पान एक-पावसाची झोड सुरुच

पान एक-पावसाची झोड सुरुच

Published on

96027
आचरा ः परिसरात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे घरांना पाण्याचा वेढा पडला होता.

पावसाची झोड सुरूच
आचऱ्यात पूरस्थिती; शिवापूरचा बंधारा फुटला

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ ः जिल्ह्यात पावसाचा जोर किंचित कमी झाला असला तर किनारपट्टी भागात कायम आहे. या भागात झालेल्या पावसामुळे आचरा परिसरात पूरस्थितीने तेथील नागरिकांची सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास धावपळ उडाली. येथील २० ते २५ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. वाहतूक विस्कळीत झाली असून शिवापूर येथील बंधारा वाहून गेला आहे. उर्वरित जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
जिल्ह्याला रविवारी (ता. ७) मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. त्यानंतर सोमवारी दिवसभर किनारपट्टी भागासह लगतच्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर राहिला. उर्वरित जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. सोमवारी मध्यरात्रीनंतर किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आचरा परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास पाणी भरण्यास सुरुवात झाली. भागातील सर्व रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. आचरा येथील गाऊडवाडी आणि खिश्चनवाडी येथील २० ते २५ घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. शिवापूर येथील बंधारा पाण्याच्या दाबामुळे फुटला आहे.
जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आज सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. मालवण, वेंगुर्ले आणि देवगड तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सावंतवाडी आणि कुडाळमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत; परंतु, किनारपट्टीच्या तुलनेत उर्वरित जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत घट झाली. पुराचे पाणी ओसरले असून विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. खारेपाटण शहरातील पाणी ओसरले आहे.
जिल्ह्यात पावसामुळे नुकसानीचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १८४ घरांचे नुकसान झाले आहे. दोन दुधाळ जनावरे तर ३०५० कोंबड्या दगावल्या आहेत. शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.


तीन दिवस आँरेज अलर्ट
जिल्ह्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने शुक्रवारपर्यंत (ता. १२) येलो अलर्ट तर शनिवारी (ता. १३) रेड अलर्ट जाहीर केला आहे. सध्या नद्यांच्या पातळीत वाढ आहे. त्यातच पुढील तीन-चार दिवसांत पाऊस झाल्यास पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.