राजापूर-राजापुरात जलजीवनचे काम संथगतीने
राजापुरात जलजीवनचे काम संथगतीने
५० गावे हर घर जल घोषित ; १५० गावांना प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः केंद्र शासनातर्फे हर घर जल देणारी जलजीवन मिशन योजना ही महत्वाकांक्षी योजना तालुक्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे राबवली जात आहे. आजपर्यंत तालुक्यातील ५० महसूली गावे हर घर जल म्हणून घोषित झाली; मात्र, सुमारे दीडशे गावांना हर घर जल घोषित होण्याची प्रतीक्षा आहे. पाणीटंचाई आराखडा बैठकीमध्ये सरपंचांनी जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीतील भोंगळ कारभावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर, नळपाणी योजनांच्या पूर्णत्वाबाबत फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यातील टंचाईच्या झळा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
जलजीवन मिशन योजनेसाठी तालुक्यात सर्व्हेक्षण होऊन आराखडा तयार करण्यात आला. सप्टेंबर २०२४ पर्यंत जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्याचा निधार्र शासन आणि प्रशासनाने केला होता; मात्र, निर्धारित कालावधीमध्ये कामे पूर्ण न झाल्याने त्याला मार्च २०२५ पर्यंत मुदवाढ देण्यात आली. त्या कालावधीमध्येही कामे पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यामध्ये मंजूर झालेल्या ११२ कोटीमधून २०० महसुली गावांमध्ये सध्या कामे सुरू आहेत. त्यापैकी ५० गावे सध्या हर घर जल म्हणून घोषित झाली असून, दीडशे गावांना हर घर जल म्हणून घोषित होण्याची प्रतीक्षा आहे. जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी धिम्या गतीने सुरू आहे. पाच वर्षे झाली तरी काही गावांमध्ये नळपाणी योजनेची कामेच सुरू झालेली नाहीत.
-------
चौकट
प्रशासनावर ताशेरे
स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी-अधिकारी आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रशासनाने जलजीवन मिशन योजनेच्या नळपाणी योजनांचे आराखडे तयार केले असते तर राजापूर तालुक्यामध्ये संभाव्य पाणीटंचाई आराखडा बैठक घ्यायची वेळ आली नसती, असे ताशेरे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि कोंडीवळेचे सरपंच रविकांत मटकर यांनी बैठकीत ओढले होते.
चौकट ः १
दृष्टिक्षेपात राजापूरातील जलजीवन मिशन योजना
एकूण मंजूर कामे असलेली गावे ः २०५
मंजूर निधी ः ११२ कोटी
हर घर जल घोषित गावे ः ५०
७५-८० टक्के प्रगतीपथावर कामे ः ६५
चौकट
हर घर जल घोषित झालेली गावे
शिवणेखुर्द, बुरंबेवाडी, बाकाळे, दसूरवाडी, पोकळेवाडी, चिखलगाव, पाजवेवाडी, निवेली, तेरवण, थोरलीवाडी, साखर, येरडव, गोठीवरे, कारवली, कशेळी-वरचीवाडी, दसूर, कोंभे, सागवे-पालये, खिणगिणी, जैतापूर-बाजारवाडी, सौंदळ-मुसलमानवाडी, नाणार-वाडीचिवारी, कुंभवडे-हरचलेवाडी, कुंभवडे, डोंगर-दत्तवाडी, मठ खुर्द, सोलगाव, कुवेशी-तुळसुंदेवाडी, वाडावेत्ये, गोठणेदोनिवडे, वावूळवाडी, बारसू, भाबलेवाडी, निखरेवाडी, कोदवली-मांडवकरवाडी, मोगरे, केरावळे, सागवे जांभारी, देवीहसोळ, कोंडसरबुद्रुक, बेनगी, वड़दहसोळ-खालचीवाडी, पळसमकरवाडी, करेल, डोंगर-मुसलमानवाडी, परटवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

