Konkan Port : 'कोकणातल्या कोणत्याच बंदरात बोट लागावी अशी बंदरेच उरली नाहीत'

अचानक लॉटरी (Lottery) लागावी तसा एक दिवस मला हा बापू सापडला आणि एकदोन भेटीतच त्याने मला अनेक गोष्टी सांगितल्या.
Konkan Port
Konkan Portesakal

-राजा बर्वे, चिपळूण

आज कोकणातल्या कोणत्याच बंदरात (Konkan Port) बोट लागावी अशी बंदरेच उरली नाहीत. आता जलवाहतूकसुद्धा फार वापरात नाही. एकेकाळी रामदास, जयंती, तुकाराम अशा अनेक बोटी कोकण किनाऱ्यावर प्रवाशांची ने आण करत होत्या. त्याच काळातला बापू. आता वय ऐशीच्या बरंच पलीकडे.

Konkan Port
दिनकरसारखी कोकणातली माणसं, मुंगी होऊन साखर खाणारी अन् त्या साखरेचा गोडवा इतरांना वाटणारी!

अचानक लॉटरी (Lottery) लागावी तसा एक दिवस मला हा बापू सापडला आणि एकदोन भेटीतच त्याने मला अनेक गोष्टी आणि किस्से सांगत तो सगळा काळच माझ्यासमोर ओतला, परत एकदा जिवंत केला आणि हे करताना बापू , कात टाकून परत एकदा रसरशीत तरुण होऊन डौलात एकादा नाग बिळातून सळसळत निघावा तसा त्या गप्पांच्या परिणामाने तरुण तरुण होत गेल्यासारखा मला भासला. नंतर दर वेळेला भासत राहिला..

बापू, बापू गुडेकर.. आज जसा बापू जीर्ण झालाय तसंच त्याच बंदराला हडसून मोडकळीस आलेलं जीर्ण खोपटं देखील अजून उभं आहे. एकेकाळी त्या खोपटातल्या हाॅटेलात (Hotel) सकाळपासून रात्रीपर्यंत वडे, भजे, चाय यासाठी खारवी, कोळी, बोटीवरचे प्रवासी यांची गजबज असे.. या साऱ्या गोष्टी गप्पा, किस्से माझ्या बँकेच्या कामाच्या निमित्ताने बापूशी झालेल्या दोन चार भेटीतच माझ्या पोतडीत जमा झाले.

थंडीचे दिवस होते. एक दिवस पन्नाशीला आलेला वसंता गुडेकर बँकेत (Bank) आला. त्याला मासेमारी बोटीसाठी कर्ज हवे होते.. प्राथमिक बोलणी झाल्यावर एक दिवस मी त्याच्या घरी गेलो. स्वच्छ अंगण, घर, परिसर दिसत असला तरी एक सुक्या मासळीचा उग्र असा दर्प मला अस्वस्थ करत होता. वसंताजवळ बँकेच्या कामाचा विषय होईपर्यंत कानटोपी, जुनाट कोट घातलेली व्यक्ती ओटीवर येऊन बसली..हा बापू, बापू गुडेकर, वसंताचा बाप. वसंताने ओळख करून दिली आणि मी त्याला आणि त्याच्या वयाला हात जोडले. ‘सायेब, बिनघोर बसा, आमच्या घराला पावण्यांची सवय आहे..

मिसरूड फुटली नव्हती तेव्हापासून दहा वर्सा अगोदर हाटेल होता बंदरावर माझा’.. साठ वर्ष दर्याची भरती व्होटी बघितली आहे’..लय पैसा कमवला, मानसा कमवली आता मात्र घुबडासारखा घरात बसून असतो. हाटेलच्या त्या खोपटात आता माझा वसंता बोटीचा डिझेल, सामान, मच्छी ठेवतो’. मला उत्सुकता वाटायला लागली.. ऐशी पलीकडचं वय असुन आणि समुद्राचा खारा वारा आयुष्यभर खाऊन पिऊनसुद्धा बापू खणखणीत होता. बुटकी चण, मजबूत हाडपेर, छपरी सफेत मिशा, गुळगुळीत टक्कल, गळ्यात काळ्या दोऱ्यात कसला तरी गंडा, पुढचे एक दोनच पण त्यातला एक चांदीचा दात, अंगात बाह्यांचा काखेत एक दोन भोके पडलेला गंजीफ्राक आणि पट्ट्याची नाडी चड्डी. हातात सोट्या म्हणता येईल अशी काठी आणि बोलताना मध्येच तर्जनी हवेत गोल गोल फिरवत बोलायची सवय. बापू मला आवडून गेला.

Konkan Port
Sahyadri Valley : पाऊस, वादळ आणि पक्षीजीवन (भाग एक)

आमच्या वयात इतकं अंतर असलं तरी पांडुरंग गुडेकरना मी एकेरी बापू असंच म्हणत असे.. तेच त्यांना आवडे हे एक आणि कोकणात काय किंवा खारवी समाजात काय, असाच एकेरी उल्लेख करण्याचाच प्रघात. ‘सायेब हाटेल लय चालायचं, लय पैसा कमवला, रुक्मिणी आणि मी खोपटात दिस न रात. बोटीवर जानारी लोकं झोपाया यायची. सकाली अंगुलीला गरम पानी, गरम चाय वडा भजे असा घाना पडलेला असायचा. सायेब, पैसा लै कमवला पर पैसा टिकला नाय, खोटा कशाला बोलू, रातच्याला वाईच पोटात नाय टाकली तर झोप नाय यायची’.

