंदाचा ध्वनी निर्माण करतो, म्हणजेच जन्मजात सूर आपल्या साथीला असतात. संगीत आपल्यासोबतच जन्म घेते आणि भारतीय संस्कृतीमध्ये संगीताला खूप मोठी प्राचीन परंपरा आहे. दशावतार हा लाल मातीचा स्वतंत्र आणि उत्स्फूर्त आविष्कार. दशावतारातील ‘सफेद चार’मधले संगीत म्हणजे दशावतारी जगताची अजून एक खासियत. गायन आणि वादन मिळून संगीत निर्माण होते. संगीतातील ‘सं’ म्हणजे स्वर, ‘गी’ म्हणजे गीत आणि ‘त’ म्हणजे ताल होय. संगीत कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. अशा या संगीताची छाप दशावतार लोककलेवरही आवर्जून दिसते.
- प्रा. वैभव खानोलकर
..............
दशावतारात हार्मोनियमपूर्वी तबला-डग्गा आज अपवादात्मक स्थितीत दिसतो; पण बहुतांश ठिकाणी पखवाज किंवा मृदंग आणि झांज हा त्रिवेणी संगम म्हणजे दशावताराचे भारदस्त संगीत. आड दशावतारात मात्र हार्मोनियम शक्यतो वाजविली जात नाही, तर त्यात साथ संगत करताना पखवाज (मृदंग) आणि झांज ही केवळ दोनच वाद्ये संगीत साथीसाठी वापरली जातात.
अनादी काळापासून चालत आलेल्या या लोककलेला स्वतःचे असे वेगळ्या धाटणीच्या संगीताची परंपरा आहे आणि आजही ती विशेष जपली जाते. अनेकांना या संगीताची भुरळ पडते, चालणारी पावले जागीच विसावतात आणि हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने वेग घेतात. झोपलेली माणसेही जागी होतात आणि स्वर्गीय संगीताचा आनंद घेतात. हार्मोनियम वादकांची नागिणीसारखी सरसर करत बोटे काळ्या-पांढऱ्या स्वरांवर लीलया नाचू लागतात, मृदंगावर थाप पडते अन् अंगावर शहारे येतात. झांजीची मंजुळ किनकिन नादब्रम्ह आळवते.
सगळे वातावरणच बदलून जाते. दशावतारी संगीत साथ हे दशावतारातील जबाबदारीचे आणि महत्त्वपूर्ण अंग. दशावतार नाट्यपुष्प उंचीवर नेण्यात संगीत साथीचे योगदान खूपच मोलाचे मानले जाते. काही जाणकार रसिक, अभ्यासक आणि कलावंतांच्या मते ज्याची संगीत साथ दमदार, त्यांचे नाटकही दमदार. दशावतार कला क्षेत्रात संगीत साथीला विशेष पसंती असते. अनेक रसिक केवळ संगीत साथ ऐकण्यासाठी आलेले असतात. अलिकडे दशावतारात झालेला एक सुंदर बदल म्हणजे आज अनेक मंडळांत संगीत साथीदार एकाच वेषात दिसतात.
पारंपरिकता जपताना नाट्यप्रयोग सुरू होण्याआधी पहिली ‘नवलगुरु रायाची’ ही आरती संगीत साथीदारांसह दशावतारी कलावंतांकरवी पथारीवर म्हणजे रंगपटावर केली जाते. याला दशावतारी नाटकाची ‘नांदी’ असेही म्हटले जाते; मात्र ही आरती आड दशावतारात म्हणजे धयकाल्यात केली जात नाही. यानंतर रंगमंचावर संगीत साथीदार गणपती स्तवन करतात आणि गणेश दर्शनाने नाट्यपुष्पाला सुरुवात होते. गणेश रंगमंचावरून माघारी गेल्यावर कथानक सुरू करण्यापूर्वी जे गीत सादर होते, त्याला दशावतारी भाषेत ‘ठुमरी’ असे म्हटले जाते. खलनायकाचा प्रवेश असेल तर ‘धमार’ सादर केला जातो आणि नायक, राजा या पात्रांच्या प्रवेशावेळी ‘त्रिताल’ वाजविला जातो. राणी, नायिका आदी स्त्री व्यक्तिरेखा रंगमंचावर आणताना संबंधित प्रसंग कोणता आहे, याचे भान ठेवूनच संगीत देण्याची किमया साथीदार करतात.
महाविष्णू, शंकर, ब्रम्हदेव, कृष्ण, राम आदी रंगमंचावर आणताना संबंधित देवाची स्तुतीपर गाणी वाजविली जातात. संगीत साथीदार नेमका कोणते गीत वा स्वर आळवतात, यावरून रंगमंचावर कोणते पात्र येणार, हे दशावतार रसिक सहज ओळखतात, इतकी ही लोककला जनमानसांत रुजलेली दिसते. मात्र, नादर महर्षी रंगमंचावर येताना गाणे आळवत येताना दिसतात. युध्दापूर्वी ‘झंपा’ अर्थात ‘वीरश्री’ गीत रंगकर्मीकडून सादर होते. युध्दाआधी सादर होणारा पदन्यास ज्याला ‘लंगार नृत्य’ म्हणतात, त्याचे प्रसंगानुरूप गायन सुध्दा दशावतार लोककलेत महत्त्वाचे मानले जाते. शाब्दिक जुगलबंदी, संवाद, स्वगत, अतिप्रसंग आदी गोष्टी संगीत साथीदार आपल्या खुबीने खुलवतात आणि दशावतार नाट्यपुष्पाला उंचीवर नेऊन ठेवतात.
दशावतार नाट्य कला सादर करताना जे कलावंत व्यक्तिरेखा साकारतात, ते रंगमंचावर येतात, आपला प्रवेश सादर करतात आणि माघारी परतात. साधारणतः नाटक जर तीन ते चार तास झाले, तर रंगकर्मींच्या वाट्याला साधारणपणे १५ ते २० मिनिटे येतात; पण संगीत साथीदार एकदा का रंगमंचावर सादरीकरण करण्यासाठी आले की, नाट्यपुष्प संपेपर्यंत त्यांना आपल्या स्थानावरून उठता येत नाही. अशाही परिस्थितीत आपल्या वादक कलावंतांना चहा सुध्दा रंगमंचावर पुरवला जातो. वादक कलाकारांचा चहा पिऊन होईपर्यंत रंगकर्मी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना खिळवून ठेवतात. अगदी समोर नाटक सुरू असते आणि वादक चहा पिऊन मोकळेही होतात, ते समोरच्या प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी अन् नाट्यपुष्पात रंग भरण्यासाठी. दशावतारातील स्वर्गीय संगीताचा सफेद चारमधील गायनासह वादनाचा साक्षात्कार अनुभवायचा असेल, तर नक्की पाहा कोकणच्या लाल मातीतला दशावतार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com