ओली हळद लागे अंगाला...

ओली हळद लागे अंगाला...

११ (सदर ः पान ६ साठी)

(३१ मार्च पान सहा)

-----------

- rat२७p७.jpg-
२४M८०१३७
डॉ. स्वप्नजा मोहिते

मत्स्यगंधेच्या लेकी ............ लोगो

वसईच्या किल्ला बंदराच्या कोळीवाड्यात जायचं म्हणून माझी धांदल चाललेली त्या दिवशी. संस्कृत ‘वास’ म्हणजे राहणे या शब्दावरून पडलेलं या गावाचं वसई हे नाव; पण या गावानं बसई त्यांनतर पोर्तुगीजांनी दिलेलं बकैम (Baçaim), मराठ्यांनी दिलेलं बाजीपूर, इंग्रजांनी दिलेलं बासिन (Bassein) आणि आताच प्रचलित वसई अशी सगळी नावांमधली आणि इथे वसणाऱ्यांमधली स्थित्यंतरे अगदी जवळून पाहिली तरीही त्याच्या किनाऱ्याला धडकणाऱ्या समुद्राने आपले अस्तित्व बदलले नाही. तो तसाच उचंबळतो, उधाणतो आणि त्याच्या चंदेरी लाटांवर तरंगणाऱ्या होड्यांना, बोटींना आणि त्याच्या प्रिय कोळ्यांना तो भरभरून दान देतच असतो.

- डॉ. स्वप्नजा मोहिते, रत्नागिरी
-----------
ओली हळद लागे अंगाला...

पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्याच्या कमानीतून प्रवेश केला की, तुम्ही पोहोचता वसईच्या कोळीवाड्यात. या ठिकाणाहून ते ५-१० मिनिटे चक्रव्युहासारख्या गल्लीबोळातून वाट काढत आपण पोहोचतो बंदरावर. वाटेत विविध प्रकारची घरे दिसतात कच्च्या घरांपासून ते छानशा बंगल्यापर्यंत. या घरांचे सुंदर पिवळा, फ्लोरोसेंट हिरवा, निळा असे रंग आणि या घरांचे हलक्या फिक्या रंगाचे दरवाजे आपले लक्ष वेधून घेतात. त्यातल्या एका घरासमोर घातलेला प्रशस्त मांडव आणि घरावर केलेलं लायटिंग.... बस्स इथेच तर पोहोचायचं होतं मला! ‘तुजीच वाट बगतायंन ना कवाशीन? ये लवकर. पोरींनो, चा नायतर ठंडा आना लवकर. ताईला द्या! तकरं हलदीची तयारी करायची हाय ना?’ मंगला मावशी एका श्वासात बोलत होती आणि मी आजूबाजूची गडबड बघत होते. सारं घर माणसांनी भरलेलं आणि त्यातल्या महिलावर्गाची चाललेली लगबग! बाहेर तालासुरात वाजणारा बॅण्ड .....ओली हळद लागे अंगाला.... नटला, रंगला ... मांडव दारा सजला! मांडवात लावलेली आंब्याच्या पानांची, रंगीत पताकांची तोरणं आणि अगदी असोशीने नटलेल्या साऱ्या मत्स्यगंधा! रंगांची जुगलबंदी चाललेली आणि उत्साहाला नुसतं उधाण आलेलं.

