आंबोली गजबजतंय पर्यटकांनी ; अर्थकारणाला मिळतीये गती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

आंबोलीत यंदाही गेल्या वर्षीएवढा सरासरी पाऊस झाला आहे.

आंबोली (सिंधुदुर्ग) : लॉकडाउननंतर आता आंबोली पर्यटन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली. मुख्य म्हणजे येथे कोरोनाची भीती आता संपल्यात जमा आहे. यामुळे पर्यटन व्यावसायिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. आंबोलीत यंदाही गेल्या वर्षीएवढा सरासरी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि कोरोना यांना वैतागलेल्या येथील स्थानिकांना आता थोडा दिलासा मिळाला.

हेही वाचा - अतिउत्साहीपणा आला अंगलट ; चारचाकी गाडी फसली वाळुत, काढताना फुटला घाम -

हॉटेल व्यवसायही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पर्यटन व्यावसायिक आता पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. लॉकडाउन संपल्याने आता वेगवेगळ्या भागातून पर्यटक गोव्यात जाताना येथे थांबू लागले आहेत. आंबोलीत रहायलाही पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक समाधान व्यक्त करीत आहेत.

आंबोलीत पर्यटनदृष्ट्या अनेक बाजूंनी विकास करण्यासाठी राज्यकर्त्यांना अपयश आले तरी निसर्गावर अवलंबून पर्यटन मात्र अजून टिकून आहे. त्यामुळे आंबोलीचे आकर्षण कायम आहे. त्यामुळे गेले ८ महिने जवळपास बंद असलेला इथला हॉटेल व्यवसाय आता रुळावर येत आहे.

हेही वाचा -  सावधान ! काँगो फिव्हर आजार आता माणसांतही होतोय संक्रमित -

पर्यटकांमध्येही कोरोनाची भीती आता राहीली नसल्याचे चित्र आहे. अजूनही मुक्कामाचे प्रमाण खूप वाढलेले नाही; मात्र पर्यटक येथे काहीकाळ थांबणे पसंत करत आहेत. यामुळे खाण्यापिण्याशी संबंधित उलाढाल वाढली आहे. त्यामुळे अर्थकारणाला हळूहळू गती येत आहे.

"आंबोलीत सध्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. कोरोनाचा कोणताही मागमूस पर्यटनावर दिसून येत नाही. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आंबोलीत पर्यटन व्यावसायिकांत चैतन्य दिसून येते. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे."

- प्रथमेश गवंडे, पर्यटन व्यावसायिक, आंबोली

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourism of amboli start and increased fastly now a days in sindhudurg