बीएसएनएल सेवा वारंवार विस्कळीत

बीएसएनएल सेवा वारंवार विस्कळीत
Published on

बीएसएनएल सेवा वारंवार विस्कळीत

ग्राहक त्रस्त : तातडीने सुधारणा करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ५ ः येथील शहरातील बी.एस.एन.एल. मोबाईल सेवा अधूनमधून विस्कळीत होत असल्याने ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मध्येच बोलणे अर्धवट होऊन कॉल बंद पडणे, एकतर्फी संभाषण होणे तर काहीवेळा वारंवार प्रयत्न करूनही कॉलच न लागणे अशा तक्रारी वाढत आहेत. यामुळे ग्राहकांना याचा मनस्ताप होत असल्याचे सांगितले जाते.
संपर्कासाठी प्रभावी माध्यम म्हणून बी.एस.एन.एल. मोबाईल सेवेकडे पाहिले जाते. मात्र सद्यस्थितीत येथील ग्राहक अनेक समस्यांनी ग्रासले आहेत. तातडीने एखाद्याला कॉल करावा तर वारंवार प्रयत्न करूनही कॉलच न लागणे, त्यातूनही कॉल लागला तर अर्धवट संभाषण होऊन कॉल मध्येच बंद पडणे, काहीवेळा एकतर्फी संभाषण होणे आदी समस्या जाणवतात. तसेच वीज प्रवाह खंडित झाल्यावर कॉल बंद पडत असल्याचेही चित्र आहे. यामुळे ग्राहक सध्या अस्वस्थ आहेत. नेटवर्क समस्येमुळे अनेक कामे खोळंबतात. येथील शासकीय कार्यालयातही कामांना विलंब लागत असल्याने ग्राहक हैराण असतात. शाळा, महाविद्यालय तसेच अन्य शैक्षणिक प्रवेशासाठी नेटवर्कमुळे ऑनलाईन समस्या जाणवते. तसेच विविध भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करणे, त्यासाठीचे दाखले मिळवणे यामध्ये नेटवर्क समस्यांचा अडसर जाणवत असल्याचे नागरिक सांगतात. तसेच धान्य दुकानावरही नेटवर्क समस्येमुळे विलंब होत असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे बी.एस.एन.एल. सेवा वारंवार विस्कळित होत असल्याने काहींना नाईजास्तव खाजगी सेवेचा आधार घेण्याची वेळ येते. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सेवा विस्कळित होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सेवेमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणीही होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com