
सावंतवाडीत भरवस्तीत घरफोडी करण्याचा प्रयत्न
सावंतवाडीत भरवस्तीत
घरफोडी करण्याचा प्रयत्न
सालईवाड्यात दंगा केल्याने चोरटे पसार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः येथील सालईवाडा भागातील निवृत्त एसटी अधिकारी सुधीर भोगटे यांचे घर अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला; परंतु, हा प्रकार लक्षात आल्यानंतर तेथील काही लोकांनी आरड-ओरड केली. त्यामुळे चोरटे पसार झाले. हा प्रकार शनिवारी (ता.२७) रात्री दिडच्या सुमारास घडला. यात सुदैवाने काहीही चोरीला गेले नाही; परंतु, चोरट्याने दरवाजाचे नुकसान केले आहे. याबाबतची माहिती माजी नगरसेवक सुरेद्र बांदेकर यांनी दिली. अशा प्रकारे भरवस्तीत चोरीचे होणारे प्रकार रोखण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
अधिक माहिती अशी की ः येथील सालईवाडा भागात श्री. भोगटे राहतात. त्यांची मुले मुंबईत असल्यामुळे ते दोन दिवसापूर्वी आपल्या अन्य सदस्यांसमवेत त्या ठिकाणी गेले होते. यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून त्या चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने उचकटला आणि आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाजूला राहणार्या काहींनी तोड-फोडीचा आवाज आल्यामुळे त्या चोरट्यांनी तेथून पलायन केले. या चोरीत काही चोरीला गेले नाही. याबाबतची माहिती मिळताच श्री. बांदेकर यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. भोगटे कुटुंब हे मुंबईत असल्यामुळे त्यांना याबाबतची दूरध्वनीवरुन कल्पना दिली. मात्र, भरवस्तीत हा प्रकार घडल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत पोलिसांनी गंभीर भूमिका घेवून योग्य ती कार्यवाही करावी. शहरात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.