

पाण्याच्या समृद्धीसाठी गंगा आरती
चिपळुणात वाशिष्ठीच्या, तिरी रविवारी आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः येथील श्री भैरी भवानी नवरात्रोत्सवाच्यावतीने दुष्काळ निवारणासाठी वाशिष्ठीच्या तिरी गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात ही गंगा आरती होणार आहे. त्यासाठी खास वाराणसी येथून भक्तगण आरतीसाठी येणार आहेत.
श्री भैरी भवानी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करत असते. १५ला श्री वाघदेवी भजन मंडळ, ढोक्रवली यांचे भजन, १६ ला जय हनुमान नाच मंडळ कुंभारवाडी टेरव यांचे जाखडी नृत्य, १८ ला देवीचा गोंधळ, भोंडला व रांगोळी स्पर्धा तसेच दांडिया होईल. १९ ला रास दांडिया, २० ला दसरा व दांडिया होईल तर २१ ला महाप्रसाद आणि विसर्जन सोहळा होणार आहे. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे, या ठिकाणी काशी विश्वनाथ नगरीतील गंगा आरती होणार आहे. वाशिष्ठीच्या तिरावर परशुराम भूमीत हा अनुभव घेता येणार आहे. सद्यःस्थितीत दुष्काळाचे सावट आहे. भविष्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. त्यामुळे पाण्याचे महत्त्व लोकांना समजून यावे, या हेतूने या गंगा आरतीला विशेष महत्त्व आहे. या वेळी गंगामातेला दुष्काळाचे निवारण कर, असे आवाहन केले जाणार आहे. या वेळी शंख, घंटा, मंत्रोपचार होणार आहेत. गंगानदीत स्नान केल्यानंतर पाप नष्ट होते असे सांगितले जाते. या आरतीमधून सामूहिक एकात्मता साधली जाते. वाराणसी, हरिद्वार आणि ऋषिकेश येथील आरतीमध्ये देश-विदेशातील हजारो नागरिक एकत्र येत असतात. या पार्श्वभूमीवर चिपळुणातील गंगा आरतीला विशेष महत्त्व आले आहे. दुष्काळाशी लढण्यासाठी सामूहिक ताकद निर्माण व्हावी या उद्देशाने ही आरती आयोजित केली आहे. आरतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन भैरी भवानी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.