साडेचार हजार मच्छीमारी नौका विसावल्या

साडेचार हजार मच्छीमारी नौका विसावल्या

rat३१p५.jpg
M०६०७०
रत्नागिरीः पांढरा समुद्र येथे क्रेनच्या साह्याने मासेमारी नौका सुरक्षित ठिकाणी आणताना खलाशी. (राजेश कळंबटेः सकाळ छायाचित्रसेवा)
-------------
साडेचार हजार मच्छीमारी नौका विसावल्या
आजपासून बंदी कालावधी सुरू ; नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर
रत्नागिरी, ता. ३१ः शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू होत असून अनेक मच्छीमारांनी नौका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सुरवात केली आहे. साडेचार हजाराहून अधिक नौका किनाऱ्यावर विसावल्या आहेत. मात्र, यंदा अजूनही पावसाची चिन्हे नाहीत, समुद्रही खवळलेला नाही. त्यामुळे बंदी मोडून काही मच्छीमार समुद्रात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर मत्स्य विभागाकडून करडी नजर ठेवली जाणार असून बंदरांवर अधिकारी नेमण्यात येणार आहेत.
जानेवारीपासून पर्ससिननेटद्वारे मासेमारी करण्यासाठी बंदी असते तर ट्रॉलिंग किंवा यंत्राद्वारे मासेमारी करणाऱ्यांसाठी ३१ मे रोजी रात्री बारा वाजल्यानंतर बंदी कालावधी सुरू होता. ही बंदी पावसाळ्यातील दोन महिन्यांसाठी असते. गेल्या काही दिवसात अनेक मच्छीमारांनी मासळी मिळत नसल्याने नौका किनार्‍यावर ओढण्यास सुरवात केली होती. कर्नाटक, नेपाळसह विविध राज्यातून आलेले खलाशीही माघारी परतले आहेत. काही मच्छीमारांनी जाळी सुकवून सुरक्षित ठेवली आहेत तर काहींनी रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथे जाळी सुकवण्यासाठी ठेवली आहेत. नौकांची तात्पुरती डागडुजीही केली आहे. मिरकरवाडा बंदरात पाचशेहून अधिक नौका उभ्या करून ठेवल्या आहेत. पावसाळ्यात वादळवारे याचा धोका असल्यामुळे नौका सुरक्षित लावलेल्या आहेत. पांढरा समुद्र येथे छोट्या यांत्रिकी नौका क्रेनच्या साह्याने किनाऱ्यावर आणलेल्या आहेत. त्यावर प्लास्टिक कव्हर टाकले आहे.
मोसमी पाऊस लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आकाशही निरभ्र असून, समुद्र खवळलेला नाही. त्यामुळे बंदी मोडून मच्छीमारी सुरू राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन मत्स्य विभागाने मासळी उतरवणार्‍या जिल्ह्यातील २७ केंद्रांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी क्षेत्रीय परवाना अधिकारी, सागरी सुरक्षादलाचे कर्मचारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
---------------
चौकट
बांगड मिळाला; पण दर घसरले
यंदाचा हंगाम मच्छीमारांसाठी ना नफा ना तोटा असाच गेला आहे. अपेक्षित उत्पादन नसल्यामुळे आर्थिक उलाढालीवर परिणाम झाल्याचे मच्छीमारांचे मत आहे. नौकांना लागणारे इंधन, बर्फ, खलाशी पगार शिवाय अन्य गोष्टींसाठीचा खर्च वाढला असून त्या प्रमाणात मासे मिळत नाही. त्यामुळे मच्छीमारांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. यावर्षी महाराष्ट्र, कर्नाटकसह किनारी राज्यात मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात बांगडा मिळत होता त्यामुळे दर घसरले. म्हाकूळ, चिंगळं, पापलेट, सुरमई, तार्ली याचे प्रमाण अल्प होते. त्याला चांगला दर असला तरीही उत्पादन कमीच होते.
-----------------
कोट
यंदाचा हंगाम पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्‍यांसाठी यथातथाच गेला. ऑगस्ट ते मे या कालावधीत अवघे ५० दिवसही मासळी सापडलेली नाही. मिळालेल्या मासळीला अपेक्षित दर नव्हता. नौकांना लागणारे डिझेल, खलाशांचा पगार यामध्येच आलेले पैसे खर्च झाले.
- अभय लाकडे, मच्छीमार
--------------
कोट
किनारी भागात मासे प्रजननासाठी येत असतात. त्यामुळे १ जून ते ३१ जुलै या कालावधीत बंदी असते. अजूनही पावसाची चिन्हे नाहीत. त्यामुळे बंदी तोडून कुणी मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी गेले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- एन. व्ही. भादुले, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com