esakal | पर्यटकांचा चिपळूणातील विसावा पॉइंटकडे ओढा 
sakal

बोलून बातमी शोधा

Tourists Attraction Towards Resting Point In Chiplun

परशुराम घाटातील संपूर्ण परिसर पर्यटकांना आकर्षित करून घेतो. येथे विशिष्ट ऋतूमध्ये जंगली पक्षी व प्राणी पर्यटकांना आकर्षित करून घेतात. मुंबई - गोवा महामार्गावर असलेले श्रीक्षेत्र परशुराम हे कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. सप्तचिरंजीवांपैकी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात.

पर्यटकांचा चिपळूणातील विसावा पॉइंटकडे ओढा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी ) - खवय्यांचे स्वादिष्ट जेवण, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाबरोबरच चिपळूण तालुका निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. परशुराम घाटातील वाशिष्ठी दर्शन मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. येथील विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी महामार्गावरून प्रवास करणारे पर्यटक थांबत आहेत. त्यामुळे वाशिष्ठी दर्शन पॉइंटवर पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. 

परशुराम घाटातील संपूर्ण परिसर पर्यटकांना आकर्षित करून घेतो. येथे विशिष्ट ऋतूमध्ये जंगली पक्षी व प्राणी पर्यटकांना आकर्षित करून घेतात. मुंबई - गोवा महामार्गावर असलेले श्रीक्षेत्र परशुराम हे कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. सप्तचिरंजीवांपैकी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात. चिपळूणपासून सुमारे 7 कि. मी. अंतरावर महेंद्रगिरी डोंगराच्या कुशीत असलेले हे परशुरामांचे मंदिर आहे. या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात. परशुराम मंदिराचा परिसर मोठा रम्य व शांत आहे. प्रवासी वाशिष्ठी दर्शन पॉइंटवर थांबतात. या पॉइंटला विसावा पॉइंट असेही म्हणतात.

परशुराम घाटातील एक अवघड व अपघाती वळणावर हा पॉइंट असल्यामुळे निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण आपले वाहन हळू करून काही काळ येथील निसर्गाचे दर्शन घेतो. त्यामुळे बाहेरच्या पर्यटकांसह चिपळूण शहर व उपनगरातील तरुणही येथे सांयकाळी गर्दी करतात. या पॉइंटपासून जवळच असलेला गोवळकोट किल्ला व वाशिष्ठी नदीचे विस्तीर्ण पात्राचे मनोहारी दृश्‍य आहे. वशिष्ठी नदीची लांबी 30 किलोमीटर असली तरी तिचे पात्र मोठे आहे. विसावा पॉइंट येथून संपूर्ण वाशिष्ठी नदीचे दृश्‍य डोळ्यात साठवता येते. जिल्हाबंदी उठल्यापासून पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. 

लॉकडाउनच्या काळात पाच महिने खूप त्रासाचे गेले. जिल्हाबंदी उठल्यापासून विसावा दर्शन पॉइंटवर पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. मात्र पूर्वीसारखी गर्दी होत नाही. हळूहळू परिस्थिती सुधारून व्यवसाय भरारी घेईल. 
- सुशांत काणेकर, चहा विक्रेता