Konkan News
Konkan Newsesakal

मन हरवलेली सुमन : उद्या पोरीनं काही बरं-वाईट करून घेतलं, तर गळ्याशी फास कोणाच्या लागे?

सुमनताईला माहेरी येऊन तीन-चार वर्षे झाली होती.

-राजा बर्वे, चिपळूण

सुमनताईला माहेरी येऊन तीन-चार वर्षे झाली होती. रोज ती स्वतःला घरातलं काम करण्यात गुंतवून घेत असे. तिचं माहेरचं घर जुन्या पद्धतीचं होते. ओटी, पडवी, माजघर, स्वयंपाकघर आणि दोन खोल्या. लहानपणी आम्ही मुलं तिच्याकडे खेळायला जायचो. पश्चिमेच्या बाजूला एक खोली होती. तिला एक छोटी खिडकी होती. तिथून दूरवर विंध्यवासिनीचा डोंगर दिसे. सुमनताई जास्तीत जास्त वेळ तिकडेच खिडकीत बसलेली असे. दूरवर कुठेतरी भावनाशून्य डोळ्यांनी काहीबाही पुटपुटत तासन्‍ा्‍तास डोंगर बघत राही.

‘सदू, तिचं काही ऐकू नको रे तू, सरळ उचल आणि रत्नागिरीस वेड्याच्या हॉस्पिटलात दाखल कर.’ ही ब्याद घरात असेतो काही सुख लागायचं नाही घराला’. सुमनताईच्या आतेचे हे शब्द कानावर आले. सदूने तिला रत्नागिरीस नेले; परंतु ''ती वेडी नाही फक्त अधूनमधून तिला काही काळ असे झटके येतात तेव्हा तिला सायकिअॅट्रिकची ट्रीटमेंट चालू करा, हळूहळू होईल बरी ती'', असे तिथल्या डॉक्टरांनी (Doctor) सांगितले आणि सुमन परत घरी आली.

Konkan News
पिंपळपार : लहानपणीचे दिवस आठवले की, मन अजूनही 'त्या' रम्य आठवणींचा मागोवा घेऊ लागतं!

मी आठवीत होतो, तेव्हा सुमन ११ वीत माझ्या बहिणीच्या वर्गात होती. त्या दोघी मैत्रिणी असल्याने सुमनताई आमच्याकडे अभ्यासाला, गप्पा मारायला यायची. शेलाट्या उंच बांध्याची सुमनताई देखणी होती. अरुंद कपाळपट्टी, मधोमध भांग असलेली कुरळ्या केसांची महिरप, स्वप्नाळू, मोठे डोळे, डाव्या कानाच्या खाली मोठं जन्मखूण तुळशीचं पान, सतत भावगीते गुणगुणत असायची. तिचा आवाजदेखील चांगला होता. भेंड्यांमध्ये ती असेल ती पार्टी जिंकायची. रांगोळ्या खूप छान काढायची. सतत काही ना काही कामात असायची. घरची आर्थिक परिस्थिती बेताची, त्यामुळे जेमतेम कॉलेजचं (College) पहिलं वर्ष झालं आणि सांगलीत एक स्थळ बघून तिचं नारळ मुलगी देऊन लग्न झालं.

Konkan News
आईला मदत करता-करता ती 'त्या' विश्वात कधी गुंतून गेली हे तिलाही कळत नाही!

मधल्या काळात आम्हा भावंडांचं शिक्षण, बहिणीचं लग्न होऊन ती सासरी गेली. यात मधली पाच-सहा वर्षे निघून गेली. अधूनमधून बहिणीकडून सुमनताईबद्दल कळत असे, ते काही फार चांगले नव्हते. सासरी तिला चांगलं वागवत नसत, असं कळत असे. एके दिवशी अपघातात सुमनताईचा नवरा गेला. दारू पिऊन मोटारसायकल चालवताना पडला आणि जागीच गेला. सुमनताई उद्ध्वस्त झाली. पार कोमेजून गेली. तिला मूलबाळदेखील नसल्यामुळे सासरी एकटी पडली. आधीच सासरचे चांगले नव्हते. त्यात नवरा गेला म्हटल्यावर एकदा सुमनताई माहेरी आली ती परत गेलीच नाही. सासरच्यांनी ''तिकडेच सांभाळा तिला किंवा लग्न लावून द्या'', असा निरोप पाठवून विषय संपवला आणि सुमनताई कायमची परत माहेरी आली.

