‘लाडकी बहीण’साठी ‘झिरो बॅलन्स’ खाते

‘लाडकी बहीण’साठी ‘झिरो बॅलन्स’ खाते

Published on

‘लाडकी बहीण’साठी ‘झिरो बॅलन्स’ खाते

मनीष दळवी ः जिल्हा बॅंकेतर्फे योजना प्रभावी राबविणार

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधून ‘झिरो बॅलन्स’ने बचत खाते उघडण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
या योजनेच्या नाव नोंदणीसाठी १ जुलैपासून सुरुवात झाली असून, ३१ ऑगस्टपर्यंत लाभार्थ्यांचे अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ या वयोगटातील महिलांना दर महिना १,५०० रुपये महाराष्ट्र शासन जुलैपासून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. या कामासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक तर नागरी भागासाठी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वॉर्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे व पोर्टलवर अपलोड करण्याचे काम दिले आहे.
केंद्र व राज्याच्या सर्व लोकाभिमुख योजना राबविण्यामध्ये सिंधुदर्ग जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजनाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत बँकेच्या सर्व ९८ शाखांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आणि डीबीटी आधार लिंकींग असणे गरजेचे आहे. त्यामुळे या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत, परंतु ज्यांनी अजून बचत खाते उघडलेले नाही, अशा महिलांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधून ‘झिरो बॅलन्स’ने बचत खाते उघडण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. सिंधुदुर्गातील जास्तीतजास्त महिलांनी जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये आपले बचतखाते सुरू करावे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत खाते असलेल्या महिलांनी शाखेला भेट देऊन आपले खाते आधार लिंक करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन दळवी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.