रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार; पावसाचे पाणी दहा घरात घुसले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

चिपळूणमध्ये परशुरामनगरात पावसाचे पाणी साचून ते दहा घरात घुसले आहे.

रत्नागिरी : गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जगबुडी, वाशिष्ठी, अर्जुनासह काजळी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंडणगड ते वेळास मार्गावर दरड कोसळली तर चिपळूणात दहा घरात पावसाचे पाणी घुसले होते. हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आली आहे.

शनिवारी (ता. 4) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 45.12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड- 0.80, दापोली- 48, खेड- 29.90, गुहागर- 82, चिपळूण- 41.40, संगमेश्‍वर- 31.30, रत्नागिरी- 59, लांजा- 53.10, राजापूर- 60.60 मिलिमीटरची नोंद झाली. गुजरात आणि लगतच्या परिसरातील हवामान बदलासह अरबी समुद्रातील निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर शनिवारी दिवसभर कायम होता. 

मंडणगड तालुक्‍यातील भारजा, निवळी नद्या तुडुंब भरून वाहत आहे. वेळास मार्गावर दरड कोसळल्यामुळे मार्ग बंद ठेवला आहे. शहर परिसरात पावसाचे पाणी साचले असून काहींच्या घरांना धोका निर्माण झाला होता. चिपळूणमध्ये परशुरामनगरात पावसाचे पाणी साचून ते दहा घरात घुसले आहे. खेर्डी परिसरातही पाणी साचले आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाची कामे अपूर्ण आहेत. पावसाचे पाणी मोऱ्यांमध्ये साचून राहिल्याने चिखलाचे साम्राज्य आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवर झाला. राजापुरात अर्जुना नदी दुथडी वाहत आहे. शहरातील वरचीपेठ भागाकडे जाणारा चिंचबांध रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे त्यामार्गावरून शीळ, गोठणेदोनीवडे आदी भागात जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. 

हे पण वाचा - भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारणीत रत्नागिरीची पाटी कोरीच...

 रत्नागिरीतील काजळी नदीचे पाणी वाढले असून पावसाचा जोर कायम राहिला तर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता होती. केळ्ये, मजगाव येथील पवारवाडी, म्हामुरवाडी येथे शिळ धरणातील पाणी रस्त्यावर आले आहे. केळ्ये गावाकडे जाणारी वाहतुकीवर परिणाम झाला होता. संगमेश्‍वर तालुक्‍यातील सोनवी, बावनदी, असावी, शास्त्री नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या भातशेतीत पाणी घुसले होते. काही ठिकाणी नदीचे प्रवाहही बदलत आहेत. नदीकिनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भात लावणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी राजाला पावसाने दिलासा दिल्याने भात लावण्यांचा जोर वाढला आहे. 

हे पण वाचा - ...अन् डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच केले क्वारंटाईन

समुद्र खवळला 
वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. अजस्त्र लाटा किनाऱ्यावर आपटत असून लोकवस्तीत भीतीचे वातावरण आहे. रत्नागिरीतील मिऱ्यासह दापोली, गुहागरमधील किनारी भागात सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. रविवारी (ता. 5) पौर्णिमा असल्यामुळे मुसळधार पावसाची शक्‍यता असून समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छीमारांनीही मासेमारीला जाऊ नये, असा इशारा दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Torrential rains in Ratnagiri district; Rainwater seeped into ten houses