

39857
भरधाव मोटार घुसली थेट दुकानात
मळगावातील दुर्घटना; दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात अपघात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ : रस्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पर्यटकांची मोटार थेट रस्त्यालगतच्या काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये घुसली. या अपघातात मोटारीतील तीन युवक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने स्टॉल मालक जेवण्यासाठी घरी गेले असल्याने मोठा अनर्थ टळला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव सुतारवाडी सर्कल येथे आज दुपारी घडला.
घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरीला असलेले आणि मूळचे उज्जैन (मध्य प्रदेश) येथील चार युवक सुटीनिमित्त गोव्यात पर्यटनासाठी आले होते. मोटार (२३ बीएच ८५३३ ए) मधून ते गोव्याहून मुंबईच्या दिशेने परतत होते. दुपारी मळगाव सुतारवाडी सर्कलजवळ आले असता, एक दुचाकीस्वार अचानक महामार्ग ओलांडू लागला. त्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात मोटार चालकाने अचानक ब्रेक मारला. यामुळे चालकाचा ताबा सुटून मोटार प्रथम दुभाजकावर आदळली आणि महामार्गावर उलट दिशेने फिरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या काजूगर विक्रीच्या स्टॉलवर जाऊन जोरात धडकली. या अपघातात मोटारीतील तीन युवक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ गजानन सामंत, सुभाष राऊळ, सतीश राऊळ, महादेव राऊळ, दीपक जोशी, श्यामसुंदर राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे हवालदार मनोज राऊत, दीपक शिंदे, ट्राफिक पोलीस गुरुनाथ नाईक, चालक मयूर निरवडेकर आणि पोलिस पाटील साईश केरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताबाबत पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार किंवा खबर नोंदवण्यात आली नव्हती.
-------------
...तर मोठी दुर्घटना घडली असती
हा काजू विक्रीचा स्टॉल मळगाव पिंपळवाडी येथील रहिवासी मंगेश राऊळ यांच्या मालकीचा आहे. अपघात झाला त्यावेळी राऊळ हे योगायोगाने जेवण करण्यासाठी घरी गेले होते. ते जेवण करून पुन्हा दुकानाच्या दिशेने येत असताना त्यांच्या डोळ्यांदेखत हा अपघात झाला. जर ते त्यावेळी दुकानात असते, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. या अपघातात दुकानाचे आणि साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.