

रोहित चक्रदेव यांचा प्रामाणिकपणा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : ऑनलाइन व्यवहारातील चुकीमुळे खात्यात जमा झालेली जादा रक्कम स्वतःकडे न ठेवता ती तत्काळ मूळ मालकाला परत करून कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील रोहित चक्रदेव यांनी प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.
मालवण तालुक्यातील चौके येथील एका प्रवाशाला मुंबईला जाण्यासाठी रेल्वेची दोन तिकिटे काढायची होती. त्यांनी रोहित चक्रदेव यांना तिकीट काढून देण्याची विनंती केली. चक्रदेव यांनी तिकीट काढून दिल्यानंतर त्याची एकूण रक्कम ११०० रुपये झाली. ११०० रुपये ऑनलाइन पाठवताना संबंधितांनी चुकीने एका शून्याची वाढ करून ११ हजार रुपये चक्रदेव यांच्या खात्यावर जमा झाले. ही चूक लक्षात येताच त्या प्रवाशाने तातडीने चक्रदेव यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. आपल्या खात्यावर जादा रक्कम जमा झाल्याचे समजताच चक्रदेव यांनी क्षणाचाही विलंब न करता उर्वरित ९ हजार ९०० रुपयांची रक्कम परत केली. डिजिटल युगात चुकीने आलेली रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या चक्रदेव यांच्या या वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---