Animals And Birds Migration : भीवघरमधील पशु-पक्ष्यांचे स्थलांतर रोखण्यात यश; वनप्रेमी संस्थेकडून जंगलात पाण्याची सुविधा
महाड : पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील नागरिक मेटाकुटीला आले असताना उष्म्यामुळे जंगलातील पशुपक्षीही बेजार झाले आहेत. दाण्या-पाण्यासाठी त्यांची वणवण होत असून महाड तालुक्यातील भीवघर येथील वनप्रेमी संस्थेकडून पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
भीवघर हे गाव वनप्रेमी संस्था आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून वणवामुक्त झाले आहे. त्यामुळे गावातील जंगल बहरले असून पशुपक्ष्यांचा वावरही वाढला आहे. परंतु वाढत्या उष्म्यामुळे जंगलातील पशु-पक्ष्यांना भटकंती करावी लागते.
महाड तालुका दुर्गम आणि डोंगराळ तालुका असून पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. जिथे माणसांना पाण्यासाठी वणवण करावी लागते, तिथे जंगलांतील पशुपक्ष्यांची काय परिस्थिती असेल, याची कल्पनाही करणे अवघड. पशु-पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी वनप्रेमी व दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत.
भीवघर गावातील किशोर पवार या तरुणांनी वनप्रेमी संस्थेच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना एकत्र केले आणि वनविभागाच्या सहकार्यातून गाव वणवामुक्त केले. गावात नव्याने वृक्ष लागवड करण्यात आली. यामुळे गावातील जंगल वाढले आणि या जंगलातून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. पर्यावरण रक्षणामुळे अनेकजण गावाला भेट देत आहेत.
या वर्षी संस्थेचे अध्यक्ष किशोर पवार यांनी स्वखर्चातून पहिला टँकर सुरू केला आणि पाहता पाहता अनेक दानशूर व्यक्ती पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी पुढे आल्या. मिलिंद धारप, वैशाली सोमाणी, रमेश कारंजकर,
अभिजित जंगम, सोमनाथ वाले, विरल गांधी, श्रीधर गोगटे असा अनेक जणांनी यासाठी मदत केली. आदिवासी समाज देखील कुऱ्हाडबंदी व शिकारबंदी करून उपक्रमाला सहकार्य करीत आहे. त्यांनाही पाणीटंचाई भेडसावत असून यातून त्यांचीही पाण्याची गरज भागते.
भीवघरमधील वनसंपदा टिकून
जंगलामध्ये कातळ व दगडांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी खड्डे खणून पशुपक्षांना पाण्याची सोय केली आहे. याशिवाय छोटी छोटी भांडी जंगलात ठेवली जातात. संस्थेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ जंगलातील विविध भागांमध्ये झाडाझुडपांमध्ये पशुपक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी साठवून ठेवत आहेत. सुमारे पाच-सहा दिवसहे पाणी पुरते. अनेक वर्षांपासून संस्थेचा हा उपक्रम सुरू आहे. त्यामुळे भीवघरमधील वन्यजीव संपदा टिकून आहे. यासाठी गावामध्ये खास टँकर मागवला जातो. टॅंकरमधील पाणी सर्व ग्रामस्थ व संस्था जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत पिण्याच्या पाण्याची सोय करतात.
वनप्रेमी संस्थेला अनेक दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे. संस्थेचे सदस्यही उन्हातान्हात झटत असतात. पाणी मिळाल्याने पशुपक्षी स्थलांतरही थांबले आहे.
- दीपक आंब्राळे, उपाध्यक्ष, वनप्रेमी संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.