निती आयोगाकडून ''एआय''चा अभ्यास सुरु
swt3014.jpg 
01395
सिंधुदुर्गनगरी ः नीती आयोग समिती सदस्यांचे स्वागत करताना पालकमंत्री नितेश राणे. सोबत डावीकडून मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अन्य.
निती आयोगाकडून ‘एआय’चा अभ्यास सुरु
सिंधुदुर्ग जिल्हा दौरा ः दोन सदस्यांची टिम दाखल
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३० ः प्रशासकीय कारभारात एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा देशातील पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एआयचा अभ्यास करण्यासाठी केंद्राच्या नीती आयोगातील डॉ. देवव्रत त्यागी, विदीशा दास या दोन सदस्यांची टीम आज जिल्ह्यात दाखल झाली. पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी समितीचे स्वागत केले. पहिल्याच दिवशी या समितीने जिल्ह्याच्या एआयच्या कार्यालयाला भेट दिली असून दिवसभर विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून एआयमुळे प्रशासकीय कारभारात झालेला फायदा याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने १ मे २०२५ ला एआयचा वापर करण्यास प्रारंभ केला. याची दखल राज्य शासनाने घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर अन्य जिल्ह्यांनी एआयचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानंतर केंद्राने सुद्धा याची दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रशासकीय कारभारात एआयचा वापर करायचा आहे. त्यासाठी कार्यक्रम जाहीर करायचा आहे. त्यामुळे याचा प्राथमिक पाया तयार करण्यासाठी देशभरात माहिती संकलन सुरू केले. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा एआयचा वापर करणारा पहिला जिल्हा ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाशी संलग्न असलेल्या नीती आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची याबाबत अभ्यास करण्यासाठी निवड जाहीर केली. त्यानुसार ३० आणि ३१ ला द्विसदस्य समिती जिल्ह्याचा अभ्यास करणार आहे. 
आज दुपारी समितीचे सदस्य डॉ. त्यागी, श्रीमती दास यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राणे, जिल्हाधिकारी धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री राणे आणि जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी समितीच्या सदस्यांसमोर सादरीकरण केले. मार्व्हल कंपनी यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने विकसित केलेले एआय तंत्र याबाबत माहिती देण्यात आली. यासाठी घेण्यात आलेले परिश्रम, यामुळे प्रशासकीय कारभारात झालेला फायदा याची माहिती देण्यात आली. ही समिती उद्या (ता.३१) सायंकाळपर्यंत जिल्ह्यात वास्तव्य करणार आहे. या कालावधीत जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद यांना भेटी देणार आहे. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिस, आरोग्य, शिक्षण, कृषी आदी विभागांचा आढावा समिती सदस्य घेणार आहेत. त्यानंतर याबाबतचा अहवाल नीती आयोग कार्यालयाला सादर केला जाणार आहे.
चौकट
जिल्ह्याचा अभिमान वाढला ः पालकमंत्री
पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेले नीती आयोग कार्यालयाचे दोन अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एआयचा अभ्यास करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने आपल्या जिल्ह्याची चर्चा देशात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील दहा जिल्हे एआय वापरात विकसित करायचे आहेत. यासाठी त्यांच्या कार्यालयाने मार्व्हेल कंपनीला संपर्क केला. या उपक्रमासाठी पंतप्रधान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एआयचा आधार घेणार आहेत. ही जिल्ह्याच्या दुष्टीने मोठी गोष्ट आहे. पहिला १०० टक्के साक्षर असलेला जिल्हा आता एआय वापरणारा पहिला जिल्हा ठरल्याने जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे, अशी माहिती पालकमंत्री राणे यांनी दिली.

