Health
Health Sakal

Raigad News : आरोग्‍य केंद्रांमध्ये तज्‍ज्ञ डॉक्‍टर मिळेना; महाड तालुक्‍यात ५३ पदे रिक्त; रुग्‍णसेवेवर परिणाम; नाहक भुर्दंड

दुर्गम व आपद्‌ग्रस्त तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाडमधील आरोग्य विभागात १४९ पदांपैकी तब्बल ५३ पदे रिक्त

Mahad News : दुर्गम व आपद्‌ग्रस्त तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाडमधील आरोग्य विभागात १४९ पदांपैकी तब्बल ५३ पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता असल्‍याने रुग्‍णसेवेपर परिणाम होत आहे. खेड्या-पाड्यातून येणाऱ्या रुग्‍णांना वेळेत उपचार मिळण्यास विलंब होत आहे तर काहींना नाहक खासगी रुग्‍णालयांचा आधार घ्‍यावा लागत आहे.

महाड तालुक्यात दरवर्षी कुठेना कुठे नैसर्गिक आपत्ती उद्‌भवते. दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, याकरिता ग्रामीण भागातील दासगाव ,विन्हेरे, बिरवाडी, पाचाड, चिंभावे व वरंध या सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आली आहेत.

याशिवाय या आरोग्य केंद्रांतर्गत २७ उपकेंद्रही कार्यान्वित आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी असून यामध्ये एक अधिकारी एमबीबीएस असणे आवश्यक आहे. मात्र सद्यःस्थितीत तालुक्यातील केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात एक एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहे.

नुकतीच डॉक्टरांचे पदे बीएएमएस श्रेणीतून भरण्यात आली आहे. वारंवार मागणी करूनही अनेक वर्षांपासून या ठिकाणी एमबीबीएस पदवीधारक डॉक्टर उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे शस्‍त्रक्रिया अथवा शवविच्छेदनासाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होते.


बिरवाडी परिसरात औद्योगिक वसाहत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाचे मानले जाते. मुंबई-गोवा महामार्गावरच दासगाव आरोग्य केंद्र आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथेही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

त्यामुळे परिसरात येणारे पर्यटक, महामार्गावरील अपघात याचा विचार करता ही प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज असण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र मनुष्‍यबळाअभावी रुग्‍णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

आरोग्‍य केंद्रातील रिक्‍त पदे

- महाडमध्ये तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे एक पद भरण्यात आले असले तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १२ मंजूर पदांपैकी एक पद रिक्त आहे. आरोग्य पर्यवेक्षक दोन मंजूर पदांपैकी दोन्हीही पदे सध्या रिक्त आहेत.
- आरोग्य सहायक पुरुष १३ पैकी दोन पदे रिक्त आहेत. औषध निर्माण अधिकारी सहापैकी तीन पदे रिक्त आहेत, आरोग्यसेविका सहापैकी तीन पदे रिक्त आहेत, आरोग्य सेविका उपकेंद्रात २७पैकी १९ पदे रिक्त आहेत.
- आरोग्यसेवक पुरुष २८ पैकी आठ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ सहायक सातपैकी चार पदे रिक्त आहेत. वाहन चालक व सफाई कामगार यांची प्रत्येकी सहा पदे ही शासनाच्या बाह्य संस्थेमार्फत भरण्यात आली आहेत. शिपाई १३ पैकी आठ पद रिक्त असून स्‍त्री परिचारिका सहापैकी तीन पदे डिसेंबरअखेरपर्यंत रिक्त होती.

कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण

मनुष्‍यबळाअभावी महाड तालुक्‍यातील आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. सरकारच्या आरोग्यविषयक नवीन येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सद्यःस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागातील महत्त्वाची ही पद्धत तातडीने भरली जावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

आरोग्‍य विभागातील रिक्त पदे तसेच एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता याबाबत वरिष्ठ पातळीवर ही पदे भरण्याकरता सातत्याने मागणी केली जात आहे. मनुष्‍यबळाअभावी रुग्‍णसेवेवर परिणाम होणार नाही, याबाबत दक्षता घेत आहोत
- डॉ.नितीन बावडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, महा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com