कणकवलीत तीव्र पाणी टंचाई

कणकवलीत तीव्र पाणी टंचाई

07486
कणकवली : शहरातील गडनदीपात्र आटल्‍याने संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.
---------
07485
कणकवली : नदी, विहिरी आटल्‍यामुळे शहरातील नागरिकांना टँकरमधून पाणी आणण्याची वेळ आली आहे.


कणकवलीत ‘ठणठणाट’

‘गड’, ‘जानवली’चे पात्र आटले; टँकरने पाणी आणण्याची वेळ

कणकवली, ता.६ : कणकवली शहर आणि परिसरातील नागरिकांना सध्या तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराला लागून असलेल्‍या गड आणि जानवली नदीपात्रे कोरडी पडली, त्‍यामुळे विहिरींतील पाणीसाठा संपला आहे. अनेक निवासी संकुलांना तर टँकरमधून पाणी आणण्याची वेळ आली आहे.
अद्याप मॉन्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. त्‍यामुळे पाऊस उशिरा येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्‍यामुळे शहर आणि परिसरातील नागरिक हवालदिल झाले असल्‍याचे चित्र आहे. दरम्‍यान गड नदीत शिवडाव धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी केव्हा शहर हद्दीत येणार याची प्रतीक्षा शहर आणि परिसरातील नागरिकांना लागून राहिली आहे. कणकवलीकरांना अनेक वर्षानंतर तीव्र उष्मा आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागला आहे. यंदा गडनदीपात्रातील केटी बंधाऱ्यामध्ये पाणी अडविण्यात उशीर झाला. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात केटी बंधाऱ्यात पाणी अडविण्यास सुरूवात झाली. तोपर्यंत पाण्याचे प्रवाह संपत आल्‍याने गडनदीपात्रातील बंधाऱ्यात पाणीसाठा झाला नाही. तर पाटबंधारे विभागाने आश्‍वासन देऊनही हरकुळ येथील गणेश तलावातील पाणी जानवली नदीपात्रात सोडले नाही. त्‍यामुळे गड आणि जानवली या दोन्ही नदीपात्रात सध्या ठणठणाट असल्‍याचे चित्र आहे.
---
शहरवासीयांचा पाणीपुरवठा पुन्हा ठप्प
कणकवली शहरात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाणी टंचाईला सुरवात झाली होती. त्‍यावेळी नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी अडीच लाख रूपयांची पाणीपट्टी भरली. त्‍यानंतर शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात सोडण्यात आले. मात्र हे पाणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्‍यात संपले. त्‍यामुळे २ जून पासून कणकवली शहराचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. आता शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात आल्‍यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्‍यता आहे.
---
ग्रामपंचायती, नगरपंचायतीचेही दुर्लक्ष
गडनदीपात्रात नरडवे ते रामगड हद्दीपर्यंत १४ केटी बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यात पाणीसाठा करायचा असल्‍यास नदीलगतच्या ग्रामपंचायती, नगरपंचायतींनी पाटबंधारे विभागास लेखी पत्र देणे आवश्‍यक असते. हे ऑक्‍टोबर अखेर पर्यंत हे पत्र मिळाल्‍यानंतर निविदा काढून पाटबंधारे विभागामार्फत केटी बंधाऱ्यामध्ये पाणी अडविले जाते. यंदा पाणी अडविण्याबाबत पाटबंधारे विभागाला एकाही ग्रामपंचायतीकडून पत्र प्राप्त झाले नाही. त्‍यामुळे केटी बंधाऱ्यामध्ये पाणी अडविण्याचे काम लांबणीवर पडले.
---
लोकप्रतिनिधींच्या पत्राला केराची टोपली
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी कणकवली तहसीलदार यांच्याकडे जानवली नदीत गणेश तलावाचे तर गडनदीपात्रात शिवडाव धरणाचे पाणी सोडण्याबाबतची निवेदने देण्यात आली होती. तर तहसील कार्यालयानेही याबाबत पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाला नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत कळविले होते. परंतु लोकप्रतिनिधींच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली असून प्रत्‍यक्षात पाणी सोडण्यात आलेले नाही.
----------
कोट
शिवडाव धरणाचे पाणी सोडण्याबाबतचे पत्र पाटबंधारे विभागाला दहा दिवसांपूर्वीच दिले आहे. तर पाटबंधारे विभागानेही शिवडाव धरणातील पाणी गडनदीपात्रात सोडले असून एक-दोन दिवसांत हे पाणी गडनदीपात्रात येणार असून लवकरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
- अवधूत तावडे, मुख्याधिकारी, कणकवली
-------------
नगरपंचायतीच्या तत्‍कालीन सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरात पाणी टंचाई आहे. शहरातील रस्ते, गटारांच्या कामात टक्‍केवारी मिळविण्यामध्ये सत्ताधारी गुंतून पडले. टंचाई निवारण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही. त्‍यामुळे ही समस्या आहे.
- - सुशांत नाईक, नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com