दोन सटव्यांनी मात्र मला पैशाकडना धुपवलीन. हाटेल चालवत चालवत अजून पैसा कमवावा म्हणून एक मच्छीमार बोट बांधली. आधी थोडा पैसा कमवला पन मग तांडेल, खलाशी यांनी हरामखोरी आनी दगाबाजी करून त्यात पैशाकडून धुपलो आनि त्यात एक दिवस बोटीतना गोव्याची एक किरीस्ताव लिली म्हणून कोली समाजाची बाई आली. उफाड्याची बाई. ‘माझा कोन नाय’ म्हणून इथंच उतरली आणि कामाला म्हणून ऱ्हाली आणि तिचा माझ्यावं फास पडला. मी बी व्हावत गेलो. व्हटाच्या लालीपासून लै पैसा उडवला तिच्यावर. ती अवदसा हाटेलात शिरली आणि रुक्मिणी लक्षुमीला संगती घेऊन बाहेर पडली.. काय दिवसांनी मग लिली पर कोनासंगती जशी आली तशी अचानक निघून गेली. जरा सैरभैर झालो. पन माझी रुक्मिणी मोठ्या मनाची, परत आली म्हणून मी सावरलो’. बापूचे ते मोकळे कन्फेशन मी अवाक होऊन ऐकत होतो.

Konkan Port
Health News : मानदुखी, कंबरदुखीची कोणती आहेत लक्षणे? यासाठी काय करावे लागेल? जाणून घ्या..

अप्रिय विषय बदलावा म्हणून विचारलं ‘ बापू, पन्नास पेक्षा अधिक वर्षे हॉटेल धंद्यात घालवलीस, खूप वेगवेगळी माणसे भेटली असतील, किती किती नमुने बघितले असशील ना?’... जादू व्हावी तसा बापू खुलला ‘ सायेब, काय ईचारु नका, एक दिवस रत्नागिरीचं मोठं हाटेलवालं झाकपाक मालक बोटीतना मुंबईत जात हुतं, हाटेलात शिरलं, भजे, वडे चहा झाला. लय आवडला सगला त्यांना. मी इचारला त्यांना तसं बोललं आमचा बी रत्नागिरीत मोठा हाटेल हाय. मी जरा वरामलो आणि बोललो, मालक, गरिबाला लाज नका आणू, तुमचा लय मोठा, शेहरातला, आमचा आपला गावातला खोपट्यातला हाटेल.. तुमच्या हाटेलात रोज कपबशी फुटत असल तेवडा आमचा भांडवल सुद्धा नाय हो’.. बापूच्या तोंडून हे सगळं ऐकताना मी अंतर्मुख होत गेलो. रोजच्या जगण्यातली विनम्रता विनोदी अंगाने नकळत बापू मला शिकवत होता.

‘एकदा असेच कोणी संगमेश्वरातले खोत हाटेलात बसले होते. एवढ्यात बोटीचा भोंगा वाजला आणि त्यांची पळापळ झाली.. धावता धावता ते मला ओरडून बोलले, ‘बापू, काळजी करू नको रे, येताना पैसे देतो, म्हाबळ्यातला खोत आहे, पैसा बुडायचा नाही तुझा’.. मग मी बी बोललो ओरडून त्यानला, ‘ खोतानु, येवा सावकिस, तुमी बी जात नाही कुठं आणि हा बापू या खाजणात चालीस वर्ष रुजलाय, पैसा लय कमवला, गमवला, पर गिऱ्हाईकाला एकदा धरला की हा बापू सोडत नाय’..

Konkan Port
इचलकरंजीत मृत माशांचे केले उत्तरकार्य; युवा सेनेचे अनोखे आंदोलन, 'त्या' अधिकाऱ्यांना घालणार 100 किलोचा हार

वसंताचं बँकेचे काम झाले..तो सुद्धा नीट हप्ते भरत होता.. अधूनमधून कधी त्या भागात गेलो की बापूला हटकून भेटून, गप्पा मारून येत असे. दरवेळी बापू मला बोलता बोलता नकळत जगण्याचा एकादा नवा धडा गिरवायला देई..माझी नंतर बदली झाली आणि काही वर्षे बापू डोक्यातून हरवला. चिपळूणला काही वर्षांनी वसंताने बाजारात हाक मारली. बोलता बोलता बापू मात्र गेल्याचं समजलं. कोणीतरी जवळचं माणूस गेल्यासारखा कळवळा आला. कधीतरी फुरसतीच्या वेळेत बापू आणि बोलता बोलता तर्जनी हवेत उडवून, ''पैसा लै कमवला सायेब पर टिकला नाही हातात'' हे बापूचं पालुपद आठवतं. या व्यवहारी जगात कोकणातली अशी अनेक हुशार परंतु जगाच्या दृष्टीने ''अव्यवहारी'' , मोकळी ढाकळी माणसे हुशार असून टिकली नाहीत, मोठी होऊ शकली नाहीत याची मात्र बोच लागून रहाते.

लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com