esakal | मुरूड किनारी पर्यटन व्यवसाय हळूहळू बहरतोय 
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism  Business Slowly Flourishing On Murud Coast

पर्यटन व्यवसाय कोरोनाने ठप्प झाला. जूनमध्ये "निसर्ग' चक्रीवादळात मुरुड समुद्रकिनारी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाल्याने उरलेसुरलेले अवसानही गळून पडले. व्यावसायिक दुहेरी संकटात सापडले होते.

मुरूड किनारी पर्यटन व्यवसाय हळूहळू बहरतोय 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हर्णै ( रत्नागिरी ) - गेले आठ महिने खीळ बसलेल्या दापोली तालुक्‍यातील पर्यटन व्यवसायाला हळूहळू बहर येऊ लागला आहे. कोविडचे भय जसजसे कमी होईल तसतशी पर्यटकांची संख्या वाढेल, असे येथील स्थानिकांनी सांगितले.

गांधी जयंतीला जोडून आलेल्या शनिवार, रविवारपासून दापोली तालुक्‍यातील मुरुड किनाऱ्यावर पर्यटकांची रेलचेल दिसू लागली. अनलॉक 5 चा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने आगामी काळात पर्यटन व्यवसायाला वेग मिळेल, अशी उमेद हॉटेल, लॉज मालकांमध्ये दिसून येत आहे. 

पर्यटन व्यवसाय कोरोनाने ठप्प झाला. जूनमध्ये "निसर्ग' चक्रीवादळात मुरुड समुद्रकिनारी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाल्याने उरलेसुरलेले अवसानही गळून पडले. व्यावसायिक दुहेरी संकटात सापडले होते. मात्र, सरकारने पर्यटनावरील बंदी हटवल्याने पुन्हा पर्यटन बहरण्यास सुरवात झाली.

समुद्रकिनाऱ्यांवर गजबजाट सुरू झाला आहे. पर्यटकांना मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. दापोली तालुक्‍यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णै बंदरामध्ये मासळीसाठी येतोच. या बंदरात ताज्या मासळीसाठी प्रत्येक पर्यटक हजेरी लावतोच लावतो. सध्या पापलेट, सुरमई, हलवा, कोळंबी आदी चांगल्या प्रतीच्या मासळीची आवक सुरू झाल्याने खवय्यांसाठी पर्वणी झाली आहे. येथील कोकणी पद्धतीच्या घरगुती जेवणाची लज्जतही वेगळीच असते. सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुण्यातून पर्यटनक आनंद लुटण्यास येतात. 

स्टॉल जोमात सुरू केले 
स्थानिकांनी हळूहळू समुद्रकिनारी वडापाव, पाणीपुरी, भेलपुरी, चहा नाश्‍ता आदी प्रकारचे स्टॉल जोमात सुरू केले आहेत. पर्यटक समुद्रात मनमुराद पोहण्याचा आनंद लुटत आहेत. बहुतांशी पर्यटक पुळणीत खेळण्याचा आनंद घेत आहेत. समुद्रकिनारी ज्या टपरीधारकांचे साहित्य होते त्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्याची अद्यापही भरपाई मिळलेलीच नाही, याबाबत त्या टपरीधारकांकडून खेद व्यक्त केला जात आहे. 

गेले आठ महिने कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्यामुळे खूप नुकसान झाले. सध्या सरकारने सर्व बंदी उठवल्यामुळे पर्यटक येऊ लागला आहे. गेले काही दिवस खूप त्रासदायक गेले पण आता हळूहळू पर्यटक येण्याची सुरवात होत असल्याने संसाराची गाडी रुळावर यायला चांगलीच मदत होईल, अशी अपेक्षा आहे. 
- अरविंद तुपे, हॉटेल व्यावसायिक