पुराण वृक्ष आणि पक्षी जीवन ; भेला

पुराण वृक्ष आणि पक्षी जीवन ; भेला

देवळाकडे जाताना वाटेवर दोन्ही बाजूने उंचच उंच बेहडे भरपूर रायांमध्ये आहेत आणि त्यांच्या फुलांचा सडा वाटेवर टाकत अजूनही शाबूत आहेत. भेळा वर्षभर एवढी रूपे बदलतो की, प्रत्येक ऋतूमध्ये त्याच्या नव्याने प्रेमात पडावं

प्रतिक मोरे
बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच. लहानपणी भेळ्याची फळं दगडाने ठेचायची आणि त्यातील पिवळा गर खायचे उद्योग चालायचे आणि पोटात मांजरें पडतात म्हणून मोठ्यांच्या शिव्याही पडायच्या. बांधाच्या कडेने असणारे भेळे खरंतर लक्ष वेधून घेणारा वृक्ष कधी नव्हताच. त्याची जाणीव व्हायची ती त्याला फुलोरा आला आणि त्याचा तीव्र मधमाशीच्या पोळ्यासारखा वास सर्वत्र घुमू लागला की, हिवाळा संपून उन्हाळा चालू झाला कि, यांच्या पिवळसर फुलांची रास झाडाखाली पडलेली दिसते आणि तेवढाच घमघमाट. शेतीसाठी कवळ तोडले जाते त्यात ऐन किंजळ आणि भेळा हे तीन बिचारे ठरलेले सदस्य. दरवर्षी भाजावळीसाठी यांच्या फांद्या तोडल्या जातात; पण जरा मोठे झाल्यावर देवराया फिरत असताना बेहड्याची उंचच उंच झाडं भेटू लागली. अनेक देवरायांची रचनाच या झाडांनी केली असल्याचं दिसून आलं आणि भेल्याची नव्याने ओळख झाली.

- प्रतिक मोरे
Email ID: moreprateik@gmail.com

देवळाकडे जाताना वाटेवर दोन्ही बाजूने उंचच उंच बेहडे भरपूर रायांमध्ये आहेत आणि त्यांच्या फुलांचा सडा वाटेवर टाकत अजूनही शाबूत आहेत. भेळा वर्षभर एवढी रूपे बदलतो की, प्रत्येक ऋतूमध्ये त्याच्या नव्याने प्रेमात पडावं. लालसर पालवीने शहारलेला, हिरव्यागार पानांनी नटलेला आणि पिवळसर बहराने लगडलेला अशी आल्हाददायक तर पूर्ण पानझडी होऊन फक्त खोड राहिलेला निष्पर्ण अशी वर्षभर नानाविध रूप धारण करणारा बेहडा. महाधनेश आणि भेळ्याचं मात्र अगदी जवळचं नातं आहे...याच्या रूंद पर्णसंभारामध्ये एवढा मोठा हॉर्नबिल अलगद लपून जातो. दुपारी अशीच एखादी दाट सावलीची फांदी बघून तिथं पिसे साफ करताना आणि नंतर डुलकी काढणारा हॉर्नबिल भेळ्यावरच पाहायला मिळतो.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)

हाच भेळा अनेकवेळा आपल्या ढोल्या असणाऱ्या खोडामुळे ढोलीत घरटे करणाऱ्या पक्ष्यांचा आवडता वृक्ष. पोपट, मैना, पिंगळा, मलबारी धनेश, राखी धनेश, महाधनेश, घुबडं असे अनेक पक्षी याच्या ढोल्यांमध्ये आपल्या पिलांना जन्म देतात. लालसर पालवीमध्ये बसून दूरवर ऐकू जाणारे गीत वनपिंगळा याच झाडावर बसून देत असतो. अनेक ऑर्किडसुद्धा यावर वाढलेली दिसतात. म्हणूनच भेळा पुराण एवढ्यावर थांबणारे नाहीये. जितक्या वेळा भेट होते तितक्या वेळा एखादी नवीन गोष्ट घेऊन हा वृक्ष समोर उभा राहतो.

बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून, त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया बेलिरिका आहे. तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यांसाठी त्याची लागवड करतात. हिरडा, अर्जुन आणि ऐन या वनस्पतीही याच कुलातील आहेत. म्यानमार, श्रीलंका आणि भारत या देशांतील मिश्र वनांत बेहडा आढळतो. कोकणात त्याला भेडा किंवा हेला असेही म्हणतात. तो एक आकर्षक वृक्ष असून वनीकरणासाठी, रस्त्याच्या कडेला सावलीसाठी व बागांमध्ये शोभेसाठी लावतात. बेहडा वृक्ष फार उपयोगी आहे. बेहडा आणि हिरडा या फळांची साल आणि आवळकाठी म्हणजे वाळलेल्या आवळ्याचे तुकडे यांपासून ‘त्रिफळा चूर्ण’ हे आयुर्वेदिक रेचक तयार केले जाते. या चुर्णाचे अनेक औषधी उपयोग असून, पोटाच्या तक्रारींवर तसेच कफ आणि पित्त या विकारांवर ते गुणकारी असते.

हलक्या प्रतीच्या घरबांधणीसाठी, फळ्या बनवण्यासाठी आणि बैलगाड्या व होड्या करण्यासाठी तसेच कागदाचा लगदा, कोळसा व जळाऊ लाकूड तयार करण्यासाठी त्याचे लाकूड वापरले जाते. प्लायवूड तयार करण्यासाठी त्याचे लाकूड उत्तम समजले जाते.
देवराईमध्ये नित्यनियमाने भेटणारा दुसरा वृक्ष म्हणजे सीता अशोक. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर देवी सीतेचे वास्तव्य अशोकवनात होते आणि ती अशोकाच्या झाडाखाली बसायची, अशी कथा आपण ऐकलेली असते. ओजगी या नावानेसुद्धा ओळखला जाणारा सदाहरित असलेला हा अशोक मध्य व दक्षिण भारत, पश्चिम घाट आणि किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात आढळतो.

हा वृक्ष सुंदर हिरवीगार पानं आणि मंद सुगंधित फुलांसाठी ओळखला जातो. फेब्रुवारी ते एप्रिल म्हणजेच माघ फाल्गुनापासून ते वैशाखातल्या वासंतागमनात अशोकावर फुलं येतात. पिवळसर केशरी रंगाच्या फुलांच्या गुच्छांनी अशोक लगडून जातो. या फुलांचं आयुष्य संपत आलं की, हे गुच्छ लालसर होतात आणि फुलं गळून झाडाखाली पडतात. जंगली वृक्ष असलेला हा अशोक आता दुर्मिळ होत चाललाय. भारतीय संस्कृतीत, पूजापत्रीत समाविष्ट आहे. याच्या फुलातील मध पिण्यासाठी अनेक फुलपाखरे आणि पक्षी यावर आकर्षित होतात. मुंग्या, ओम्बिल आणि कीटकसुद्धा वास्तव्याला आल्यामुळे त्यांना खाणारे शिंपी, बुलबुल आणि कस्तूरसुद्धा याच्या बनात आपला तंबू ठोकतात. शेकडो वर्ष स्थितप्रज्ञ राहून आजूबाजूच्या घटनांची नोंद घेत आपल्या अंगाखांद्यावर पक्षी, प्राणी, शेवाळे, कीटक यांना सहारा देणारे हे पुराण वृक्ष अनेक घटनांचे साक्षीदार बनत उभे आहेत. त्यांच्या गर्द छायेखाली बसून त्यांचे अंतरंग समजण्याचा त्यांच्या जीवनकथा समजून घेत एखादा रविवार नक्की घालवायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com