रेल्वे स्थानकांमध्ये मोबाईल चोरीचे सत्र
रेल्वे स्थानकांमध्ये
मोबाईल चोरीचे सत्र
कणकवली ः ठाणे रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल चोरीचे सत्र सुरू केले आहेत. अवघ्या दोन दिवसांत प्रथम वर्ग डब्यांतून तीन प्रवाशांचे एकूण दीड लाख रुपयांहून अधिक किमतीचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तिन्ही प्रकरणांमध्ये ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविले असून तपास सुरू आहे.
पहिली घटना २७ जानेवारीला सायंकाळी घडली. शहाड (पूर्व), कल्याण येथील रहिवासी व ठाणे येथील स्टर्लिंग इन्फोरमेशन रिसोर्सेस प्रा. लि. या कंपनीत कार्यरत असलेले शुभम सिंह (वय २५) हे कामावरून घरी येत होते. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर आलेल्या धीम्या टिटवाळा लोकलच्या प्रथम वर्ग डब्यात चढले. याचवेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने खिशातील २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. दुसरी घटना २८ जानेवारीला सायंकाळी ६.२२ वाजता घडली. उल्हासनगर येथील रहिवासी दीपेश रंगवाणी (वय २३) हे ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवरून अंबरनाथ प्रथम वर्ग डब्यात चढताना त्यांच्या खिशातून ६२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला. तिसरी घटना याच दिवशी सायंकाळी ६.२५ वाजता घडली.
---------
ग्रामरोजगार सहाय्यक
आजपासून संपावर
कणकवली ः : रत्नागिरी तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी रविवारपासून (ता. १ फेब्रुवारी) बेमुदत संप पुकारला आहे. मनरेगा कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. गेले ५ ते १० वर्षे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी ते इतर कर्मचारी यांच्या सहाय्याने गावातील मनरेगाची सर्व कामे ग्रामरोजगार सहाय्यक करत आहे. यामध्ये मस्टर काढणे, जिओ टॅगिंग करणे, ई-केवायसी करणे, कामांचे प्रस्ताव सादर करणे व मस्टर व एमबी तालुक्याच्या ठिकाणी पोच करणे, अशा प्रकाराची अनेक कामे ग्रामरोजगार सहाय्यक कमी मानधनात करत आहे. त्यांच्याकडे कधी कधी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी पैसे नसतात. त्यांना मिळणारे मानधन हे अतिशय तुटपुंजे आहे. मानधनातून उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही. त्यामुळे कामगार व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वेळोवळी शासनाकडे पत्रव्यवहार करूनही शासन दुर्लक्ष करत आहे, असे सहाय्यकांचे म्हणणे आहे.
-----
वृद्ध दाम्पत्याची
लाखोंची फसवणूक
ठाणे : टेलिकॉम विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून घोडबंदर रोडवरील एका ६८ वर्षीय वृद्ध महिलेसह त्यांच्या ७५ वर्षीय पतीची नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे. कावेसर भागात राहणाऱ्या तक्रारदार महिलेला १७ जानेवारी रोजी ‘अरुण कुमार’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण टेलिकॉम डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर ‘सचिन यादव’ नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने क्राइम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून महिलेला धमकावले. तुमच्या मोबाईल क्रमांकावरून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवले जात असून, तुमचा संबंध मनी लाँड्रिंग प्रकरणाशी आहे, असा बनाव रचण्यात आला. आरबीआयकडून पडताळणी व्हायची आहे, असे सांगून या वृद्ध दाम्पत्याला काही काळ ‘डिजिटल कस्टडी’मध्ये ठेवण्यात आले. अटकेची भीती दाखवून भामट्यांनी या दाम्पत्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली आणि नऊ लाख रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडले. पैसे देऊनही ते परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे या दाम्पत्याच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी अरुण कुमार आणि सचिन यादव या दोघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या सायबर भामट्यांचा शोध घेत आहेत.
-----
बॅटरीचा स्फोट;
दुचाकीला आग
ठाणे : घरात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ठाण्यातील मानपाडा परिसरातील मनोरमानगर येथील श्रुती गार्डन सोसायटीत घडली. इमारत क्रमांक ए/०६ मधील पहिल्या मजल्यावरील रूम नंबर १०२ समोर ही घटना घडली. या आगीत घराचा मुख्य दरवाजा, लाकडी कपाट, पंखा; तसेच वीजवाहिन्या पूर्णपणे जळून गेल्या. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे घर विजय नवघरे यांच्या मालकीचे आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एका अग्निशमन वाहनाच्या मदतीने आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यात आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.
--------
घरात अडकलेल्या
भावा-बहिणीची सुटका
ठाणे : दिवा येथील खर्डी गावातील कोयल या तळ अधिक सात मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रूम क्रमांक ४०१ मध्ये अडकलेल्या सहावर्षीय रुही व विहान शिर्के या भावा-बहिणीची ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. घराचा मुख्य दरवाजा लॉक झाल्याने दोघेही आत अडकले होते. सूरज सावंत यांनी घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिल्यानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने दरवाजा उघडून दोघांची सुरक्षित सुटका करत त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

