दुरंगी ते चौरंगी लढतींच्या रणधुमाळीत राजकीय गणिते बदलणार0
शिंदे शिवसेनेपुढे आघाडीचे आव्हान
मंडणगड तालुका; दुरंगी,चौरंगी लढतींनी गणिते बदलणार?
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २९ ः तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे यंदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी लढतींमुळे निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या तालुक्यात शिंदे शिवसेनेपुढे अपेक्षेपेक्षा महाविकास आघाडीचे कठीण आव्हान आहे.
महाआघाडीच्या घोषणेमुळे विरोधक एकदिलाने लढतील, अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र प्रत्यक्षात जागावाटपाच्या धुसफुशीमुळे आघाडीतील पक्षांमध्येच मतभेद उफाळून आले असून, त्याचा थेट परिणाम निवडणूक गणितांवर होणार आहे. भाजप व काँग्रेस (आय) यांचे स्वतंत्र अस्तित्व तर राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटातील समन्वयाचा अभाव यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींचे गोंडस चित्र रंगवले गेले आहे. भिंगळोली पंचायत समिती गणात महाआघाडीची अधिकृत घोषणा होऊनही जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. परिणामी, राष्ट्रवादी व उबाठा शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिल्याने येथे चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फटका थेट विरोधकांनाच बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. भिंगळोली जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे, उबाठा शिवसेना व काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असून, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे आणि अस्मिता केंद्र यांच्यातील सामना विशेष लक्षवेधी ठरणार आहे. बाणकोट जिल्हा परिषद गटात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बसपा यांच्यात तिरंगी लढत होत असून, येथे माजी सदस्य प्रकाश शिगवण यांची दीर्घकालीन राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंचायत समिती गणांचा विचार करता इस्लामपूर गणात शिवसेना (उबाठा), भाजप व शिवसेना अशी तिरंगी लढत रंगणार असून, माजी सभापती प्रणाली चिले यांच्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. बाणकोट पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट दुरंगी लढत होणार आहे. तुळशी पंचायत समिती गणात मात्र शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी व उबाठा शिवसेना अशी चौरंगी लढत होत असल्याने हा गण अत्यंत अटीतटीचा ठरण्याची शक्यता आहे.
------
चौकट
नवी राजकीय समीकरणे
स्वबळावर मैदानात उतरलेल्या शिंदे शिवसेनेला विरोधक एकत्रित आव्हान देण्यात कितपत यशस्वी ठरतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. येथील निवडणूक निकालानंतर अनेक राजकीय समीकरणे नव्याने उदयास येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

