विज्ञानोत्सवात शाळांनी योगदान द्यावे
10400
विज्ञानोत्सवात शाळांनी योगदान द्यावे
प्रफुल्ल वालावलकर ः साळगावात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः ‘तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठी तालुक्यातील शाळांनी पुढाकार घ्यावा,’ असे प्रतिपादन गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग व कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून साळगाव येथील प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात कुडाळ तालुकास्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात झाली. गटविकास अधिकारी वालावलकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने उद्घाटन झाले. साळगाव शाळा क्र. १ च्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, अध्यापक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मयुर शारबिद्रे, माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष अजित परब, परीक्षक संदीप गुरव, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती तालुकाध्यक्ष शशांक आटक, विस्तार अधिकारी स्वप्नाली वारंग, रश्मी ठाकूरदेसाई, परीक्षक उदय गोसावी, कृषी विद्यालय ओरोसचे प्रसाद ओगले, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्रज्ञा सावंत, निवृत्त मुख्याध्यापक विवेकानंद बालम, साळगाव शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक श्री. मसके आदी उपस्थित होते.
विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी ‘एसटीईएम’ संकल्पनेवर आधारित असलेल्या या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून प्राथमिक विभागात ४९ विद्यार्थी, ३ शिक्षक, ३ दिव्यांग विद्यार्थी आणि ४ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत, तर माध्यमिक विभागात २२ विद्यार्थी, २ शिक्षक, ४ दिव्यांग विद्यार्थी व दोन शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
श्री. वालावलकर यांनी, निसर्ग आणि आपली संस्कृती या विज्ञानातून जपणे गरजेचे आहे. हे प्रदर्शन आपल्या तालुक्याला वेगळ्या उंचीवर नेणारे ठरेल, असे सांगितले. आटक यांनी, अतिशय कमी वेळात या प्रशालेने प्रदर्शनाचे नियोजन केले. गेल्या वर्षीचा तालुका विज्ञान प्रदर्शनाचा निधी अद्याप मिळाला नाही. तेव्हा, तालुक्याच्या बजेटच्या निधीबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांची तारांबळ उडते. त्यामुळे विज्ञान प्रदर्शनाला निधी मिळावा, अशी मागणी केली. वालावलकर यांच्या हस्ते भित्तिपत्रिका अनावरण व प्रदर्शन हॉलचे उद्घाटन झाले. मान्यवरांनी प्रदर्शनात मांडलेल्या विज्ञान प्रतिकृतींची पाहणी केली. या प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळा सोमवारी (ता. १५) होणार आहे. किंजवडेकर यांनी प्रास्ताविक केले. साळगाव हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक विद्यानंद पिळणकर यांनी सूत्रसंचालन केले. अध्यापक महाविद्यालयाचे आर. बी. जाधव यांनी आभार मानले.

