esakal | तुम्हाला माहीत आहे का कोकणात या गावात गौराईला रडविले जाते
sakal

बोलून बातमी शोधा

traditional criteria for gauri festival in mandangad ratnagiri


माहेरवाशिणी भावूक, जागरणात रंगले खेळ 

तुम्हाला माहीत आहे का कोकणात या गावात गौराईला रडविले जाते

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : हसतखेळत रात्रभर जागरण करताना माहेरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. दोन दिवसांसाठी माहेरी आलेली माहेरवाशीण गौराई आता परत जाणार यामुळे अनेकांचा उर भरून आला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास काटवटीवर उलटा पलिता, लाटणे, काठ्या रगडून वेगवेगळे आवाज काढण्यात आले. यावेळी निरोप, विरहाची गाणी गाऊन गौरीला रडविण्यात आले. पूर्वापार वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा तालुक्‍यातील गावांतून महिलांनी एकत्र येत जपली. 
लवतील आंबे, लवतील जांबे 
लवत मोंगर जाई 
गौराई निघाली सासराला 
तिला गं आंदण काय.... 
अशी निरोपाची विरहगीते गात सासरी जाणाऱ्या गौराईसाठी उपस्थित महिला भावुक झाल्या. यावेळी गौराई प्रमाणेच सणाला माहेराला आलेल्या माहेरवाशिणी माहेरच्या आठवणींनी भावुक झाल्या. दोन दिवसांतील घरच्या, मैत्रिणींच्या आठवणी सोबती घेत पुन्हा सासरला निघाल्या. गौरी आणि मुलगीही सासरला जाणार म्हणून अनेक घरांतील वातावरण भावनिक झाले. मंडणगडात ग्रामीण भागात अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौराईचे आगमन झाले होते. माहेरी आलेल्या गौरीचा पाहुणचार नीट व्हावा म्हणून सर्व झटत होते. विविध प्रकारची धान्य, पत्री, फुले व अत्तर, अलंकारांनी सजवून, नटवल्यामुळे गौराई प्रसन्नचित्त दिसत होती. दिवसभरात गौरी-गणपती दोघांचीही मनोभावे पूजा करण्यात आली. तिला विविध पदार्थांचा नैवैद्य दाखवण्यात आला. 

हेही वाचा- एक नव्हे दोन नव्हे तर दापोलीत सापडले तब्बल  नानेटी  जातीचे सात साप

माहेरवाशीण गौरीला निरोप 
गौरीसमोर रात्रभर माहेरवाशिणी व सासुरवाशिणींच्या उपस्थितीत जागर घुमला. माहेरवाशिणीचे रुसवे-फुगवे काढत लाडाची सरबत्ती करण्यात आली. जाखडी नृत्य, टिपरी नृत्य, झिम्मा, फुगडी, बसफुगडी, फेर धरुन नाच-दंगा करीत आसू आणि हसूत रात्र जागवून गौराईसह लग्न होवून सासरी गेलेल्या आणि दोन दिवसांसाठी माहेरी आलेल्या माहेरवाशिणीचे जल्लोषानं स्वागत करण्यात आले. पालेकोंड येथील महिलांनी एकत्र येत फेर धरून भोवरी, पिंगा, दिंड्याची गाणी गात मंगळागौर करीत माहेरवाशीण गौरीला निरोप देण्यात आला. 


संपादन - अर्चना बनगे

loading image