
लेखकांनो, निर्भयपणे व्यक्त व्हा
05545
वेंगुर्ले ः डॉ. गोविंद काजरेकर, कल्याण श्रावस्ती यांना पुरस्कार प्रदान करताना ॲड. देवदत्त परुळेकर, कवी बुध्दभूषण साळवे, जयप्रकाश चमणकर, कवी सिद्धार्थ तांबे, अध्यक्ष अनिल जाधव, प्रभाकर जाधव, कवी वीरधवल परब, संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव आदी.
लेखकांनो, निर्भयपणे व्यक्त व्हा
डॉ. गोविंद काजरेकर; वेंगुर्लेत राज्यस्तरीय काव्य पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २८ ः आजचा काळ हा विपरित आहे. एका बाजूला संविधानविरोधी आणि मूलतत्त्ववादी प्रवृत्ती बळकट होताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला समुहाच्या सुखदुःखातून स्वतःला सहजपणे बाजूला काढून स्वतःपुरता एकेकट्याचा समाज निर्माण होऊ लागला आहे. समाजाने पुन्हा एकदा वेगाने वर्णवादी अवस्थेत रुपांतर होण्याच्या या काळात कवी, लेखकांनी आपली ऊर्जा व विचारसत्त्व टिकवून ठेवत निर्भयपणे व्यक्त होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन डॉ. गोविंद काजरेकर यांनी येथे केले.
विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. फाउंडेशनचे संस्थापक अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी वीरधवल परब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर, नाथ पै सेवांगणचे अॅड. देवदत्त परुळेकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रभाकर जाधव आदी उपस्थित होते. यावेळी ‘जीवनसत्व’, ‘तूर्तास तरी’, ‘सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने’ या कविता संग्रहांचे कवी अनुक्रमे कल्याण श्रावस्ती (सोलापूर), बुद्धभूषण साळवे (नाशिक), सिद्धार्थ तांबे (सिंधुदुर्ग) यांना मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. काजरेकर म्हणाले, ‘‘प्रत्येक कवी आपल्या काळाचे प्रश्न मांडत असतो. आज आपल्यासमोर अनेक प्रकारची भीतीदायक परिस्थिती उभी ठाकलेली दिसते. ती सर्व क्षेत्रीय आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक हाराकिरी अशा सगळ्या आघाड्यांवर एक दारुण उबग आणणारी परिस्थिती आपण अनुभवतो आहोत. कवी म्हणून आजचे हे सर्वाधिक भ्रष्ट वास्तव समजून घेत अधिक टोकदारपणे लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे.’’
अध्यक्षीय समारोप करताना अनिल जाधव म्हणाले, ‘‘परिवर्तनाची भूमी आणि भूमिका अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने गेली सात वर्षे सातत्याने विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशनतर्फे काव्य पुरस्कार वितरित केले जात आहेत. आज सर्वत्र प्रतिगामी, वर्णवादी मनोभूमिकांच्या प्रतिमा प्रतिकांची जाणीवपूर्वक उभारणी करून सामान्य जनतेची दिशाभूल केली जात आहे. अशा परिस्थितीत बहुजन हिताचे आपले खरे सांविधानिक आदर्श रुढ केले पाहिजेत आणि प्रतिगामी शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी समाजातील बुद्धिजीवी वर्गाने विवेकनिष्ठ मानवतावादी विचारधारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई काव्य पुरस्काराच्या माध्यमातून हाच विचार सर्वदूर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’
या कवी संमेलनात ज्येष्ठ कवी अरुण नाईक, मोहन कुंभार, डॉ. संजीव लिंगवत, मनीषा जाधव, सरिता पवार, पी. के. कुबल, कल्याण श्रावस्ती, सिद्धार्थ तांबे, बुद्धभूषण साळवे, गोविंद काजरेकर, वीरधवल परब यांनी सहभाग घेतला. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. राकेश वराडकर यांनी स्वागत केले. सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले. विशाखा जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदिशा जाधव, संचिता जाधव, प्राशिल जाधव यांनी परिश्रम घेतले.
---
चौकट
रूढी परंपरेच्या नावाखाली स्त्री बंदिस्त
कवी संमेलनाच्या अध्यक्षा कल्पना मलये म्हणाल्या, ‘‘धार्मिक प्रतिकांचा मारा करत बहुजन समाजाला पुन्हा एकदा मनुवादी काळात ढकलण्याचे मनसुबे आज सर्वत्र दिसतात. त्याचा सर्वाधिक फटका स्त्रियांना बसण्याची शक्यता आहे. स्त्री कोणत्याही समाजातील असो, ती कायम शोषित राहिली आहे. रूढी परंपरांच्या नावाखाली स्त्रियांना पुन्हा एकदा बंदिस्त जगात नेण्याचे कारस्थान वेळीच ओळखून येणाऱ्या पिढीला निव्वळ सत्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला वारंवार प्रयत्न करावे लागणार आहेत.’’