Shrutika Kotkunde
Shrutika Kotkundesakal

डिजिटल जगातील पालकत्व आणी स्मार्टफोनचे व्यसन

आजकाल मोबाईल, इंटरनेट हा आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. डिजिटल चमचा तोंडात घेऊन आलेली आजची मुलं या बाबतीत पालकांच्या दहा पावले पुढे असतात हे नाकारता येत नाही.

- श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण

आजकाल मोबाईल, इंटरनेट हा आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. डिजिटल चमचा तोंडात घेऊन आलेली आजची मुलं या बाबतीत पालकांच्या दहा पावले पुढे असतात हे नाकारता येत नाही. १३ वर्षाची माझी लेक इन्स्टासाठी हट्ट करीत होती. इन्स्टाच्या निमित्ताने सोशल मीडियातून येणाऱ्या अनाहुत गोष्टींसाठी तिच्या तयारी बद्दल मी साशंक होते.

म्हणून मग आम्ही सोशल मीडियाचे फायदे आणी तोट्या बद्दल संवाद साधला. आपण इन्स्टा हाताळण्यासाठी परिपक्व आहोत का? असा मोकळा संवाद झाला. विविध माध्यमे, ऑनलाईन सुरक्षा, सायबरबुल्लयिंग, जबाबदार वापर या विषयांवर आमची साधक-बाधक चर्चा सुरु झाली व आजही चालू आहे.

आजच्याकाळात मुलांमधील वाढत्या स्क्रीनचे व्यसन बघता प्रत्येक पालक आणि त्यांच्या मुलांमध्ये हा संवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड काळात अभ्यासासाठी पूरक साधन म्हणून इंटरनेट मोठ्याप्रमाणात मुलांच्या आयुष्यात सामील झाला. वाढत्या डिजिटायजेशनमध्ये आता मागे फिरणे शक्य नाही. मुलांच्या अभ्यासात आणी आयुष्यात तंत्रज्ञानाचा शिरकाव कायमचा झाला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर, आव्हाने व जोखमी समजून घेणे गरजेचे आहे.

सतत आभासी जगतात राहण्याचे काही तोटे आता लक्षात येऊ लागलेले आहेत. विशेषतः मुलांच्या मेंदूच्या वाढीच्या टप्प्यात स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मेंदूच्या वाढीत बाधा निर्माण होते, असे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. स्मार्टफोनचा अतिवापर एक वर्तणूक समस्या आहे. जसे की जुगार, किंवा मंत्रचळ.

स्मार्टफोन अतिवापराने मुलांची झोप हरपणे, भूक हरपणे, एकाग्रता ढळणे, मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडणे, नाते संबंध बिघडणे असे अनेक दुष्परिणाम आढळून येत आहेत. मुलांमध्ये फोन नाकारला म्हणून हिंसक वागणे, प्रसंगी आत्महत्येचा प्रयत्न होताना दिसत आहे. यावरून या व्यसनाचे गांभीर्य ओळखावे.

आज मनोरंजनापासून बँकिंगपर्यंत, तसेच ऑनलाईन शॉपिंगपासून नोकरीचे साधन म्हणून स्मार्टफोनने आपल्यावर अशी पकड घेतली आहे की आपण व्यवधान हरवून बसलेलो आहे. इंटरनेट एक जादूची गुफा आहे, ज्यात आपण जातो आपल्या इच्छेने परंतु माघारी येण्याआधी तासंतास तिथे भरकट राहतो. वेगवेगळे अॅप, थरारक गेम, बातम्या, व्हिडिओ बघण्यात दंग होऊन, वेळेचे भान हरपून बसतो.

अपराधीपण थोड्या वेळेसाठी वाटले तरी पुन्हा ती मजा अनुभण्यासाठी हात सरसावतात. हल्ली प्रसंगाचा आनंद घेण्यापेक्षा तो फोन मध्ये कैदकरून समाजमाध्यमावर प्रक्षेपीत करून मिळणारे लाईक्स, कंमेंट्सच्या नशेची किक हवी हवीशी वाटते. अलगोरिथमच्या जाळ्यात आपण तासंतास वेळ वाया घालवतो, एका नवीन किकच्या शोधात.

मुलांचा आणि कुमारांच्या मेंदूची वाढ पूर्ण झाली नसल्यामुळे त्यांना याचे व्यसन पटकन जडते. सतत फेसबुक, इन्स्टा, ट्विटर वापरामुळे मुले इतर जण खूप खुश आहेत असे समजू लागतात. ज्यामुळे -फिलिंग ऑफ मिसिंग आऊट व त्याबरोबर येणारे नैराश्य व चिंता अनुभवू लागतात.

