देवगडमध्ये कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष

देवगडमध्ये कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष

देवगडमध्ये कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष

आशिष लोकेंची खंत; कार्यवाहीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

देवगड, ता. २७ ः येथील देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाकडे येथील आशिष लोके यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून कचरा समस्येचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
याबाबत लोके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवगड जामसंडे नगरपंचायतीमार्फत दारोदारी जाऊन जमा केलेल्या ओला सुका घनकचऱ्याची कायद्यातील तरतुदींनुसार विल्हेवाट लावली जात नाही. जमा केलेला कचरा इतस्तः टाकून परिसरातील मनुष्य जीवनास व जैवविविधतेस हानी पोहोचत आहे. जमा केलेला कचरा टाकण्याकरिता येथील पवनचक्की भागातील एका खासगी जागेचा वापर केला जात आहे. ही जागा बंदिस्त नसून कचरा जमा करून ठेवण्याच्या जागेकरिता कायद्याने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करणारी नाही. खासगी जागेस लागूनच जैवविविधतायुक्त असा जंगलमय भाग आहे. जमा केलेल्या घन कचऱ्यातील सुका कचरा नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी तेथेच जाळून टाकत आहेत. आगीचा परिसरातील झाडांवर व जैवविविधतेवर विपरित परिणाम झाला आहे. तेथील झाडे होरपळून गेली आहेत. जमा केलेला कचरा जाळणे कायद्यातील तरतुदीनुसार प्रतिबंधित आहे. प्लास्टिकयुक्त सुका कचरा जाळून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण देखील होत आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या जागेपासूनच उतार सुरू होतो. येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होईल. जागेत जमा करण्यात येणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी दूषित होऊन परीसरातील मनुष्यवस्तीतील विहिरींमध्ये तसेच पाण्याच्या इतर स्रोतांमध्ये मिश्रित होईल. असे दूषित पाणी पिऊन लोकांमध्ये विविध आजार पसरण्याची व जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. परिसरातील वनस्पती व प्राणी जीवनावर या सर्वांचा विपरित परिणाम होणार आहे. पवननचक्की येथील जागेमध्ये कचरा जमा करण्यापूर्वी जामसंडे येथील एका खासगी जागेत कचरा जमा करण्यात येत होता. ही जागा देखील उंचावर आहे. त्यामुळे देखील प्रचंड प्रमाणात वायू व जल प्रदूषण होत आहे. अद्यापही त्या जागेमध्ये जमा केलेल्या कचर्‍याचे ढीग तसेच पडून आहेत. दोन्ही जागा बंदिस्त नसून तेथे जंगली जनावरे, गुरेढोरे, भटकी कुत्री आदी जाऊन कचरा खात असतात. त्यामुळे जनावरांमध्ये देखील रोगराई पसरून परिसरातील नागरिकांमध्ये जीवघेण्या स्वरुपाचे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. यापूर्वी नगरपंचायतीमार्फत पवनचक्कीजवळ अन्य एका ठिकाणी कचरा टाकला जात होता. त्याबद्दल नागरिकांनी आवाज उठवला होता. त्यानंतर तेथे कचरा टाकणे बंद करण्यात आले; परंतु आता पुन्हा तोच प्रकार सुरू आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरून सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
.....................
चौकट
... अन्यथा आंदोलन
जिल्हास्तरावरून या प्रकरणी तातडीने कार्यवाही न झाल्यास ही बाब शासन व प्रशासनाच्या पटलावर आणण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही आशिष लोके यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com