
सावंतवाडीत लाकडी खेळण्यांचे म्युझियम
07205
सावंतवाडी ः येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याच्या कामाच्या ठिकाणी पाहणी करताना व कार्यकर्त्यांना सूचना करताना मंत्री दीपक केसरकर.
सावंतवाडीत लाकडी खेळण्यांचे म्युझियम
दीपक केसरकर; मुख्यमंत्री शिंदेंचा आज नागरी सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः शहराला भरभरून निधी देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या (ता.६) भव्य दिव्य असा नागरी सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी सत्कार समिती नियोजित केली असून युवराज लखमराजे यांच्या अध्यक्षस्थानी असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. येणाऱ्या काळात सावंतवाडी शहर अद्यावत करण्यात येणार असून सावंतवाडीची लाकडी खेळण्यांची हस्तकला जपण्यासाठी या ठिकाणी म्युझियम बांधण्यात येणार आहे. त्यामुळे शहर सुंदर होत असताना सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे श्री. केसरकर म्हणाले.
मंत्री केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री शिंदे यांनी आत्तापर्यंत शहरासाठी जवळपास ९० कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरावर त्यांचे असलेले प्रेम लक्षात घेता त्यांचा उद्याच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त जाहीर नागरी सत्कार केला जाणार आहे. यासाठी संस्थानचे युवराज लखमराजे यांच्या अध्यक्षतेखाली नागरी सत्कार समिती गठीत करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या हस्ते येथील भाजी मंडईच्या नव्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. या इमारतीसाठी साडे पंधरा कोटी रुपयांच्या निधीचा पहिला टप्पा पालिकेकडे जमा झाला आहे. एकूण दोन टप्प्यात हे काम होणार असून वर्षभरात इमारतीचे काम मार्गी लावण्यात येणार आहे; परंतु हे करताना व्यापारी वर्गाचे काम थांबू नये, यासाठी त्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. नविन भाजी मंडईमुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न मिटणार आहे. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त (कै.) रमाकांत आचरेकर क्रिकेट ड्रेसिंग रूम याशिवाय क्रीडा संकुलनाचे भूमिपूजनही होणार आहेत. दोडामार्ग रुग्णालय, सावंतवाडी शासकीय पर्णकुटी विश्रामगृह, याशिवाय दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथील तालुका क्रीडा संकुलन व ग्रामीण रुग्णालयाच्या कामाचेही भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.’’
मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘येथील जिमखाना मैदानाची रुंदी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे क्रिकेट मैदानाबरोबरच कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल व इतर क्रीडा मैदाने या ठिकाणी उभारली जाणार आहेत. परिपूर्ण असे स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या पंधरा दिवसात याचेही लोकार्पण केले जाणार आहे. सावंतवाडी शहराची लाकडी खेळण्याची परंपरा जपण्यासाठी या ठिकाणी म्युझियम उभारले जाणार आहे. मटण मार्केटची इमारतही जुनी झाली असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. लवकरच हे कामही सुरू केले जाणार आहे. सावंतवाडी बस स्टॅन्ड व शहरातील नाल्यांचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे सावंतवाडी शहर सुंदर होत असताना सर्वांच्या सहकार्याचे ही आवश्यकता आहे. एकूणच हे सर्व करत असताना येथील पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबरोबरच उद्योग मंत्री उदय सामंत यांचे सहकार्य आपल्याला मिळाले. त्यामुळे त्यांचा मी आभारी आहे.’’
-----------
चौकट
‘मल्टीस्पेशलिटी’चे ऑनलाईन भूमिपूजन
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न बुधवारच्या कॅबिनेटमध्ये मार्गी लागणार आहे. त्यामुळे आता भूमिपूजन करणे योग्य नसल्याने पुढच्या टप्प्यात ऑनलाईन पद्धतीने मल्टीस्पेशालिटी कामाचे भूमिपूजन होणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.