माशाच्या टोपल्या उचलता याव्यात आणि मासे विकतानाही सुटसुटीत असाव्यात अशा साड्या, पावलांपर्यंत येणारे सोगे आणि पदराबरोबरच दोन्ही खांद्यांवरून घेतलेले फुलांची नक्षी असलेले पांढरे रूमाल ... हा त्यांचा रोजचा पेहेराव. आज मात्र सगळ्याजणी वेगळ्याच वाटत होत्या त्यांच्या जरीकाठाच्या साऱ्यात! मंगलमावशी तर एकदम भारीच सजली होती. वरमाय ना ती! आज तिच्या लेकाची हळद आणि ती खेळायची असते असं तिनंच सांगितलेलं मला. हळूहळू मीही त्या माहोलचा भाग बनत होते. बाहेर बँड आता टिपेला पोहोचला होता. आता गावच्या विहिरीवरून पाणी म्हणजेच ‘उंबराचं पाणी’ आणायचे होते नवरदेवाला अंघोळ घालण्यासाठी; पण त्या आधी वरमाईच्या माहेरच्या लोकांना बँडच्या गजरात आणायला जायचे होते. वरमाय म्हणजे लक्ष्मीचं रूप. लेकाच्या लग्नात तिचा मान मोठा. ‘ताई आधी मंगलामावशीच्या माहेरी जायचंय. तुला पण यायचंय!’ कोणीतरी सांगितलं आणि आमची ही वेगळी वरात वाजतगाजत निघाली मावशीच्या म्हायेराला. तिच्या माहेरच्यांनी आमचं केलेलं जंगी स्वागत पाहून मी तर हरखूनच गेले. मग आमची ही वरात सगळ्यांना घेऊन निघाली गावच्या विहिरीवर. घराघरातून पाण्यासाठी नळ असला तरी आज हळदीनंतर वराची आणि हळदीने रंगलेल्या पुरुषवर्गाची अंघोळ याच पाण्यानं होणार होती.
एकसारख्या साड्या नेसलेल्या सगळ्या मत्स्यगंधांमध्ये सळसळणारी ऊर्जा मला आज वेगळीच वाटत होती. नेहमीच्या मासळीच्या वासाचा, कलकलाटाचा आज इथे मागमूसही नव्हता. सोहळा कुठलाही असू दे, त्यात नटणंसजणं आणि मिरवणं सगळ्याच स्त्रियांना आवडतं. मग त्या वसईच्या मत्स्यगंधा असो किंवा वेसावेगावाच्या .... एके अनामिक ऊर्जा सगळ्याच जणींतून अखंड वाहत असते .... तुम्हा आम्हालाही स्पर्शतं! समोर मंगलामावशी आणि इतर सवाष्णी विहिरीला हळदकुंकू वाहत. विडा, नारळ ठेवून तिची पूजा करत होत्या. प्रसाद म्हणून पानावर उडीद डाळ आणि तांदळाचे वडे ठेवले जात होते. विहिरीला नमस्कार करून ‘तुझ्या पवित्र पाण्यानं सगळं मंगल घडू दे’, अशी प्रार्थना करून आमचे रंगीत घडे त्या पाण्यानं भरून लग्नघरी परतायचं होतं. भिजवलेली ओली हळद आमची वाट पाहत होती. घड्यातल्या हिंदकळणाऱ्या पाण्यानं भिजत आम्ही साऱ्याजणी परतीची वाट चालत होतो.
पाण्याचे घडे मागच्या अंगणात ठेवत आम्ही साऱ्याजणी आता हळद लावायला सज्ज होतो. घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडत नवरदेव माझ्याही पायाशी वाकला आणि मीच अवघडून गेले. ‘ताई, लेकाला आशीर्वाद दे माज्या! चारयेळेला इचारलं त्यानं... तुला बोलिवला की, नाय म्हनून!’ मावशीचं तेव्हढ्या गडबडीतही माझ्यावर लक्ष होतंच. मग नवरदेव, त्याचे आई-बाबा आणि घरची सगळी पुरुषमंडळी पाटावर बसली तशी सगळ्या महिला मंडळींनी त्यांचा ताबा घेतला. आणि हळदीच्या सोनसळी पिवळ्या रंगानं सगळं घरदार रंगून गेलं. हळद एवढ्या मोठ्या भांड्यात का भिजवली आहे आणि हळद खेळतात म्हणजे काय, ते मला तेव्हा समजलं आणि गालाला लावलेली हळद न पुसता मीही त्या खेळात रंगून गेले. आता अशा रंगलेल्या नवरदेवाबरोबर सगळ्यांनी सुपात ठेवलेले गहू मुसळानं कुटायचा एक विधी केला आणि मग रंगला एक वेगळा खेळ. टोपलीत गहू टाकून घरातल्या स्त्रिया कांडतात. तेव्हा नवरदेव आणि त्याच्या मामाने ते टोपलं खेचायचं. जर टोपलं खेचता आलं तर मामा-भाचा जिंकले नाहीतर मामानं या महिलांना, त्या सांगतील ती रक्कम द्यायची. भाच्याच्या लग्नात मामाचाही मान मोठाच ना! खेळीमेळीच्या वातावरणात हा खेळ रंगला सगळे मागल्या अंगणात वळले उंबराच्या म्हणजे आम्ही आणलेल्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करायला. ‘आता आदी नारलाच्या दुधाची अंघोल आनी मंग उंबराचं पानी घालायचं.’ नवरदेवाच्या काकीनं फर्मान काढलं आणि समोरच्या पाच-सहा भल्याथोरल्या घंगाळ्यातलं नारळाचं दूध पाहून मलाच दडपल्यागत झालं. नारळाच्या दुधाची अंघोळ?नवरदेवाच्या डोक्यावर तपेल्यानं नारळाचं दूध ओतलं जात होतं आणि हळदीनं पिवळं होत दुधाचे प्रवाह त्याच्या अंगाखांद्यावरून वाहत होते. अगदी रगडून रगडून अंघोळ घालता घालता नवरदेवाच्या डोक्यावर चक्क अंडीही फोडली जाऊ लागली आणि सगळ्याचजणी मग या खेळात सामील झाल्या. त्याच्या मागोमाग इतरांनाही नारळाच्या दुधानं अंघोळ घातली जात होती आणि मी विस्फारल्या डोळ्यानं हा सोहळा बघत होते. ‘हलद झोंबते ना कवा तरी, तवा या दुदानं ते झोंबना कमी व्हतं. अंड्यानं केसबी मऊ व्हत्यात.’ काकींनी मला समजावलं आणि मी समजल्यागत मान डोलवली. माझ्याही घड्यातलं पाणी मंगलामावशीच्या लेकाच्या डोक्यावर पडणार होतं. माझ्या डोळ्यात नकळत पाणी भरून आलं. घडे, कळशा रिकाम्या झाल्या आणि हळदुल्या रंगात रंगलेला नवरदेव डोळ्यासमोर येत राहिला.

(लेखिका ललित लेखन करते अन् चित्रकारही आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com