रत्नागिरी ः संक्षिप्त

रत्नागिरी ः संक्षिप्त

पान ५ साठी

शासकीय तंत्रनिकेतनच्या
प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू
रत्नागिरी ः तंत्रनिकेतन प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेत, रत्नागिरी येथे सुविधा केंद्र सुरू केले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १ ते २१ जूनपर्यंत मुदत आहे. तात्पुरते कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती तर तात्पुरती गुणवत्ता यादी २३ जून, गुणवत्ता यादीवरील आक्षेप अर्ज दुरुस्ती २४ जून, अंतिम गुणवत्ता यादी २९ जूनला जाहीर केली जाईल. डिप्लोमा प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अर्ज भरणे, विविध प्रवेश फेऱ्या, निवड झालेल्या संस्थेत प्रवेश निश्चितीचे वेळापत्रक Poly२३. dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज शुल्क ४०० रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये आहे. ऑनलाईन पद्धतीमध्ये E-Scrutiny व Physical Scrutiny (प्रत्यक्ष हजर राहून पडताळणी) असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यामधील E-Scrutiny पर्यायाने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा केंद्रावर (एफसी) न जाता स्वतः कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा असून त्यांची कागदपत्रे व अर्ज सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पडताळून निश्चित करण्यात येतील. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष हजर राहून स्वतःच्या अर्जाची नोंदणी व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी लागतील. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी १२०, संगणक अभियांत्रिकी ६०, विद्युत अभियांत्रिकी ६० असे एकूण ४८० विद्यार्थी प्रवेशक्षमतेसह, अणुविद्युत आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी ६०, यंत्र अभियांत्रिकी १२० तर मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी प्रवेशक्षमता ६० असे एकूण ४८० विद्यार्थी प्रवेशक्षमता आहे. गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षात ५६ विद्यार्थ्यांचे कॅम्पस प्लेसमेंट झालेले असून, अजूनही प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनतर्फे करण्यात आले.


माजी सैनिकांना ऑनलाईन ओळखपत्र
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, माजी सैनिकांचे अवलंबित तसेच नव्याने सेवानिवृत्त होणारे सैनिक यांच्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून प्राप्त होणारे ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी शासनाने ऑनलाईन पद्धतीचा वापर केला आहे. त्यासाठी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून संबंधितांनी स्वतःचे नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी फक्त माजी सैनिकास १०० रुपये एवढी रक्कम फी स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने आकारण्यात येईल. नोंदणी करण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, संपूर्ण पानासहित डिस्चार्ज बुक, पीपीओ, पेन्शन पासबुकाचे पहिले पान, ईसीएचएस कार्ड, दोन फोटो आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावीत. तरी सर्व संबंधितांनी नवीन ओळखपत्र बनवण्यासाठी उपरोक्त संकेतस्थळावर आपली नोंदणी केल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.

तलाठी भरतीसाठी मदत कक्ष
रत्नागिरी ः तलाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी व आस्थापनेवरील तलाठी पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आला आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी मदत कक्ष (हेल्प डेस्क) शाखेचे नाव-आस्थापना शाखा, ई-मेल आयडी rtg_est@rediffmail.com या मदत कक्षाशी अथवा दूरध्वनीवर इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

07953
माचाळ येथे मोफत महाआरोग्य शिबिर
लांजा : शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे व युवासेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त सनराईझ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या विद्यमाने शिवसेना व युवासेना लांजा तालुका यांच्या वतीने लांजा तालुक्यातील माचाळ येथे मोफत महाआरोग्य शिबिराचा आरंभ शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत पार पडला. या शिबिरामध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्त्रीरोग, अस्‍थिरोग, बालरोग तपासणी तसेच डोळ्यांच्या विविध तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तसेच महात्मा फुले योजनेअंतर्गत अँजिओप्लास्टी, कार्डिअॅक सर्जरी, कॅन्सर, मूतखडा यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी उपजिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, युवासेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, तालुका युवाधिकारी प्रसाद माने, शहरप्रमुख नागेश कुरूप, नगरसेवक राजेश हळदणकर, विभागप्रमुख युवराज हांदे, उपविभाग प्रमुख सुभाष तावडे, सनराईझ हॉस्पिटलचे डॉ. महेश शितोळे, डॉ. प्राजक्ता लोहार, डॉ. शिवाजी बंके, डॉ. सौरभ डांगे व माचाळ ग्रामस्थ उपस्थित होते.

07793
बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
राजापूर ः राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेमध्ये सुयश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्था आणि कॉलेजतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष सुलतान ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार हनिफ काझी, सदस्य अशफाक काझी, नझीर टोले, हसीना मुकरी, प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने आदी मान्यवर उपस्थित होते. बारावीच्या परीक्षेचा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मूळ गुणपत्रके विभागीय मंडळाकडून नुकतीच कॉलेजला प्राप्त झाली. त्यानंतर संस्था आणि कॉलेजच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. विज्ञान शाखेतील सिद्धी मोहिते, आदिती शिवदे, यश परवडे, वाणिज्य शाखेतील राजश्री मांडवकर, श्रद्धा चव्हाण, साहिल भेरे, कला शाखेतील सना मौला, झोया मुल्ला, धनराज लिंगायत या विविध शाखांमधून प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कनिष्ठ महाविद्यालय आणि हायस्कूलमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com