कलिंगड शेतीतून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श
20879
20880
कलिंगड शेतीतून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श
पाटमधील शेतकऱ्यांची यशोगाथा; जिद्दीच्या जोरावर शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग
संदीप चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३० ः कुडाळ तालुक्यातील पाट गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक नोकरीच्या वाटेऐवजी शेतीला व्यवसायाचे स्वरूप देत कलिंगड शेतीतून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श उभा केला आहे. गावातच राहून कुटुंबीयांच्या सहकार्याने आधुनिक पद्धतीने कलिंगड उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्यांनी मेहनत, नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर यशस्वी उदरनिर्वाहाचा मार्ग निर्माण केला आहे.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र कलिंगड हंगामाला सुरुवात झाली असून, पाट गावात सर्वांत आधी कलिंगड उत्पादन घेतले जाते. कृषीप्रधान ओळख असलेल्या या गावात बागायती व जिरायती अशा दोन्ही प्रकारच्या शेती पद्धतीने मोठ्या प्रमाणावर कलिंगड पीक घेतले जाते. येथील कलिंगड चवीला मधुर असल्याने सिंधुदुर्गसह कोल्हापूर, बेळगाव, गोवा आणि स्थानिक बाजारपेठेत याला मोठी मागणी आहे.
कलिंगड पिकासाठी गणेशोत्सवानंतर जमिनीवर वाफे तयार करून बी पेरणी केली जाते. बी पेरल्यानंतर सुमारे ६० दिवसांत कलिंगड तोडणीस येते. या कालावधीत पिकांची योग्य मशागत, वेळेवर पाणीपुरवठा, सेंद्रिय खतांचा वापर आणि वन्यप्राण्यांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सध्या पाट गावातून अंदाजे ४० ते ५० टन कलिंगड बाजारात पाठवले जात असून, या शेतीतून वार्षिक ५ ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. तोडणीनंतर कलिंगड टेम्पोद्वारे स्थानिक बाजारपेठेसह गोवा, कोल्हापूर, बेळगाव व रत्नागिरी येथे घाऊक स्वरूपात विक्रीस पाठवले जाते. किरकोळ विक्रीत प्रति किलो १५ ते २० रुपये दर मिळतो, अशी माहिती कलिंगड उत्पादकांनी दिली.
-----------
कलिंगडसोबत विविध पिके
पाट गावाची ओळख कृषीप्रधान म्हणून असून, येथे कलिंगडासोबत मिरची, चवळी, पालेभाज्या, कुळीथ तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी यांसारखी पिकेही घेतली जातात. श्री देवी माऊली मंदिराजवळील नंदनवन पाट तलावाच्या पाण्यावर ही शेती अवलंबून आहे. चांगले उत्पन्न मिळत असल्याने सध्या येथील युवा वर्गही कलिंगड शेतीकडे वळत असून, ही शेती फायदेशीर ठरत आहे.
---------------
वन्यप्राण्यांकडून नुकसान
कलिंगड शेतीतून आर्थिक फायदा होत असला तरी माकडे, गवरेडे व रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
----------------
कोट
योग्य नियोजन, वेळेवर मशागत आणि कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे कलिंगड शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. नोकरीच्या मागे न धावता शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले, तर गावातच स्वावलंबी जीवन जगता येते.
- रामदास परब, कलिंगड उत्पादक शेतकरी
---------------
कोट
योग्य नियोजन, खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर केवळ दोन महिन्यांच्या कलिंगड पिकातूनही लाखो रुपयांचा नफा मिळू शकतो.
- संतोष चांदोस्कर, कलिंगड उत्पादक शेतकरी
-------------
कोट
युवा पिढीने केवळ नोकरीच्या मागे न धावता शेतीकडे वळल्यास नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकते. यासाठी कृषी विभाग व शासनाने तरुणांना शेतीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे.
- सहदेव प्रभू, शेतकरी
------------
कोट
वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यावर शासनस्तरावर तातडीची उपाययोजना झाल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो.
- संजय प्रभू, कलिंगड बागायतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

