प्री वेडिंग शुटला किती येतो खर्च ? जाणून घेण्यासाठी वाचा

Tourism Business New Dimension Of PreWedding Photoshoot
Tourism Business New Dimension Of PreWedding Photoshoot

रत्नागिरी ( गुहागर ) -  प्री-वेडिंग शूटसाठी हॉट डेिस्टनेशन ठरल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाच्या अर्थकारणाला चालना मिळाली आहे. या नव्या आयामामुळे पर्यटन व्यावसायिक, छायाचित्रकार, चलत्‌चित्रकार (व्हिडिओग्राफर), मेकअप्‌मन, वेशभूषाकार यांना थेट व्यवसाय मिळाला आहे. तर स्थानिक हॉटेल व्यावसायिक, केशकर्तनालय, कोकण उत्पादने विक्री करणारे यांनादेखील अप्रत्यक्ष फायदा होत आहे. 

प्री-वेडिंग फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीमध्ये छायाचित्रीकरणाच्या टीममध्ये तीनजणांचा सहभाग असतो. वधूवरांसोबतचे नातेवाईक गृहीत धरले तर किमान तीन खोल्यांचे बुकिंग होते. त्यातून दिवसाला ३ ते ६ हजार रुपयांचा व्यवसाय होतो. चहा, नाश्‍ता, पाणी यासाठी दिवसाला २५०० ते ३ हजार रुपये खर्च होतो. हा व्यवसाय स्थानिक मंडळींनाच मिळतो. चित्रीकरणासाठी येणारी मंडळी पर्यटनस्थळी हिंडतात. स्वाभाविकपणे तेथे होणारी खरेदी, कोकणातील आंबापोळी, कुळीथ पीठ आदी साहित्याची होणारी खरेदी यातूनही स्थानिकांचा व्यवसाय वाढतो. पर्यटन निवास संकुलामध्ये वैशिष्टयपूर्ण बांधकाम असेल, फुलबाग असेल, खोल्या आकर्षक असतील तर तुमच्या प्रॉपर्टीच्या वापराचे स्वतंत्र भाडे व्यावसायिक स्टुडिओवाले देतात.

प्री वेडिंग शूटचा खर्च २ लाखांपासून पुढे 

फोटोबरोबर व्हिडिओ शूटिंग असेल तर किमान चार माणसे वाढतात. व्हिडिओ शूटिंगमध्ये स्टोरी दाखवायची असेल तर सिनेमॅटोग्राफरची आवश्‍यकता भासते. अशा वेळी प्रतिदिन उत्पन्नात २ ते ४ हजारांनी वाढ होते.  स्थानिक फोटोग्राफर प्री वेड शूटसाठी प्रतिदिन २५ हजार रुपये घेतात. तर चित्रीकरण करणाऱ्यांचा दर ५० हजारांपासून सुरू होतो. स्थानिक मेकअप्‌मन एका दिवसाचे २ ते ३ हजार रुपये घेतात. वैविध्यपूर्ण पोशाखांसाठी वेगळा दर आकारला जातो.

इनोव्हेशनला संधी

व्यावसायिक स्टुडिओ एक दिवसापासून चार दिवसांपर्यंतचे पॅकेज देतात. यामध्ये तुमच्या गरजांप्रमाणे मेकअप्‌मन, वेषभूषाकारापासून वाहनापर्यंतची व्यवस्था स्टुडिओ करून देतो. तसेच व्हिडिओ एडिटिंगमध्येही आपल्याला हवे ते पार्श्‍वसंगीत दिले जाते. अशा या प्री वेडिंग शूटचा खर्च २ लाखापासून पुढे असतो. अर्थात व्यावसायिक स्टुडिओ मालकांची गुंतवणूकही तितकीच असते. विहान स्टुडिओचे सुनील खेडकर पुण्यातून प्री-वेड शूटसाठी येताना १ ड्रोन, ४ कॅमेरे, गिंम्बल्स, ॲम्ब्रेला, पोर्टा लाईट एवढे साहित्य घेऊन आले. या साहित्याची किंमत सुमारे १६ लाख रुपये आहे.         

लाखोंची गुंतवणुक

एडिटिंगसाठी वेगवेगळी सॉफ्टवेअर लागतात. त्यांची किंमतही ५० हजारापासून असते. परंतु लाखो रुपयांच्या गुंतवणुकीबरोबर कल्पक दृष्टी आणि साधनांच्या वापराचे ज्ञान आवश्‍यक असते. 
- संजय शिंदे, चित्रम स्टुडिओ, चिपळूण 

अनपेक्षित व्यवसाय

दिवाळीच्या सुट्टीत पाऊस असल्याने अनेक बुकिंग रद्द झाली. पण नोव्हेंबर महिन्यात प्री वेडिंग शूटसाठी दोन पार्टी आल्याने अनपेक्षित व्यवसाय झाला. 
- मैत्रेयी खरे, ओसरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com