
सेवारस्ते करा; अन्यथा आंदोलन
05858
नेमळे ः महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत येथे आयोजित बैठकीत ग्रामस्थांनी प्रशासनास धारेवर धरले.
सेवारस्ते करा; अन्यथा आंदोलन
नेमळेवासीयांचा इशारा; महामार्गावरील अपघातांबाबत प्रशासनास जाब
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः झाराप-पत्रादेवी बायपासवर होत असलेले अपघात हे महामार्ग बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने महामार्ग बनविल्याने होत आहेत. रस्ता ओलांडण्यासाठी बनविलेल्या बॉक्सवेलपर्यंतचे सेवारस्ते आठ दिवसांत तयार करावेत. तसेच अपघात न होण्याच्या दृष्टीने इतर उपाय योजनाही कराव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा नेमळे गावातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
दोन दिवसांपूर्वी नेमळे येथे महामार्गालगत मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर सलग दोन दिवसांत दोन अपघात झाले. यात नेमळेतील युवक जागीच ठार झाला. तर एका महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले. या महामार्गावर वारंवार अपघात होतात, याला राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारीच जबाबदार आसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याबाबत काल (ता. २९) नेमळे ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी व ग्रामस्थांसमवेत राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश खटी यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी उपअभियंता खटी यांना धारेवर धरले. दरम्यान, यावेळी महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता खटी यांच्यासह सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, महामार्गचे अभियंता साळुंखे, शाखा अभियंता कांबळे, नेमळे सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक चौहान, तलाठी पाटोळे व नेमळे ग्रामस्थ उपस्थित होते.
--
आठ दिवसांची डेडलाईन
महामार्ग बेजबाबदारपणे निष्काळजीपूर्वक बनवून ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी उभारलेल्या बॉक्सेलमधून पलीकडे जाण्या-येण्यासाठी सेवारस्ते असते तर आज अनेकांचे प्राण वाचले असते, असा आरोप ग्रामस्थांनी केला. येत्या आठ दिवसांत बॉक्सेलपर्यंत जाण्या-येण्यासाठी सेवारस्ते, सर्कलवर दिशादर्शक, चिन्हांचे फलक, गॅस पाईप लाईनसाठी खोदाई करून धोकादायक केलेल्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास नेमळेतील सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला.