

- rat१६p११.jpg-
26O70494
चिपळूण ः दृष्टीबाधितांना रस्ता ओलांडण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
---
पांढऱ्या काठीचा आधार, स्वावलंबनाचा विश्वास
चिपळूणमध्ये जनजागृती ; जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ : ‘‘दृष्टीबाधित व्यक्तींच्या जीवनात पांढरी काठी ही केवळ एक आधाराची काठी नसून, त्यांच्या स्वावलंबन, सुरक्षितता आणि आत्मविश्वासाचे ते एक प्रमुख प्रतीक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने दृष्टीबाधित बांधवांच्या समस्या समजून घेत त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागणे गरजेचे आहे,’’ असा संदेश जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.
नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड (नॅब), रत्नागिरी जिल्हा शाखेच्यावतीने गुरूवारी चिपळूण शहरात जनजागृतीपर विविध उपक्रम अत्यंत उत्साहात राबवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातील गजबजलेल्या विजापूर-गुहागर राज्यमार्गावर दृष्टीबाधित बांधवांनी पांढऱ्या काठीच्या सहाय्याने सुरक्षितपणे रस्ता कसा ओलांडावा, याचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. पांढरी काठी ही दृष्टीबाधितांना स्वतंत्रपणे चालताना मार्गातील अडथळे ओळखण्यास आणि कोणाच्याही आधाराशिवाय सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास कशी मदत करते, याचे प्रभावी दर्शन या प्रात्यक्षिकातून घडवण्यात आले.
या प्रसंगी ‘नॅब’चे अध्यक्ष नीलेश भुरण, सेक्रेटरी भरत नांदगावकर, अमिता टिकेकर, खजिनदार नयन साडविलकर, ॲड. विवेक रेळेकर आणि प्रकाश पाथरे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सामाजिक सहभागातून लायन्स क्लब गॅलक्सीच्या अध्यक्षा विद्या रेळेकर, लायन्स क्लब युनिटीच्या अध्यक्षा प्रणिता कपडेकर आणि परिसरातील दृष्टीबाधित बांधव-भगिनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नॅबचे विकास अधिकारी संदीप नलावडे, सहाय्यक रूपेश गुरव यांच्यासह नॅबच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
---
समाजात सजगता निर्माण करणे हा उद्देश
दृष्टीबाधितांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींबाबत समाजात सजगता निर्माण करणे आणि पांढऱ्या काठीचे नेमके महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.