अधूनमधून ती माझ्या आईला भेटायला येई. बहिणींची चौकशी करत असे. हीच का ती सुमनताई? असा प्रश्न पडावा इतकी बदलली. तिच्याकडे बघताना मला अनेकदा भडभडून येई. माझ्या तीन बहिणींसारखी चौथी सुमनताई. दरम्यान, माझेदेखील लग्न झाले होते. ती घरी आली की, माझी आई तिला प्रेमाने खाऊ-पिऊ घाली. गप्पा मारत बसे. निमित्त काढून तिला सणावाराला बोलवी. मुद्दाम रांगोळ्या काढून घेई. आई म्हणे सुमन, अगं, किती आयुष्य पडलंय तुझं. कठीण असतं ग, असं जगणं जगात. दुसऱ्या लग्नाचं बघायला सांगते मी मालतीला. परत संसारात पडलीस, एकादं मूल झालं ना की, परत लागेल सगळं हो चांगल्या मार्गाला''. यावर ती फक्त मलूलशी हसून पुटपुटत राही. कधी, "काकू, एकाने माझा चोळामोळा केला तेवढा पुरे गं. कधी मलाही वाटतं; पण आता परत विषाची परीक्षा नको गं," असं म्हणे.

सुमनताई नेहमी आपल्याच तंद्रीत राही. उपासतापास करी आणि उपास सोडताना रडत राही. माहेरी तिची आई, आते, एक भाऊ सदू, वहिनी अशी चार-पाच माणसे. सदूला खासगी नोकरी होती. माहेरी येऊन सुमनताईला दोनेक वर्ष होत आली आणि सुरुवातीची माहेरची माया आटत गेली. तिच्या घरातल्या सर्वांशी आमची ओळख असली तरी आमचे फार जाणे-येणे कधीच नव्हते. सुमन बहिणीची बालमैत्रीण म्हणून ती जास्त जवळची इतकंच. एक दिवस सकाळी ती उठली तीच रडत रडतच. मालतीकाकूंनी आमच्याकडे आईला येऊन जा, असा निरोप पाठवला. मला सुटी होती म्हणून मी आईला बाईकवरून घेऊन गेलो.

Konkan News
लहान मुलांच्या 'या' बाबी कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडवायला ठरतात कारणीभूत!

घरी गेलो तर तिची आई आणि आते काही हळू आवाजात बोलत होत्या. "लिल्ये, अगं गेले चार-पाच दिवस सुमनचं वागणं जरा चमत्कारिक वाटत होतं. मध्येच हसायची, काहीतरी असंबद्ध बडबड करायची आणि आज तिने कहरच केला गं".." सकाळी गाऊनचे दोन फडके केले. हळदीच्या पाण्यात बुडवले आणि परसात धूत बसली." "मी विचारलं तर म्हणते कशी, ''आते अगं बाळाने शी केलीय माझ्या ती नको का धुवायला मला? " आते आईला सांगत होती, ते मी बाहेर बसून ऐकत होतो. मनातून खचत होतो.

"लिल्ये, अगं आमची मालतीसुद्धा व्यवहारशून्य. माया माया सगळीकडे काय कामाची सांग बरं? उद्या पोरीने काही बरं-वाईट करून घेतलं तर गळ्याशी फास कोणाच्या लागे?". सदूला हापिसातून बोलावं आणि म्हणावं उचल तिला आणि वेड्याच्या हास्पिटलात टाक". हे आते आणि माझ्या आईचं संभाषण होईतो सदू आला आणि मग सुमन रत्नागिरीस जाऊन परत घरी आली.

Konkan News
Health Tips : हिरड्यांचा आजार म्हणजे नक्की काय? 'या' कारणामुळे होते दातांभोवतीच्या हाडांची झीज

आता या गोष्टीलादेखील दहा-पंधरा वर्षे उलटून गेली आहेत. माझी, सुमनताईची आई, आते सगळी देवाघरी गेली. सुमनताईसुद्धा सत्तरीजवळ पोचलीय. कधी त्या बाजूला गेलो तर सदूजवळ चौकशी करतो. पण, अभागी सुमनताईला भेटायचा धीर होत नाही. दुर्दैव, अडाणी माणसे आणि योग्यवेळी योग्य उपाय न केल्यामुळे आयुष्याचं वाळवंट झालेली सुमनताई जे सोसतेय ते माझ्या सहनशक्तीपलीकडचं आहे.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com