बागायत पंचक्रोशीत अवकाळी पाऊस

बागायत पंचक्रोशीत अवकाळी पाऊस

बागायत पंचक्रोशीत
अवकाळी पाऊस
मालवणः परिसरात काल (ता.२७) मध्यरात्री बागायत पंचक्रोशीतील झालेल्या अवकाळी पावसाच्या शिडकाव्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या परिसरात मंगळवारी ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाची शक्यता दिसत नसल्याने शेतकरी निर्धास्त होते. काहींनी कुळीथ पीक काढून ठेवले होते. तर काही भागात भात झोडणी करून गवत व भात तसेच ठेवले होते. पहाटे आलेल्या पावसाने काही शेतकऱ्यांची पिके भिजून नुकसान झाले.
-----------------
मेढा येथे
३१ उत्सव
मालवणः मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव रविवारी (ता.३१) साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासून चौकचार मांड, पूजाअर्चा, रात्री ९ पासून पारंपरिक घुमट वादन, कलावंतीण नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
-----------------
खापरेश्वर वाचनालयाचा
१ एप्रिलला वर्धापन दिन
मालवणः कोळंब येथील देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालयाचा १३ वा वर्धापन दिन १ एप्रिलला तेथील हनुमान मंदिर, टेंबवाडी येथे साजरा होणार आहे. सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत ते हनुमान मंदिरपर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. या ग्रंथ दिंडीत कोळंब ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेच्या चार शाळांतील विद्यार्थी विविध वेशभूषेत सहभागी होणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे पालक, शिक्षक या ग्रंथदिंडीत सामिल होणार आहेत. कोळंबचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. गावातील सर्व महिला, बचत गटातील सर्व महिला व पुरुष वर्ग मराठमोळ्या व हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पारंपरिक पोशाखात ग्रंथ दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. गावातील सर्वांनी ग्रंथदिंडी व कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
--------------------
फोंडाघाट येथे एप्रिलमध्ये
बटूंचा उपनयन कार्यक्रम
कणकवलीः कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ कणकवलीच्यावतीने तालुक्यातील कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजातील बटूंचा उपनयन संस्कार कार्यक्रम २८ एप्रिलला संस्थेच्या फोंडाघाट येथील पूर्णानंदभवन येथे होणार आहे. ज्ञातीतील ज्या बटूंच्या मौजी या कार्यक्रमात करावयाच्या आहेत, त्यांच्या पालकांनी बटूंची नावनोंदणी १५ एप्रिलपर्यंत करण्यात यावी, असे आवाहन कार्यवाह अॅड. एन. आर. तथा नानू देसाई यांनी केले आहे. उपनयन संस्कार कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी राजेश आजगावकर (कणकवली), हर्षल गवाणकर (पटवर्धन चौक), रामचंद्र बावकर, अरुण सामंत (फोंडाघाट) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
-------------------
विकास मंगल
यांची निवड
कणकवलीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वैद्यकीय सेलच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी कणकवली येथील निदान पॅथॉलॉजी लॅबचे विकास मंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंडित गौतम आगा यांनी मंगल यांना दिले आहे. विकास मंगल हे लॅब टेक्निशियन आहेत.
-------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com