सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छतागृहे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

यात पर्यटकांना बसण्यासाठी बाक, दिशादर्शक फलक, रात्रीच्यावेळी किल्ल्यावरील रहिवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पथदिवे, पिण्याचे पाणी, मंदिराच्या गाभाऱ्यात सौरदिवे यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती ग्रामसेवक युवराज चव्हाण यांनी दिली. 

मालवण - येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने किल्ला दर्शनास येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून एका महिन्यात मिळालेल्या पर्यटन कराच्या माध्यमातून किल्ल्यावर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह व कचराकुंड्या बसविण्यात आल्या आहेत. येत्या काळात अन्यही सोयी-सुविधा किल्ल्यावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आली. 

1 जानेवारीपासून वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यटन कर आकारणीस सुरवात झाली. यात एक महिन्याच्या कालावधीत एक लाख 82 हजार 934 रुपयांचा कर ग्रामपंचायतीस मिळाला. किल्ला दर्शनास येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतागृहाअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या समस्येकडे पुरातत्त्व विभागानेही दुर्लक्ष केले होते; मात्र पर्यटन कर सुरू करण्यात आल्यानंतर या कराच्या माध्यमातून किल्ल्यावर अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यात किल्ल्यावर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह तसेच कचराकुंड्या बसविण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याने स्थानिक रहिवासी तसेच पर्यटकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात मिळणाऱ्या पर्यटन कराच्या माध्यमातून किल्ल्यावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यात पर्यटकांना बसण्यासाठी बाक, दिशादर्शक फलक, रात्रीच्यावेळी किल्ल्यावरील रहिवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पथदिवे, पिण्याचे पाणी, मंदिराच्या गाभाऱ्यात सौरदिवे यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती ग्रामसेवक युवराज चव्हाण यांनी दिली. 

Web Title: toilets built on sindhudurg fort