सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीसाठी ‘सीएम’ना साकडे

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीसाठी ‘सीएम’ना साकडे

06507
सिंधुदुर्गनगरी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली. शेजारी ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल.


सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीसाठी ‘सीएम’ना साकडे

राजन तेली; मुख्यालयासाठी १०० कोटींची मागणी

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः ‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या प्रारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (ता.६) जिल्हा दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे या दौऱ्यात भाजप पक्ष सिंधुदुर्गनगरी तात्काळ नगरपंचायत जाहीर करावी. जिल्ह्याच्या राजधानीचा रखडलेला विकास करण्यासाठी विशेष बाब म्हणून १०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल उपस्थित होते. यावेळी तेली यांनी या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत आदी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
श्री. तेली म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गनगरी ही जिल्ह्याची राजधानी आहे. त्यामुळे येथे नगरपंचायत होणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्यालय विकासासाठी प्राधिकरण स्थापन केले आहे; परंतु, अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे येथे लवकरात लवकर नगरपंचायत व्हावी, असे सर्वांना वाटते. नेमकी हीच मागणी भाजप पक्ष मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ही मागणी करण्यात येणार आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘केंद्रीयमंत्री नारायण राणे पालकमंत्री असताना अनेक प्रकल्प सुरू केले होते. अनेक प्रकल्प प्रस्तावित होते; परंतु, मधल्या काळात अपेक्षित लक्ष दिले गेले नाही. यातील काही प्रकल्प अन्यत्र हलविले गेले. त्यामुळे येथील रखडलेला विकास भरून काढण्यासाठी निधीची गरज आहे. २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर २५ कोटी जाहीर केले होते. त्यातील शिल्लक राहिलेला निधी आणण्याचा पालकमंत्री चव्हाण प्रयत्न करीत आहेत; परंतु, यापेक्षा जास्त निधीची गरज आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीसाठी तसेच यामध्ये येणाऱ्या तीन गावांचा विकास साधण्यासाठी १०० कोटी रुपये विशेष निधीची गरज आहे. तशी मागणी भाजप मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करणार आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा निधी उपलब्ध करून देतील असा विश्वास आहे.’’
-----------
चौकट
कार्यक्रम यशस्वी करू
कुडाळमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत होत असलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम जिल्ह्याचा आहे. त्यामुळे हा कार्यक्रम भाजप व शिवसेना यशस्वी करणार आहे. भाजपच्या बैठकीस किमान १५ ते २० हजार लोक यावेळी उपस्थित राहतील, असे नियोजन केले आहे. पालकमंत्री चव्हाण यांनीही सरकारी यंत्रणेचा आढावा घेतला आहे. तेथे आवश्यक सुविधा पुरविल्या जातील. १०० बसेस बुक करण्यात येणार आहेत, असे यावेळी तेली म्हणाले.
-----------
चौकट
उद्योगमंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा
किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी स्वतंत्र निधी मागितला जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आडाळी एमआयडीसी येथे अपेक्षित व्यावसायिक येण्यासाठी गरजेच्या सुविधा पुरवून पोषक वातावरण निर्माण करण्याची मागणी करण्यात येणार आहे. चीपी विमानतळ परिसरात एमआयडीसी सुरू करण्याची मागणी करणार आहोत. चीपी विमानतळाचा विकास साधण्यासाठी एकत्रित बैठक घेण्याची मागणी करणार आहोत. याचबरोबर तोंडवळी येथील प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्पाला मान्यता देण्याची सुद्धा यावेळी मागणी करण्यात येणार असल्याचे तेली यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com