Hornbill
Hornbillesakal

Hornbill Birds : धनेशाच आयुष्य एकदम रंगतदार अन् रोमँटिक

धनेशाच (Dhanesh Bird) आयुष्य तसं एकदम रंगतदार किंबहुना रोमँटिक आहे.

-प्रतीक मोरे, देवरूख (moreprateik@gmail.com)

मादीने अंडी दिली की साधारण ५० दिवसांने पिल्लू बाहेर येते. या सर्व दिवसात नर अख्खं जंगल पालथं घालून वेगवेगळी फळं गळ्यात साठवून घेऊन येतो आणि मादीला भरवतो. या फळात ७० टक्के फिग म्हणजेच वड, पिंपळ प्रजातीचे प्रमाण असते. लिपिड आणि शर्करायुक्त आणि कॅल्शियम (Calcium), मॅग्नेशियमने भरपूर असल्यामुळे अंडी देण्यात आणि हाडांची वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरतात.

तसेच पिल्लाची वाढ पटकन होण्यासाठी प्रोटिनरिच फूड म्हणून मांसाहार सुद्धा यांच्या आहारात सामील होतो. छोट्या पक्ष्यांची पिल्ले, साप, सरडे, पाली, उंदीर असे काही प्राणी याच काळात आहारात समविष्ट होतात. यावेळी नराची प्रचंड धावपळ होते. ढोलीत मादीसुद्धा कृश झालेली दिसून येते. तिची पंख आणि मानेवरची पिसे गळतात, वजन कमी होते. आपल्या पुढच्या पिढीच्या संरक्षणासाठी केलेला हा त्याग पिल्लू अंड्यातून बाहेर आले की कामी येणार असतो.

Hornbill
आईला मदत करता-करता ती 'त्या' विश्वात कधी गुंतून गेली हे तिलाही कळत नाही!

धनेशाच (Dhanesh Bird) आयुष्य तसं एकदम रंगतदार किंबहुना रोमँटिक. आयुष्यभर एखादा जोडीदार निवडावा आणि जणू एकत्र आयुष्य व्यतित करण्याच्या आणाभाका घेऊन जीवन कंठावे तसा यांचा जीवनक्रम. नर आणि मादी यांची जोडी एकमेकांना पसंत पडली की यांचे प्रणयाराधन शिगेला पोहोचते. नर माड गरुड ठिकठिकाणाहून रसीली चविष्ट फळे गोळा करून आपल्या गळ्यामध्ये साठवून आणतो आणि उत्कट प्रेमाने मादीला भरवतो. या वेळी रामायणातील शबरीच्या बोरांची कथा डोळ्यासमोर तळरून जाते.

मादी नराने आणलेली फळे प्रेमाने स्वीकारून आपला अबोल होकार कळवते आणि प्रचंड पंख फुलवून यांचे काही क्षण टिकणारे मिलन पार पडते. इथून पुढे मात्र अरे संसार संसार कहाणीला सुरुवात होते. मिलन होण्याआधी शोधलेल्या ढोलीमध्ये मादी स्वतःला कोंडून घेते. बेहडा, सातविण, आंबा, शेवर, ऐन असे महावृक्ष सहसा ढोली असणारे आणि वर्षानुवर्ष टिकून राहिलेले वृक्षराज धनेशाची नवीन पिढी या जगात आणण्यास मदत करतात. मादीने ढोलीत प्रवेश केला की, मातीच्या साह्याने फक्त चोच बाहेर येईल एवढी जागा ठेवून ढोलीचे तोंड बंद करून घेते. मग सुरू होतो तो मादीचा तुरुंगवास आणि नराचा कष्टप्रद प्रवास.

Hornbill
Konkan Forest : नंदूचे जंगल - 'ते जंगलपण सैराट होऊन या वेड्या परश्यावर प्रेम करू लागले'

पिल्लाला आणि अंड्यांना कांदेचोर, बिबट्या माकडे अशा शिकाऱ्यांच्या नजरेस पडण्यापासून वाचवावे म्हणून ही अनोखी प्रथा मादीने उत्क्रांतीच्या घोर तपश्चर्येतून घडवली आहे. मग कैद सोडून मादी बाहेर येते आणि मग दोघेही पिल्लाचे पालनपोषण करण्यात मग्न होतात. पिल्लाला उडायला शिकवणे, कोणती फळे खावीत कोणती टाळावीत, जंगलात कुठे कोणती फळे शोधावीत अशा बाबींचे मार्गदर्शन करत करत पालक माड गरुड जवळ जवळ सहा ते आठ महिने पिल्लाचा सांभाळ करतात. एकटे राहण्याची क्षमता होईपर्यंत साथ देतात. अशा विविध मानवी गुणांचे सहज दर्शन आपल्या वर्तनात दाखवणारे धनेश लोकप्रिय नसतील तर नवलच.

इतकं रम्य आयुष्य जगणारे धनेश पक्षी आता मात्र मानवी हस्तक्षेपामुळे आणि लोभापायी धोक्यात आलेत. वृक्षतोड, एकसुरी बागायती लागवड आणि जंगलांचा देवरायांचा होत असलेला ऱ्हास धनेश पक्ष्यांना खाद्यासाठी वणवण भटकण्यास भाग पाडत आहे. आंबा काजू रबर अशा एकसूत्री लागवडी जंगलाचे वैविध्य कमी करतात. दासवन, कडू कवठ, काजरा असे विषारी फळे असणारे वृक्ष तर बीज प्रसारासाठी पूर्णपणे धनेशावर अवलंबून आहेत. मायफळ, जायफळ, फणाशी असे वृक्ष दिवसेंदिवस कमी होत आहेत. कोकणातून शेजारी पश्चिम महाराष्ट्रात विकसित झालेल्या साखर उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा पुरवठा केला जातो.

Hornbill
Health Tips : हिरड्यांचा आजार म्हणजे नक्की काय? 'या' कारणामुळे होते दातांभोवतीच्या हाडांची झीज

आधीच ९९ टक्के जंगलाची खासगी मालकी आणि त्यात सातत्याने होणारी तोड यामुळे ढोलीसाठी वृक्षच न उरल्यामुळे धनेशांची संख्या सुद्धा वाढत नाही. धनेशांची संख्या घटली की, जंगलं सुद्धा घटू लागतात. प्राण्यासाठी आवश्यक असणारी खाद्य झाडे कमी झाली की प्राणी वस्तीत येऊ लागतात. एकंदरीत संपूर्ण अन्न साखळीचा विसकट होऊन नव्याने संघर्ष उभे राहतात. म्हणूनच जंगल आणि राया वाचवताना माड गरुडांचे अस्तित्व टिकून राहील हे पाहणे काळाची गरज आहे. कोकणात तर याची सर्वाधिक गरज आहे.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com