सतत नवीन पर्याय शोधण्याच्या नादात मुलं निर्णयक्षमता हरवून बसतात व सहज ऑनलाईन मित्रांवर विश्वास ठेवून सावज बनतात. सतत आभासी जगात राहणारे, मूल पालकांना अनोळखी वाटू लागले आहे. मुलांमध्ये संवाद कौशल्य, सामाजिक जाणीव, भावनांचे नियमन कठीण होत चालले आहे व परिणामी चिडचिड, ताण, नैराश्य व चिंतातुरपणा वाढला आहे.

मुलांला स्मार्टफोनचे व्यसन आहे कसे ओळखाल?

जर आपले मूल सतत मोबाईल मागत असेल व समजावूनही वापर कमी करता येत नसेल, सातत्याने नवीन थरारक गेम्स खेळण्याची गरज भासत असेल, मोबाईल अभावी मूल अस्वस्थ होत असेल, मुलाच्या मोबाईलच्या वापरामुळे परिवारात ताण निर्माण होत असेल, फोनमुळे मुलाच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येत असेल, मूल आधी ज्या गोष्टीत रमायचे त्या गोष्टी टाळू लागलं असेल, अभ्यासाच्या वेळातही फोन सतत वापरत असेल, फोन जवळ नसल्यास चिडचिड करीत असेल तर ही धोक्याची लक्षणे असे समजा.

सामाजिक माध्यमाच्या अति वापरामुळे मुले सतत स्वतःची तुलना इतरांशी करू लागतात व त्यांच्यामुळे नैराश्य, चिंता, एकाग्रतेचा अभाव, निकृष्ट स्वःप्रतिमा, भावनिक चढ-उतार होत राहतात. कुमारवायात शरीरात व मनात होणाऱ्या बदलामुळे आधीच भांभावून गेलेली मुले सामाजिक माध्यमावरच्या आभासी सत्यालाच खरं मानून टोकाची पावले उचलू शकतात. या अवस्थेत जर पालक आणि मुलांमध्ये योग्य तो संवाद नसला तर अनर्थ घडू शकतो.

उपाय :

स्क्रीन किंवा गॅजेट्स हे जबाबदारपणे वापरण्यासाठी पालकांनी त्यातील धोके स्वतः समजून घ्यावे आणि मुलांशी सातत्याने त्या संदर्भात संवाद साधावा. शक्यतो उच्च माध्यमिक वर्गात येईपर्यंत मुलांना स्वतंत्र फोन देणे टाळावे. फोन देण्याअगोदर काही बंधने घालावीत व ती काटेकोरपणे पाळावीत व बंधनांची गरज समजावून सांगावीत.

सामाजिक माध्यमाचे दुष्परिणाम समजावून सांगावीत. झोपेच्या आधी एक तास तरी कुठलाही स्क्रीन बघितला जाणार नाही हा नियम घरातील सर्वांनी पाळावा. नेट वापरण्याचे ठिकाण शक्यतो परिवाराचा वावर असलेली सामायिक जागा असावी म्हणजे मुलावर लक्ष ठेवणे शक्य होईल. स्क्रीन टाइम आणी स्क्रीन फ्री टाइम हा परिवारातील सर्वांनी पाळावा. गेम खेळताना, चॅटींग करताना फक्त ओळखीच्याच व्यक्तींबरोबर मूल खेळते याची पालकांनी दक्षता घ्यावी.

गरज वाटल्यास पालक फोन तपासू शकतील व मुलांनी विनातक्रार देणे गरजेचे हे आधीच कबूल करून घ्यावे. सायबर बुलिंग, शिकारी मनोवृत्ती, चॅलेंज गेम व पॉर्नच्या धोक्यासंदर्भात संवाद साधतं राहावे. जबाबदार वापर झाल्यास आणखीन वापरण्याचे स्वातंत्र्य मिळेल हे मुलांच्या मनावर ठसवावे. मुलांच्या इतर आवडीच्या गोष्टी, छंद जोपासण्यास प्रोत्साहन द्यावे.

स्मार्टफोन आल्यापासून एक समाज म्हणून आपण झपाट्याने बदलू लागलो आहे. गरज आहे विवेकाने व सजगतेने या विषयी माहिती घेत मुलांना सुरक्षित करण्याची. कुठलेही नवीन माध्यम जेव्हा आपल्या आयुष्यात येते तेव्हा जीवनाची घडी थोडी विस्कटतेच, परंतु या बदलत्या जगात मुलांवर माहितीच्या आधारे जबाबदार करून त्यांना या माध्यमाचा जवाबदार वापर करण्यास प्रोत्साहन देणे हेच आपले कर्तव्य नाही का?

(लेखिका मनोविकारतज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com